विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘खेलो दिल से, वर्ल्ड कप लाओ फिर से’ अशा शब्दांत मोदी यांनी भारतीय संघाचा हुरूप वाढवला आहे. ‘ट्विटर’च्या माध्यमातून मोदींनी विश्वचषकासाठी निवड झालेल्या १५ खेळाडूंना वैयक्तिक शुभेच्छाही दिल्या.
‘‘कॅप्टन कुल धोनीला माझ्या शुभेच्छा. आक्रमक खेळा, संघाचे यशस्वी नेतृत्त्व कर आणि देशवासियांना अभिमान वाटेल अशी कामगिरी कर. तू ही जबाबदारी पेलशील याची खात्री आहे,’’ अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी धोनीला दिल्या आहेत.
‘‘भारतीय संघाचा रनमशीन असलेल्या विराट कोहलीला मन:पूर्वक शुभेच्छा. देशवासियांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत,’’ असे मोदींनी कोहलीला शुभेच्छा देताना म्हटले आहे.
‘‘एकदिवसीय प्रकारात दोन द्विशतके नावावर असणाऱ्या रोहित शर्माचे जगभर चाहते आहेत. आम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी पुन्हा एकदा कर,’’ अशा शब्दांत मोदींनी रोहितचा उत्साह वाढवला आहे.
मुंबईकर अजिंक्य रहाणेबाबत मोदी म्हणतात, ‘‘माझ्या तरुण मित्रा विश्वचषकासाठी तुला खूप शुभेच्छा. हा विश्वचषक तुझ्यासाठी फलदायी ठरो. या संधीचे सोने कर!’’
‘‘सुरेश रैनाचा मैदानावरचा वावर चैतन्यमयी असतो. त्याची बॅट तलवारीसारखी तळपते. चेंडूला आणि विशेषत: उसळत्या चेंडूंना वारंवार सीमारेषेबाहेर धाड,’’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी  रैनाचा आत्मविश्वास उंचावला आहे. प्रत्येक खेळाडूची बलस्थानांचा जाणीवपूर्वक उल्लेख करत पंतप्रधानांनी विश्वचषकासाठी निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक शुभेच्छा दिल्या आहेत.