और ये शानदार चौका… या ओळखीच्या आवाजाने गुरूवारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले. हा आवाज होता बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा. रणबीर कपूरचे फुटबॉलप्रेम जगजाहीर असले तरी गुरूवारी त्याला समालोचकाच्या भूमिकेत पाहून क्रिकेटरसिकांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी रणबीरने स्वत:ची समालोचनाची हौस चांगलीच भागवून घेतली. कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असणाऱ्या शोएब अख्तरला प्रश्न विचारण्यापासून ते भारतीय फलंदाजांनी चांगला फटका मारल्यानंतर आनंदाने और ये शानदार चौका… म्हणणारा रणबीर यावेळी पहायला मिळाला. समालोचक म्हणून एखाद्या फलंदाजाने चौकार मारल्यानंतर और ये शानदार चौका… या ओळी बोलता याव्यात, असे मला नेहमी वाटत असे. यानिमित्ताने ती इच्छा पूर्ण झाल्याचे रणबीरने सांगितले. उपांत्यपूर्व फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात समालोचनाची संधी मिळाल्यामुळे मी आनंदी असल्याचेही रणबीरने सांगितले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेकडे क्रिकेटरसिकांना आकर्षित करण्यासाठी आयोजकांकडून वेगवेगळे फंडे आजमावले जाताना दिसत आहेत. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनीदेखील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्यावेळी समालोचन केले होते. भारतीय संघ यंदा ऑस्ट्रेलियातही विश्वचषक उंचावेल, असा विश्वास रणबीरने यावेळी व्यक्त केला.