ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे गेलेला पाकिस्तानचा संघ तुकडय़ांमध्ये मायदेशी परतणार आहे. मुख्य प्रशिक्षक वकार युनूस आणि युनूस खान संघासोबत मायदेशी परतणार नाहीत. वकार युनूस कुटुंबीयांसमवेत सिडनी येथे सुट्टीवर जाणार असून तर युनूस मेलबर्नमध्ये राहणार आहे.
पहिल्या तुकडीतल्या खेळाडूंचे रविवारी कराची येथे आगमन होणार आहे. यामध्ये शाहीद आफ्रिदी, सर्फराझ यांचा समावेश आहे. दुसऱ्या तुकडीतले खेळाडू सोमवारी लाहोर येथे परतणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले. संघाशी संलग्न सर्व विदेशी प्रशिक्षकांनी सुट्टी घेतली असून, ते आपल्या घरी परतले आहेत.
बांगलादेश दौऱ्याच्या तयारीसाठी वकार युनूससह अन्य प्रशिक्षक एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात परतणार आहेत. विश्वचषकात पराभूत झाल्यामुळे अनेकदा खेळाडूंना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पाकिस्तानच्या समर्थकांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली होती तसेच काहीजणांनी टीव्ही संच फोडले होते. कॅसिनो भेटप्रकरणी अडचणीत आलेले  निवड समिती प्रमुख मोईन खान यांना मायदेशी परतल्यानंतर संतप्त चाहत्यांना सामोरे जावे लागले होते. त्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानी खेळाडूंच्या आगमनावेळी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.