विश्वचषक क्रिकेट स्पध्रेला अद्याप प्रारंभही झालेला नाही आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याच्यासह पाकिस्तानच्या आठ खेळाडूंवर हॉटेलमध्ये उशिरा आल्याबद्दल तीनशे ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आफ्रिदी व त्याचे अन्य सात सहकारी सिडनीतील त्यांच्या मित्रांसमवेत रात्री भोजनाला गेले होते. हॉटेलमध्ये येण्याबाबत पाकिस्तान संघाने घातलेल्या मुदतीत ते परत न आल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
संघाचे व्यवस्थापक व निवृत्त लष्करी अधिकारी नावीद चीमा यांनी दिलेल्या मुदतीपेक्षा ४५ मिनिटे ते उशिरा पोहोचले. अशी चूक पुन्हा झाली तर संघातून वगळले जाण्याचा इशाराही चीमा यांनी संघातील प्रत्येक खेळाडूला दिल्याचे समजते.