परीक्षांचा मोसम सुरू असताना क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांसाठीची विश्वचषकाची प्रतिष्ठेची परीक्षासुद्धा चालू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे दर चार वर्षांनी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेला  अनन्यसाधारण महत्त्व आहे. १४ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत झालेल्या प्राथमिक परीक्षेचा निकाल रविवार लागला. यात ८ संघ चांगले गुण मिळवून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले, तर ६ संघ अनुत्तीर्ण झाले. बुधवारपासून मुख्य परीक्षेला सुरुवात होत आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषकाच्या परीक्षेत भारताने गुणवत्ता यादीत अव्वल येण्याचा मान मिळवला होता. यंदासुद्धा प्राथमिक परीक्षेत न्यूझीलंड आणि भारत यांनी आघाडी घेतली असून, ते आता मुख्य परीक्षेला सामोरे जात आहेत. यानिमित्ताने या संघांच्या मैदानी गुणवत्तेचा वेध घेणारे हे प्रगतिपुस्तक-
न्यूझीलंड
जोरदार आक्रमण हे सूत्र राबवत यजमान न्यूझीलंडने साखळी गटात निर्विवाद वर्चस्व राखले. पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडने इंग्लंड, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि स्कॉटलंडचा धुव्वा उडवला. ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदी ही वेगवान गोलंदाजांची जोडगोळी आणि अनुभवी डॅनियल व्हेटोरीची फिरकी हे न्यूझीलंडचे बलस्थान ठरले. भन्नाट फॉर्ममध्ये असलेला तडाखेबंद फलंदाज आणि कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने साखळी गटात न्यूझीलंडच्या विजयात निर्णायक योगदान दिले आहे. घरच्या मैदानांवर, सुपरिचित वातावरणात आणि चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यासह न्यूझीलंडने एकतर्फी विजयांची नोंद केली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर न्यूझीलंडने प्रतिस्पध्र्याना नामोहरम केले.
ऑस्ट्रेलिया
आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल अपेक्षांवर खरे उतरले आहेत़  गोलंदाजीत मात्र त्यांचा हुकमी एक्का मिचेल जॉन्सन याला अद्याप लय सापडलेली नाही; परंतु मिचेल स्टार्क याने प्रत्येक सामन्यात स्वत:ला सिद्ध केले आह़े  गोलंदाजीत त्यांच्याकडून वारंवार प्रयोग होत असल्याने अंतिम ११मध्ये स्टार्क, जॉन्सन वगळता अन्य कोण असेल हे आताच सांगणे अवघड आह़े  सहापैकी चारमध्ये विजय आणि प्रत्येकी एक सामना पराभव व अनिर्णीत राहिला आहे.
श्रीलंका
पहिल्याच सामन्यात सहयजमान न्यूझीलंडकडून दारुण पराभव पत्करल्यानंतरही हा संघ पुन्हा उभा राहिला़  कुमार संगकारा, महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान ही या संघाची बलस्थाऩे  त्यांनी आपल्या चौफेर फटकेबाजीच्या बळावर संघाची विजयी घोडदौड सुरूच ठेवली़  गोलंदाजीत मात्र त्यांना साजेशी कामगिरी करण्यात आत्तापर्यंत तरी अपयश आले आह़े  लसिथ मलिंगाला केवळ ११ बळी मिळवता आले आहेत़  सहा सामन्यांत त्यांना केवळ तीन वेळाच प्रतिस्पर्धी संघाच्या दहाही फलंदाजांना बाद करण्यात यश मिळाले आह़े
बांगलादेश
न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड यांसारखे मातब्बर संघ गटात असूनही बांगलादेशचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश कौतुकास्पद आह़े   स्कॉटलंडसारख्या संघाच्या त्रिशतकी आव्हानासमोर डगमगून न जाता संयमाने खेळ करून बांगलादेशने ऐतिहासिक विजय मिळवला़  इंग्लंडविरुद्ध त्यांचा सांघिक खेळाचा नजराणा होता़  तमीम इक्बाल, महमुदुल्लाह, मुशफिकर रहिम, शकिब अल हसन फॉर्मात आहेत़  सहा सामन्यांत तीन विजय आणि दोन पराभव अशी त्यांची कामगिरी आह़े  
भारत
साखळीतील सहापैकी सहा सामने जिंकत भारताने ‘ब’ गटामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा भारताचे मुख्य अस्त्र ठरला आहे. त्याला मोहित शर्मा, उमेश यादव चांगली साथ देत आहेत. फिरकीपटूंमध्ये आर. अश्विनने काही सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली असली तरी त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही, तर रवींद्र जडेजा गोलंदाजीमध्ये अनुत्तीर्ण ठरला आहे. फलंदाजीमध्ये शिखर धवन हुकमी एक्का ठरत आहे. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांना चांगलाच सूर गवसलेला दिसला. पण रोहित शर्माला अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रवींद्र जडेजाला संधी मिळाली, तेव्हा फलंदाजीलाही तो न्याय देऊ शकलेला नाही.
दक्षिण आफ्रिका
गोलंदाजीमध्ये डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल आणि व्हेरनॉन फिलँडर यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, त्यांना लय अजूनही सापडलेली दिसत नाही. फलंदाजीमध्ये त्यांचा संघ हशिम अमला आणि कर्णधार ए बी डी’व्हिलियर्स यांच्यावरही अजूनपर्यंत अवलंबून दिसत आहे. फॅफ डय़ू प्लेसिस, डेव्हिड मिलर, क्विंटन डी कॉक, रिली रोसू यांना अजूनही छाप पाडता आलेली नाही. वेन पार्नेल हा अनुत्तीर्ण ठरलेला आहे. धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ गोंधळून जातो. साखळीतील दोन मोठय़ा संघांकडून दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला असूनही ते बाद फेरीत पोहोचले आहेत.
पाकिस्तान
प्रतिकूल परिस्थितीत केलेले पुनरागमन हा पाकिस्तानच्या साखळी फेरीचा सारांश म्हणता येईल. शिस्तबद्ध भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तान स्पर्धेत परतला. दक्षिण आफ्रिकेवरील विजयाने पाकिस्तानचा आत्मविश्वास दुणावला. उशिरा संघात समावेश करण्यात आलेला सर्फराझ अहमद हुकूमी एक्का ठरला. वहाब रियाझ, सोहेल खान, राहत अली, मोहम्मद इरफान यांनी प्रत्येक सामन्यात संघाला तारले आहे. फलंदाजीत मिसबाह उल हक वगळता एकाही खेळाडूला सातत्य राखता आलेले नाही. मोठी खेळी करण्याऐवजी विकेट फेकण्याची वृत्ती पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत टाकणारी आहे.
वेस्ट इंडिज
आर्यलडविरुद्ध पराभूत झाल्याने वेस्ट इंडिजचे कच्चे दुवे समोर आले.  पाकिस्तान संघाला चीतपट करत वेस्ट इंडिजने फासे पालटवले. ख्रिस गेलच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या दोनशे धावांच्या खेळीने वेस्ट इंडिजचे नशीबच पालटले. मात्र लहरीपणा आणि पूर्णपणे तंदुरुस्त नसणाऱ्या खेळाडूंमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांनी नांगी टाकली. अमिरातीविरुद्धच्या विजयानंतरही केवळ गणितीय समीकरणांच्या जोरावर त्यांना बाद फेरीची लॉटरी लागली.