03 March 2021

News Flash

पोपटपंची : गेले विठ्ठलपंत कुणीकडे?

विश्वचषकात विश्रांती दिवस. मात्र तरीही नेहमीच्या सवयीने चंपक तोतारामकडे येतो. मॅच नसली तरी तोतारामशी गप्पा करूया.

| March 17, 2015 02:55 am

popat(विश्वचषकात विश्रांती दिवस. मात्र तरीही नेहमीच्या सवयीने चंपक तोतारामकडे येतो. मॅच नसली तरी तोतारामशी गप्पा करूया. काही खास माहिती मिळवून कोण विश्वचषक जिंकणार? समजतंय का या छुप्या उद्देशाने चंपक येतो. मात्र फुटपाथवरच्या त्या दृश्याने हडबडून जातो. केस विस्कटलेले, घामेळलेला तोताराम विमनस्क स्थितीत बसलेला असतो. चंपक हाक मारतो, पण तोताराम काहीच उत्तर देत नाही. शेवटी चंपक हात लावून तोतारामची तंद्री मोडतो.)
चंपक : तोतारामभौ, काय झालं? असे का बसलात? विठ्ठलपंत कुठे आहेत?
तोताराम : विठ्ठलपंत गेले..
चंपक : गेले म्हणजे? कुणाकडे?
तोताराम : काय सांगायचं आता..
चंपक : इतके दिवस, नव्हे इतकी वर्षे तुमच्यासोबत होते. तुमच्या घराचा भाग झालेले ते. मला कळेल असं काहीतरी सांगा.
तोताराम : तुम्ही विश्वासातले म्हणून सांगतो. सकाळी विठ्ठलपंतांना घेऊन आलो इकडे. सगळं आलबेल होतं. दुपारी जेवण झाल्यावर विठ्ठलपंतांच्या घराची म्हणजे पिंजऱ्याची साफसफाई करत होतो. तेवढय़ात रस्त्यावर कसला तरी गलका झाला. बघायला गेलो तर किरकोळ अपघात होता, पण बायकांचा कलकलाट सुरू होता. जखमी बाईंना गाडीत बसवून मी परतलो. बघतो तर विठ्ठलपंत नाही. मला वाटलं आसपास कोणाकडे विसावले असतील. दिवसभर शोधतोय पण काहीच पत्ता नाही. पोलिसांकडे थोडीच तक्रार करणार. असे कसे सोडून गेले मला.. घरच्यांना न सांगता सवरता कोणी जातं का?.. फॅक्टरी बंद झाल्यापासून विठ्ठलपंतांमुळेच पोटाला आधार होता. आता कसलं काय..?
चंपक : तोतारामभौ, धीर सोडू नका. होईल काहीतरी.
(चंपक तोतारामचं सांत्वन करतो आणि दोघंही आपापली वाट पकडतात.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 2:55 am

Web Title: rest day in world cup
Next Stories
1 सुनील-कपिल अन् सीएसके अमर्यादित
2 एकांडा शिलेदार
3 निषेधाची गोष्ट
Just Now!
X