भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने चाहत्यांना आपल्या लाजवाब खेळीने अमाप सुख दिले असले तरी काही गोष्टींमुळे तो अजूनही निराश आहे. निवृत्तीच्या निर्णयाचे त्याला वाईट वाटत नाही, पण जास्त काळ भारतीय संघाचे कर्णधारपद न भूषवल्यामुळे तो निराश नक्कीच आहे. आपली ही खंत व्यक्त करतानाच त्याने पाकिस्तानिरुद्धचा सामना गमावल्याचे शल्य, खेळताना घरच्यांपासून लांब राहिल्याचे दु:खही या वेळी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर भारतीय संघ जर यापद्धतीनेच खेळत राहिला तर नक्कीच आपण सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालू, असे भाकीतही वर्तवले आहे.
’ खेळाडूंकडून साथ लाभली नाही
‘‘क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाही, तर हा एक सांघिक प्रकार आहे. खेळाडूंनी एकसंघ होऊन कामगिरी करायला हवी. काही वेळा कर्णधार मैदानात असताना खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो. पण फलंदाजांनी व गोलंदाजाची चांगली कामगिरी व्हायला हवी. पण माझ्याबाबतीत तसे घडले नाही. १२-१३ महिन्यांमध्ये माझ्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी कर्णधाराची नियुक्ती करण्यात येत असते, पण जर पुरेसा वेळ कर्णधाराला मिळाला नाही तर यशाची टक्केवारी शून्यही असू शकते,’’ असे सचिनने सांगितले.
 निवृत्तीच्या निर्णयाचे दु:ख नाही
‘‘निवृत्तीच्या निर्णयाचे दु:ख नाही. कारण जोपर्यंत मी क्रिकेटचा आनंद लुटत होतो, तोपर्यंत मी खेळत होतो. निवृत्तीनंतर सात महिन्यांनी लॉर्ड्सवरील प्रदर्शनीय सामन्याचाही मी आनंद लुटला. पण दुसऱ्या दिवशी मात्र शरीराने सांगितलं की, निवृत्तीचा निर्णय हा योग्यच होता,’’ असे सचिनने सांगितले.
अर्जुनवर स्वप्न लादणार नाही
‘‘माझे वडील कवी होते, पण कधीही त्यांनी मला लिहायची सक्ती केली नाही. त्याप्रमाणेच मी अर्जुनवर माझी स्वप्ने लादणार नाही. मी क्रिकेटला निवडले, त्यानेही क्रिकेट निवडल्यास त्याला माझा पाठिंबा असेल,’’ असे सचिन म्हणाला.
पाकविरुद्धच्या पराभवानंतर रडलो होतो
‘‘१९९८-९९मध्ये चेन्नईतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना मी शतक लगावले होते आणि आम्ही विजयाच्या उंबरठय़ावर होतो. पण मी बाद झाल्यावर आम्ही १२ धावांनी सामना हरलो. तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये मी लहान मुलासारखा रडलो होतो. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठीही मी गेलो नव्हतो. या एकाच गोष्टीचे शल्य मला आहे,’’ असे सचिनने सांगितले.

ज्या पद्धतीने भारताचा संघ सध्या खेळत आहे, ते पाहून मी भारावून गेलो आहे आणि आपण असेच खेळत राहिलो तर विश्वचषक आपलाच असेल. प्रत्येक विभागामध्ये आपण नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तिरंगी मालिकेतील पराभवानंतर आपण पाकिस्तानला पराभूत करू की नाही, याबद्दल साशंकता होती. पण आपण पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेलाही
पराभूत केले. आफ्रिकेने चांगला खेळ केला,
पण त्यांचा वाईट पराभव कसा झाला हे
आपण दमदार खेळ करत दाखवून दिले.
जिथे मोहित शर्माने ए बी डी व्हिलियर्सला
बाद केले, तिथे हा सामना आपल्या
बाजूने झुकला.
-सचिन तेंडुलकर