ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेनंतर महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी निवृत्ती पत्करली होती. या पाश्र्वभूमीवर विश्वचषकातील हा सामना धोनीचा शेवटचा एकदिवसीय सामना असल्याच्या चर्चाना ऊत आला होता. त्यामुळे सामना संपल्यानंतर धोनीवर निवृत्तीच्या प्रश्नांचा भडिमार झाला. मात्र ‘कॅप्टन कुल’ धोनीने हसतखेळत या प्रश्नांचा समाचार घेतला. ‘‘मी ३३ वर्षांचा आहे. मी अजून व्यवस्थित धावतोय, मी तंदुरुस्त आहे. निवृत्ती घेण्याएवढा म्हातारा झालेलो नाही,’’ अशी कोपरखळी पेरत धोनीने ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ लगावला. ‘‘पुढच्या वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर अलविदा करण्याचा विचार आहे. माझ्या निवृत्तीसंदर्भात तुम्ही संशोधन करा आणि लिहा. तुम्ही जे लिहाल, सत्य त्याच्या विरुद्ध असेल,’’ असा खोचक टोमणाही धोनीने लगावला.
‘‘सलग सात सामन्यांत प्रतिस्पध्र्याना सर्व बाद करण्याची किमया करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांना उपांत्य फेरीत मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. गोलंदाजांची कामगिरी आणखी चांगली झाली असती तर सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते,’’ असे परखड मत धोनीने व्यक्त केले. ‘‘सलामीची भागीदारी महत्त्वाच्या टप्प्यावर असताना शिखरने मोठा फटका खेळणे टाळायला हवे होते,’’ असेही त्याने सांगितले. या पराभवासह विश्वचषकातील सलग अकरा सामन्यांत विजयाची भारताची परंपरा खंडित झाली आहे.
‘‘कोणत्याही खेळपट्टीवर तीनशे धावांचा पाठलाग करणे आव्हानात्मक आहे. एका क्षणी ऑस्ट्रेलियाचा संघ ३५० धावांचा टप्पा गाठेल असे वाटत होते, मात्र गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पुनरागमन केले. मात्र गोलंदाजांची कामगिरी आणखी चांगली झाली असती तर ऑस्ट्रेलियाला ३२८ धावांची मजल मारता आली नसती. फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांची कामगिरी चांगली व्हायला हवी होती. तसे झाले नाही,’’ अशी खंत धोनीने व्यक्त केली.
‘‘मोठे लक्ष्य असूनही आमची सुरुवात चांगली झाली. गोलंदाजांवर दडपण निर्माण झाले असताना शिखर बाद झाला. त्यानंतर त्यांनी शिस्तबद्ध मारा केला आणि आम्ही नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. त्यांच्या गोलंदाजांना चेंडू रिव्हर्स स्विंग होत असल्याचा फायदा मिळाला. विश्वचषकातील बहुतांशी संघांकडे दहाव्या क्रमांकांपर्यंत फलंदाजी करू शकणारे खेळाडू आहेत. मात्र आमचे तळाचे फलंदाज काहीच योगदान देऊ शकले नाहीत,’’ असे धोनीने सांगितले.
प्रदीर्घ ऑस्ट्रेलिया दौऱ्याविषयी विचारले असता धोनी म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियाचा चार महिन्यांचा प्रदीर्घ दौरा युवा खेळाडूंसाठी शिकण्याचे व्यासपीठ ठरला. अजिंक्य रहाणेने कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारांत आपल्या खेळात आमूलाग्र सुधारणा केली आहे. संघ म्हणून तिरंगी मालिकेत अपयशी ठरलो होतो; मात्र विश्वचषकात गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर सातत्याने चांगले प्रदर्शन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो.’’

फ्लेचरबाबत निर्णय बीसीसीआय घेईल
विश्वचषकाबरोबर मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा प्रशिक्षक म्हणून तीन वर्षांचा करार संपत आहे. त्यांच्या भवितव्याविषयी विचारले असता धोनी म्हणाला, बीसीसीआय आणि फ्लेचर मिळून निर्णय घेतील. पुढे काय होईल मला कल्पना नाही. फ्लेचर यांचे खेळासंदर्भातले तांत्रिक ज्ञान उत्कृष्ट आहे. संघातील ज्येष्ठ खेळाडू निवृत्त झाल्यावर फ्लेचर यांनी प्रशिक्षकपद स्वीकारले. युवा खेळाडूंना घडवण्याची कठीण जबाबदारी त्यांच्यावर होती.