टीम इंडियाचे सलामीवीर शिखर धवन आणि विराट कोहली फलंदाजी करत होते..ना चौकार गेला होता..ना षटकार..ना कोणी बाद झाले होते…तरीसुद्धा स्टेडियमवर अचानक एक जल्लोष सुरू झाला..सर्वांचे लक्ष स्टेडियमवर असलेल्या मोठ्या स्क्रिनकडे होते आणि टाळ्यांचा एकच कडकडाट!!! स्टेडियमवरील या जल्लोषाचे कारण म्हणजे क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर मेलबर्न स्टेडियमवर दाखल झाला होता. यंदाच्या विश्वचषकाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान मेलबर्नवर उपस्थित होता. सचिनने यावेळी उपस्थित माजी क्रिकेटपटूंशी गप्पा मारल्या आणि प्रेक्षकांच्या जल्लोषाला प्रतिसाद देखील दिला. सुरू असलेला सामना, उपस्थितांचा प्रतिसाद पाहून कदाचित सचिनला मेलबर्न स्डेडियमवरील आपले दिवस आठवले आणि सेल्फी काढण्याचा मोह सचिनला अनावर झाला. आपल्या मोबाईलच्या कॅमेरात सचिनने स्टेडियमच्या दिशेने सेल्फी टीपला…
AP2_22_2015_000031A