विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या पत्नी आणि मैत्रिणी यांनी त्यांच्यासोबत असावे का, याविषयी विविध मतप्रवाह आहेत. मात्र १९९९च्या विश्वचषकादरम्यान पत्नी सोबत असण्यावर बंदी असतानाही तिला आपल्या खोलीत लपवल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानचा माजी फिरकीपटू साकलेन मुश्ताकने केला आहे.
‘‘१९९९मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान आम्हाला पत्नी, कुटुंबीय यांना सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र उपान्त्य फेरीपूर्वी संघव्यवस्थापनाने पत्नी आणि कुटुंबीयांना सोबत नेण्याची परवानगी नाकारली. मी माझ्या पत्नीला सांगितले की मी तुला घरी पाठवणार नाही. मला आधार म्हणून तुझी गरज आहे. तू इथेच थांब. तिला आम्ही राहात असलेल्या हॉटेलांची यादी दिली. संघ दाखल होण्यापूर्वी ती माझ्या खोलीत येत असे. जेव्हा संघव्यवस्थापक किंवा प्रशिक्षक खोलीत येत असत तेव्हा ती कपाटात लपत असे,’’ असा खळबळजनक खुलासा साकलेनने केला आहे.
या संदर्भात गमतीदार किस्साही साकलेनने सांगितला. अझर मेहमूद आणि मोहम्मद युसूफ माझ्या खोलीत आले आणि थोडय़ा वेळात हसायला लागले. ते म्हणाले, ‘‘तुझी पत्नी खोलीत आहे, हे आम्हाला ठाऊक आहे आणि ती कपाटातून बाहेर येऊ शकते.’’
पत्नीप्रेमाचा आणखी एक धमाल किस्सा साकलेनने कथन केला. २००१मध्ये पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर होता. ख्राइस्टचर्च कसोटीदरम्यान पत्नीने सांगितले की, ‘‘माझ्यावर तुमचे खरेच प्रेम असेल तर या कसोटीत अर्धशतक झळकवा. प्रेम सिद्ध करण्यासाठी मी निग्रहाने खेळ केला आणि अर्धशतक केले. त्यानंतरही खेळपट्टीवर नांगर टाकत ७०पर्यंत पोहोचलो. मात्र माझ्या खेळाचा वेग अतिशय संथ होता. पत्नीने पुन्हा एकदा संदेश धाडला. तुम्ही माझ्यावर मनापासून प्रेम करत असाल तर तुम्ही शतक झळकवा. मी खूप दडपणाखाली होतो. कसोटी क्रिकेटमधील संथ शतकाचा विक्रम माझ्या नावावर झाला असता. दिवसअखेर मी ९८ धावांवर नाबाद राहिलो. पुढच्या दिवशी सकाळी ९९ धावांवर मी ४० मिनिटांसाठी खोळंबलो. मात्र त्यानंतर नॅथन अ‍ॅस्टलेच्या स्वैर चेंडूवर एक धाव घेऊन पत्नीची इच्छा पूर्ण केली.’’