भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचे सर्वसामान्यांवर दडपण येते, तर संघावर किती दडपण असेल, याचा विचार न करणेच बरे. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी कोणत्या ११ शिलेदारांना निवडावे हा पेच पाकिस्तानच्या संघापुढे पडला आहे. त्यामुळे आतापर्यंत पाकिस्तानच्या संघाची घोषणाही करण्यात आलेली नाही.

सराव सामन्यात बांगलादेश आणि इंग्लंडवर विजय मिळवल्यावर पाकिस्तानच्या संघाचे मनोबल उंचावलेले असले तरी भारताविरुद्धच्या सामन्यात नेमके कोणत्या खेळाडूंना खेळवायचे, हा यक्षप्रश पाकिस्तान संघ व्यवस्थापनाला पडला आहे.
‘‘भारताविरुद्धच्या सामन्यासाठी कोणत्या अकरा खेळाडूंची निवड करायची हा पेच आमच्यापुढे पडलेला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये दोन आठवडे व्यतीत केल्यावर चार मुख्य गोलंदाजांसहित शाहीद आफ्रिदी हा पाचवा गोलंदाज असेल. पण जर चार मुख्य गोलंदाज खेळणार असतील तर उमर अकमलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी द्यावी लागेल आणि हा निर्णय जोखमीचा ठरू शकतो,’’ असे पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘प्रशिक्षक वकार युनूस यांनी जायबंदी मोहम्मद हाफिझच्या जागी नसीर जमशेदला खेळण्याचे सुचवले आहे. पण जर सर्फराझ अहमद या यष्टिरक्षकाला खेळवायचे असेल तर त्याच्यावर सलामीवीराची जबाबदारी द्यावी लागेल. त्यामुळे यामधून नेमका तोडगा कसा काढायचा याचा विचार आम्ही करत आहोत.’’