News Flash

ग्रॅंट भरारी

जिवाची बाजी लागेल, असे क्षण आयुष्यात खचितच येतात.. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये मुकाबला रंगलेला..

| March 25, 2015 03:13 am

ग्रॅंट भरारी

ग्रँट एलियट विजयाचा शिल्पकार
जिवाची बाजी लागेल, असे क्षण आयुष्यात खचितच येतात.. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये मुकाबला रंगलेला.. विश्वचषकात उपांत्य फेरीच्या उंबरठय़ावरून माघारी परतण्याचे दुर्भाग्य या दोन्ही संघांच्या वाटय़ाला अनेकदा आलेले.. यंदा त्या क्षणाची पुनरावृत्ती टाळून इतिहास घडवण्यासाठी तय्यार २२ शिलेदारांमध्ये अपेक्षेप्रमाणेच अटीतटीचे युद्ध रंगले.. प्रत्येक चेंडूगणिक, षटकागणिक विजयाचे पारडे दोलायमान होत जाणारे.. आपल्या खेळाने क्रिकेटला जिंकून देणाऱ्या या लढाईत ग्रँट एलियटच्या नाबाद खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत इतिहास घडवला.. इटुकल्या आकाराचे ऑकलंडचे ईडन पार्क आणि तिथे उपस्थित ४५ हजार उत्साही समर्थकांच्या साक्षीने न्यूझीलंडने या विजयाचा जल्लोष साजरा करीत ‘चलो मेलबर्न’ हा नारा दिला. एक चेंडू व चार विकेट्स राखून मिळवलेल्या रोमहर्षक विजयासह न्यूझीलंडने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ‘ग्रँट’ भरारी घेण्याचा मान मिळवला. मागील सहा विश्वचषकांत अधुरे राहिलेले जगज्जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यापासून न्यूझीलंड आता केवळ एका विजयाच्या अंतरावर आहे.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडच्या तेजतर्रार ट्रेंट बोल्टने दक्षिण आफ्रिकेच्या भरवशाच्या हशिम अमला (१०) आणि क्विंटन डी कॉक (१४) यांना झटपट माघारी धाडले. २ बाद ३१ अशा स्थितीतून फॅफ डू प्लेसिस आणि रिली रोसू यांनी दक्षिण आफ्रिकेला सावरले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. कोरे अँडरसनने रोसूला बाद करत ही जोडी फोडली. डी’व्हिलियसने नेहमीचे वेगवान धोरण स्वीकारले. या जोडीने संघासाठी मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला. हे दोघे पॉवरप्लेमध्ये  जोरदार हल्लाबोल करणार असे वाटत होते, तेव्हा पावसाचे आगमन झाले. त्या वेळी आफ्रिकेची ३ बाद २०४ अशी स्थिती होती.
पावसाचा जोर वाढल्याने सव्वा तासाचा खेळ वाया गेला. सामना ४३ षटकांचा करण्यात आला. विश्रांतीनंतर परतलेल्या दक्षिण आफ्रिकेला डू प्लेसिसच्या रूपात धक्का बसला. त्याने ८२ धावांची संयमी खेळी केली. परिस्थितीची गरज लक्षात घेऊन मिलरने तुफानी आक्रमण केले. अवघ्या १५ मिनिटांत ६ चौकार आणि ३ षटकार यांच्यासह १८ चेंडूंत ४९ धावांची झंझावाती खेळी करून मिलर तंबूत परतला. मिलरच्या खेळीमुळेच दक्षिण आफ्रिकेने २८१ धावा केल्या. मात्र डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार न्यूझीलंडला ४३ षटकांत २९८ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
ब्रेंडन मॅक्क्युलमच्या रूपात न्यूझीलंडला तारणहार लाभला. वेगवान गोलंदाजांचे सर्वोत्तम त्रिकूट असलेल्या डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल आणि व्हरनॉन फिलँडर यांचा मॅक्क्युलमने आरामात समाचार घेतला. चौकार-षटकारांची बरसात करत मॅक्क्युलमने धावगती नियंत्रणात राहील, याची काळजी घेतली. मॅक्क्युलमच्या आक्रमणामुळेच पाचव्या षटकातच न्यूझीलंडचे अर्धशतक फलकावर झळकावले. स्टेनच्या एका षटकात २५ धावा फटकावत आफ्रिकेवरचे दडपण वाढवले. मात्र मॉर्केलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मॅक्क्युलम बाद झाला. त्याने २६ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ५९ धावांची खेळी केली. मॅक्क्युलमपाठोपाठ केन विल्यमसनलाही (६) बाद करत मॉर्केलने आफ्रिकेला पुनरागमनाची संधी दिली. मग गप्तिल-टेलर जोडीने संयमी भागीदारी करत आगेकूच केली. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गप्तील (३४) धावबाद झाला. थोडय़ा वेळात डय़ुमिनीने टेलरला (३०) बाद करत न्यूझीलंडला अडचणीत आणले. यानंतर अँडरसन आणि ग्रँट एलियट यांनी सुरेख भागीदारी केली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी १०३ धावांची निर्णायक भागीदारी साकारली. या भागीदारीदरम्यान डी’व्हिलियर्सने अँडरसनला धावचीत करण्याची संधी वाया घालवली. डी’व्हिलियर्सने यष्टय़ा उडवल्या, मात्र त्या वेळी त्याच्या हातात चेंडू नव्हता. त्या वेळी न्यूझीलंडला ९६ धावांची आवश्यकता होती. या जीवदानाचा फायदा उठवत या जोडीने वाटचाल केली. मॉर्केलने अँडरसनला (५८) बाद करत दक्षिण आफ्रिकेला पुनरागमनाची संधी दिली. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध ल्युक राँकीचा (८) त्रिफळा उडवत स्टेनने सामन्याचे पारडे झुकवले. मात्र एलियटने शांतपणे किल्ला लढवत धावगतीवर नियंत्रण ठेवले. ४२व्या षटकांत एलियटचा झेल घेण्याचा डय़ुमिनी आणि बेहरादीन यांनी प्रयत्न केला. झेल सुटला आणि या दोघांची टक्कर झाली. हे जीवदान प्रमाण मानत एलियटने शेवटच्या षटकात १२ धावांचे अवघड आव्हान साध्य केले. एलियटने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७३ चेंडूंत ८४ धावांची निर्णायक खेळी साकारली.

धावफलक
दक्षिण आफ्रिका : हशिम अमला त्रि. गो. बोल्ट १०, क्विंटन डी कॉक झे. साऊदी गो. बोल्ट १४, फॅफ डू प्लेसिस झे. रॉन्की गो. अँडरसन ८२, रिले रोसू झे. गप्तिल गो. अँडरसन ३९, ए बी डी’व्हिलियर्स नाबाद ६५, डेव्हिड मिलर झे. रॉन्की गो. अँडरसन ४९, जे पी डय़ुमिनी नाबाद ८, अवांतर (बाइज १, वाइड १३) १४, एकूण ४३ षटकांत ५ बाद २८१.
बाद क्रम : १-२१, २-३१, ३-११४, ४-२१७, ५-२७२.
गोलंदाजी : टीम साऊदी ९-१-५५-०, ट्रेंट बोल्ट ९-०-५३-२,
मॉट हेन्री ८-२-४०-०, डॅनियल व्हेटोरी ९-०-४६-०, केन विल्यमसन
१-०-५-०, ग्रँट एलियट १-०-९-०, कोरे अँडरसन ६-०-७२-३
न्यूझीलंड (सुधारित लक्ष्य २९८) : मार्टिन गप्तिल धावचीत ३४, ब्रेंडन मॅक्क्युलम झे. स्टेन गो. मॉर्केल ५९, केन विल्यमसन त्रि. गो. मॉर्केल ६, रॉस टेलर झे. डी कॉक गो. डय़ुमिनी ३०, ग्रँट एलियट नाबाद ८४, कोरे अँडरसन झे. डू प्लेसिस गो. मॉर्केल ५८, ल्युक रॉन्की झे. रोसू गो. स्टेन ८, डॅनियल व्हेटोरी नाबाद ७, अवांतर (बाइज ६, लेगबाइज २, वाइड ५) १३, एकूण ४२.५ षटकांत ६ बाद २९९
बाद क्रम : १-७१, २-८१, ३-१२८, ४-१४९, ५-२५२, ६-२६९
गोलंदाजी : डेल स्टेन ८.५-०-७६-१, व्हरनॉन फिलँडर ८-०-५२-०, मॉर्ने मॉर्केल ९-०-५९-३, इम्रान ताहिर ९-१-४०-०,
जे पी डय़ुमिनी ५-०-४३-१, ए बी डी’व्हिलियर्स ३-०-२१-०
सामनावीर : ग्रँट एलियट.

अद्भुत सामना. दक्षिण आफ्रिकेने सर्वोत्तम खेळ करत झुंज दिली. हा सामना म्हणजे अव्वल दर्जाच्या क्रिकेटची जाहिरातच होती. हा सामना ज्यांनी अनुभवला त्यांच्यासाठी तो कायमस्वरूपी संस्मरणीय राहील. आम्ही गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात पुरेपूर प्रयत्न केले. फलंदाजी करतानाही आम्ही हेच धोरण स्वीकारले. शेवटच्या क्षणापर्यंत लढत देण्याचा निर्धार आम्ही केला होता. ग्रँटने शानदार खेळी साकारली. विजनवासातून परतत अशी खेळी करणे कठीण असते. डावाच्या सुरुवातीलाच प्रचंड धावगतीचे आव्हान खाली आणणे हे आमचे उद्दिष्ट होते. म्हणूनच मी जोरदार आक्रमणावर भर दिला. दक्षिण आफ्रिकेने थरारक खेळ केला म्हणूनच हा सामना रंगतदार झाला. न्यूझीलंड संघातील क्रिकेटपटूंच्या आयुष्यातील हा सुवर्णमयी कालखंड आहे. चाहत्यांचा प्रतिसाद भारावून टाकणारा होता. त्यांच्या प्रतिसादामुळेच आव्हानात्मक लक्ष्य पेलू शकलो. हा अनुभव थक्क करणारा होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही मातब्बर संघ आहेत. प्रतिस्पर्धी कोण आहे, यापेक्षा सर्वोत्तम खेळ करीत जिंकणे आमचे ध्येय आहे.
ब्रेंडन मॅकक्युलम, न्यूझीलंडचा कर्णधार

थरारक सामना. हा विजय माझ्यासाठी किंवा संघासाठी नाही तर आम्हाला साथ देणाऱ्या चाहत्यांसाठी आहे. आजच्या सामन्यात चाहत्यांनी दिलेला पाठिंबा शब्दातीत होता.
४५ हजार चाहते तुमच्या नावाचा जयघोष करतात, तो क्षण अनुभवणे रोमांचकारी असते. भरभरून प्रेम करणाऱ्या चाहत्यांसमोर खेळायला मिळणे हा सन्मानच आहे. आम्ही धावगतीनुसार डावाची अचूक आखणी करू शकलो. आमच्याकडे संतुलित संघ आहे. एका वेळी एकाच सामन्याचा आम्ही विचार करतो.
-ग्रँट एलियट, न्यूझीलंडचा फलंदाज

अविस्मरणीय सामना. कारकीर्दीत मी अनुभवलेला चाहत्यांचा सर्वोच्च प्रतिसाद. सर्वोत्तम खेळ करणारा संघ जिंकला. आम्ही शंभर टक्के योगदान देत सामना जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. मनात कोणताच पश्चात्ताप नाही. मैदानावर जे काही करता येण्यासारखे होते, ते आम्ही केले. हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. यातून सावरायला वेळ लागणार आहे. आम्ही स्वत:साठी खेळलो नाही. मायदेशात आमच्यासाठी शुभेच्छा चिंतणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही खेळलो. आमच्या खेळाचा त्यांना अभिमानच वाटेल अशी आशा आहे. स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी शानदार खेळ केला. आम्हाला सुरेख लय गवसली होती. स्पर्धेत आतापर्यंतच्या खेळाचे आनंद आणि समाधान आहे. विशिष्ट एका खेळाडूचे नाव घेता येणार नाही. प्रत्येकाने क्षमतेला साजेसा खेळ केला. अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या न्यूझीलंडचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
-ए बी डी’व्हिलियर्स, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार

डेल स्टेनच्या ४३ व्या (अखेरच्या) षटकातील नाटय़
४३.१ (न्यूझीलंडला जिंकण्यासाठी ६ चेंडूंत १२ धावांची गरज होती. हा सामना बरोबरीत सुटल्यास सरस धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडला विजयाची संधी)

४३.२ व्हेटोरीने बॅकफुटवर जात चेंडू तटवला. धिम्या गतीच्या चेंडूवर केवळ एका धावेवर समाधान.
(५ चेंडूंत ११ धावांची गरज)

४३.२ फुलटॉस चेंडू, मात्र त्याचा फायदा उठवण्यात एलियट अपयशी. पुन्हा केवळ एका धावेवर समाधान. मग स्टेनच्या मांडीचा स्नायू दुखावला. फिजिओकडून उपचारानंतर स्टेन पुन्हा गोलंदाजीसाठी तयार.
(४ चेंडूंत १० धावांची गरज)

४३.३  स्टेनकडून यॉर्कर चेंडू. मात्र अनुभवी व्हेटोरीने आडव्या बॅटसह थर्डमॅनच्या बाजूने खणखणीत चौकार. चाहत्यांमध्ये जल्लोषाची लाट.
(३ चेंडूंत ६ धावांची गरज)

४३.४  स्टेनकडून उसळता चेंडू. व्हेटोरीचा पुलचा प्रयत्न, मात्र तो चुकला. चेंडू यष्टीरक्षक डी कॉकच्या ग्लोव्ह्समध्ये विसावतो. मात्र एक धाव चोरण्यात यशस्वी.
(२ चेंडूंत ५ धावांची गरज)

४३.५ स्टेनकडून खोलवर टप्प्याचा चेंडू. एलियटचा जोरदार प्रहार आणि चेंडू लाँगऑनच्या दिशेने प्रेक्षकांत विसावला. ४५ हजार चाहत्यांचा एकच जयघोष. षटकारासह न्यूझीलंड  सामन्यात विजयी आणि पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत. न्यूझीलंडच्या खेळांडूचा विजयी जल्लोष तर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या डोळ्यांत अश्रू दाटले.

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी एकदाही अर्धशतकी सलामी देऊ शकली नाही. हशिम अमला आणि क्विंटन डी कॉक जोडीची स्पर्धेतली सरासरी अवघी १६.२५.

२५ डेल स्टेनच्या पाचव्या षटकात ब्रेंडन मॅक्क्युलमने फटकावलेल्या धावांची संख्या. एकदिवसीय कारकिर्दीत एका षटकांत स्टेनने दिलेल्या सर्वाधिक धावा. याआधी २००६मध्ये त्याच्या एका षटकांत २४ धावा वसूल करण्यात आल्या होत्या.

२७१ २२ ब्रेंडन मॅक्क्युलमने अर्धशतकासाठी घेतलेल्या चेंडूंची संख्या. विश्वचषकात २२ चेंडूंत अर्धशतक झळकावण्याची मॅक्क्युलमची चौथी वेळ. विश्वचषकात २२ चेंडूंत अर्धशतक तीनदा अर्धशतक झळकावण्याचा मान मार्क बाऊचरच्या नावावर होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नऊ वेळा २२ चेंडूंत अर्धशतक झळकावले गेले आहे.

१८ चेंडूंत ४९ धावांच्या खेळीदरम्यान डेव्हिड मिलरचा स्ट्राइक रेट. विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा हा सर्वोत्तम वैयक्तिक स्ट्राइक रेट.

२  एकदिवसीय प्रकारात न्यूझीलंडतर्फे ३,००० धावा करणारा मॅक्क्युलम केवळ दुसरा फलंदाज. नॅथन अ‍ॅस्टलच्या नावावर ३,४४८ धावा आहेत.

३०० ऑकलंडच्या ईडन पार्क येथे दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात आयोजित सामना न्यूझीलंडमध्ये झालेला तीनशेवा एकदिवसीय सामना ठरला.

२९९ न्यूझीलंडने लक्ष्याचा पाठलाग करताना केलेल्या धावा. विश्वचषकाच्या बाद फेरीच्या टप्पात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने केलेल्या सर्वाधिक धावा. याआधीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. १९९६च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध २८९ धावा केल्या होत्या.

twitterविश्वचषकाच्या उपांत्य फेरीत हरताना पाहणे क्लेशदायी असते. अफलातून क्रिकेटची मेजवानी. आफ्रिकेने शानदार खेळ केला. प्रथमच अंतिम फेरी गाठणाऱ्या न्यूझीलंडचे अभिनंदन.  
सचिन तेंडुलकर,भारताचा माजी कर्णधार

न्यूझीलंड संघाचे त्रिवार अभिनंदन. कडवा संघर्ष करूनही पराभूत झालेल्या आफ्रिकेच्या खेळाडूंची मनस्थिती मी समजू शकतो. दोन्ही संघ पराभूत होऊ नयेत असेच वाटत होते.
ग्लेन मॅकग्रा,ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज

सकारात्मक भूमिका काय किमया घडवू शकते, याचा न्यूझीलंडने प्रत्यय दिला. अफलातून खेळ व सकारात्मक भूमिका प्रशंसनीय आहे.
हर्षां भोगले, समालोचक

दर्जेदार क्रिकेटची पर्वणी देणारा सामना. चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी दक्षिण आफ्रिकेने केली आहे. प्रचंड लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडचे मनापासून अभिनंदन. मोक्याच्या क्षणी भावनांवर नियंत्रण ठेवत त्यांनी केलेला खेळ अद्भुत असा होता. पहिल्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा!
शेन वॉर्न,
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू

उपांत्य फेरीचा अद्भुत सामना. क्षणाक्षणाला दोलायमान होणारे विजयाचे पारडे. उत्कंठावर्धक लढतीत न्यूझीलंडने मिळवलेला विजय संस्मरणीय आहे. पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या न्यूझीलंडचे मन:पूर्वक अभिनंदन!
डॅमियन मार्टिन,
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू

शानदार खेळासाठी न्यूझीलंडचे अभिनंदन!  या सामन्यात क्रिकेटचा विजय झाला असे म्हणणे उचित ठरेल. दडपणाच्या स्थितीतही एलियटने केलेली संयमी खेळी अफलातून अशीच होती. डी’व्हिलियर्स व त्याच्या संघाप्रती असलेला आदर दुणावला आहे. त्यांनीही सर्वोत्तम खेळ केला. आफ्रिकेच्या पराभवात न खेळल्या गेलेल्या सात षटकांचा वाटा आम्ही विसरणार नाही.
ब्रायन लारा,
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार

अविश्वसनीय मुकाबला. रोमहर्षक सामन्यात दिमाखदार विजयासह विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणाऱ्या न्यूझीलंड संघाचा अभिमान वाटतो. विजयासाठी पुरेपूर प्रयत्न करूनही पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे दु:ख मी समजू शकतो.
स्टीफन फ्लेमिंग,
न्यूझीलंडचा माजी कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2015 3:13 am

Web Title: new zealand beat south africa in thriller to reach world cup final
Next Stories
1 हिशेब चुकता करायची ही योग्य वेळ
2 रहाणेकडे सर्वात चांगले तंत्र -वॉन
3 उपांत्य फेरी जिंकण्याची भारताला सर्वाधिक संधी – ब्रेट ली
Just Now!
X