क्रिकेटमध्ये फक्त हाणामारी करूनच विजय मिळवता येत नसतो आणि याचे उत्तम उदाहरण दक्षिण आफ्रिकेच्या हाराकारीतून समोर आले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने डकवर्थ-लुईस नियमांमुसार ४७ षटकांमध्ये २३२ धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार ए बी डी’व्हिलियर्सचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी फक्त मोठे फटके मारण्यात धन्यता मानल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला २९ धावांनी पराभव wc05स्वीकारावा लागला. यष्टीरक्षक सर्फराझ अहमदने ४९ धावांसह सहा झेल टिपल्यामुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पावसाचे सावट पाहून आफ्रिकेने नाणेफेक जिंकल्यावर पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पाकिस्तानने सावध सुरुवात केल्यावरही त्यांना ३० धावांवर पहिला धक्का बसला, पण त्यानंतर सर्फराझ (४९), युनिस खान (३७) आणि कर्णधार मिसबाह उल हक यांनी संघाला सावरले. मिसबाहने ४ चौकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली, पण या तिघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना अपेक्षित साथ न देता आल्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ४६.४ षटकांमध्ये पाकिस्तानचा डाव २२२ धावांमध्ये आटोपला. आफ्रिकेला या वेळी ४७ षटकांमध्ये २३२ धावांचे सुधारित आव्हान देण्यात आले.
हशिम अमला (३८) आणि फॅफ डय़ू प्लेसिस (२७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली. पण ही जोडी फुटल्यावर मात्र आफ्रिकेचे फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. डी’व्हिलियर्सने एकाकी झुंज देत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर ५८ चेंडूंत ७७ धावा फटकावल्या. पाकिस्तानच्या मोहम्मद इरफान, राहत अली आणि वहाब रियाझ यांनी प्रत्येकी तीन बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : ४६.४ षटकांत सर्व बाद २२२ (मिसबाह उल हक ५६, सर्फराझ खान ४९; डेल स्टेन ३/३०) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : ३३.३ षटकांत सर्व बाद २०२ (ए बी डी व्हिलियर्स ७७; राहत अली ३/४०)
सामनावीर : सर्फराझ अहमद.

सर्फराझची विक्रमाशी बरोबरी
विश्वचषक स्पध्रेत प्रथमच खेळताना पाकिस्तानचा यष्टीरक्षक सर्फराज अहमदने सहा झेल घेत विक्रमाशी बरोबरी केली़  सर्फराजने क्विंटन डी कॉक (०), हाशिम अमला (३८), फॅफ डू प्लेसिस (२७), डेल स्टेन (१६), ए़  बी़  डि’व्हिलियर्स (७७) आणि इमरान ताहीर (०) यांचे झेल टिपले. हा विक्रम करणारा तो दहावा यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळीही केली़  

आमच्याकडून धक्कादायक फलंदाजी झाली. दडपणाखाली आम्ही गेल्या वर्षांमध्ये बरेच सामने गमावले आहेत. खेळपट्टी ही फलंदाजीसाठी चांगली होती, पण आम्ही धावांचा यशस्वी पाठलाग करू शकलो नाही. हा संघ विश्वविजेता ठरू शकतो, असा माझा अजूनही विश्वास आहे. गुणतालिकेत आम्ही अजूनही चांगल्या स्थानावर आहोत.
– ए बी डी’व्हिलियर्स, द. आफ्रिकेचा कर्णधार
 
*९ पाकिस्तानच्या डावखुऱ्या गोलंदाजांनी एका डावात ९ बळी मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. मोहम्मद इरफान, राहत अली आणि वहाब रियाज या तिन्ही डावखुऱ्या गोलंदाजांनी या सामन्यात प्रत्येकी तीन बळी मिळवले.

*३९ जानेवारी २०१३ पासून धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला फक्त ३९ टक्के सामन्यांमध्येच यश मिळाले आहे. गेल्या १५ सामन्यांमध्ये आफ्रिकेला धावांचा पाठलाग करताना फक्त पाच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.

*२२ पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या १० सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने २२ बळी मिळवले आहे. शनिवारच्या सामन्या स्टेनने ३० धावांमध्ये ३ बळी मिळवले.

अव्वल फलंदाज
१. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका ) : ३१८  धावा
२. हशिम अमला (दक्षिण आफ्रिका) : २९५ धावा
३. ब्रेंडन टेलर  (झिम्बाब्वे ) : २९५ धावा

अव्वल गोलंदाज
१. टिम साऊदी (न्यूझीलंड) : १३ बळी
२. मॉर्नी मॉर्केल, जोश डॅव्हे, जेरॉम टेलर, वहाब रियाझ ११ बळी
३. मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहीर, तेंदई चटारा १० बळी