यंदाच्या विश्वचषकातील भारताच्या दृष्टीने सर्वात सकारात्मक मिळालेली गोष्ट म्हणजे वेगवान गोलंदाज. आतापर्यंत भारतामध्ये वेगवान गोलंदाजांनी वानवा होतीच, पण एकत्रितपणे वेगवान गोलंदाज भारतीय संघात पाहायला मिळाले नव्हते. कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही त्यांचे कौतुक केले असले तरी त्यांच्यावर स्थानिक सामने खेळण्याची सक्ती करू नये, अशी सूचना त्याने केली आहे.
भारतीय गोलंदाजांनी विश्वचषकामध्ये ७२ बळी मिळवले, त्यापैकी ४८ बळी वेगवान गोलंदाजांनी मिळवले होते. यांमध्ये उमेश यादवने १८, तर मोहम्मद शमीने १७ बळी मिळवले होते. मोहित शर्माने १३ फलंदाजांना बाद केले होते.
‘‘आपल्या यंत्रणेमध्ये काही दोष आहेत, हे आपण समजून घ्यायला हवे. आता गेले तीन महिने वेगवान गोलंदाज आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करत होते. आता भारतात परतल्यावर त्यांना पुन्हा स्थानिक सामन्यांमध्ये खेळवले जाईल. यामध्ये त्यांनी किती षटके गोलंदाजी करावी, याचे नियोजन नसेल, त्यामुळे त्यांचा समतोल बिघडू शकतो. या गोलंदाजांची ऊर्जा व्यर्थ होऊ शकते आणि त्यांच्या या गोलंदाजीचा फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी होऊ शकतो. मला हीच चिंता सतावत आहे,’’ असे धोनी म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘जर वेगवान गोलंदाजांनी देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळायला नकार दिला तर स्थानिक संघटना त्यांच्यावर नाराज होते, त्यांची तक्रार करते. तुम्ही देशासाठी खेळता म्हणून तुम्ही स्थानिक संघासाठी खेळणार नाही का, असे प्रश्न विचारून त्यांच्यासाठी समस्या निर्माण करीत असतात.’’
भारताच्या गोलंदाजांबद्दल धोनी म्हणाला की, ‘‘उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व प्रकारचे क्रिकेट खेळतात. अन्य आंतरराष्ट्रीय संघांकडे पाहिले तर त्यांना दोन महिन्यांची विश्रांती देण्यात येते आणि आम्हाला वर्षभरातून दोन महिनेही विश्रांती मिळत नाही. मला माहिती आहे, मी जे बोललो ते सोपे नाही, पण स्थानिक संघटनांनी याबाबतीत विचार करायला हवा.’’

नवीन नियम गोलंदाजीला थोडेसे मारक आहेत. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांमध्ये आपण बऱ्याच द्विशतकी खेळी पाहू शकलो. हे नियम बदलायला हवेत, असे माझे वैयक्तिक मत आहे. काही जणांच्या मते ३० यार्डच्या वर्तुळात अधिक खेळाडू असल्याने चेंडू निर्धाव जातात, पण जर असे असेल तर सारेच खेळाडू आतमध्ये ठेवायला हवेत. या नियमांमुळे एकदिवसीय क्रिकेटचा नूर बदलत चालला आहे. तो पूर्वीसारखा ठेवायचा असेल तर नियमांमध्ये बदल करायलाच हवा.
 – महेंद्रसिंग धोनी</strong>

अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका) ५४१ धावा
२. मार्टिन गप्तिल (न्यूझीलंड) ५३२ धावा
३. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ४८२ धावा

अव्वल गोलंदाज
१. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) २१ बळी
२. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) २० बळी
३. उमेश यादव (भारत) १८ बळी