विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात यष्टिरक्षक-फलंदाज सर्फराझ अहमदचा समावेश होता. मात्र संघाच्या संतुलनासाठी उमर अकमलवर यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. प्रमुख फलंदाजांच्या अपयशामुळे अखेर पाकिस्तानने सर्फराझला खेळवण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तान संघाचे नशीबच पालटले. बलाढय़ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक आणि ६ झेल तर आर्यलडविरुद्ध निर्णायक शतकी खेळी करत सर्फराझने पाकिस्तानला विजयपथावर आणले. सर्फराझचे आगमनाचे वर्णन ‘तो आला आणि ते जिंकू लागले’ असेच करता येईल.
मोहम्मद हफीझ आणि अहमद शेहझाद ही पाकिस्तानची नियमित सलामीची जोडी. मात्र स्पर्धा सुरू होण्याआधीच हफीझच्या पोटऱ्यांना दुखापत झाल्याने पाकिस्तानला धक्का बसला. सलामीवीर, उपयुक्त फिरकीपटू आणि चपळ क्षेत्ररक्षक हफीझ स्पर्धेबाहेर गेल्याने पाकिस्तान संघव्यवस्थापनाला डावपेचांमध्ये बदल करावा लागला. युनिस खानचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन शेहझादच्या साथीने युनिसला सलामीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र दोन्ही सामन्यांत हा प्रयोग सपशेल अयशस्वी ठरला. युनिसच्या जागी हॅरिस सोहेलला पाचारण करण्यात आले. त्याने शानदार खेळी करत संघाचा विश्वास सार्थ ठरवला. मात्र त्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने पाकिस्तानसमोर पुन्हा प्रश्न उभा राहिला. सर्फराझ विशेषज्ञ यष्टिरक्षक आणि सलामीवीर म्हणून खेळेल या विचाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी त्याला संघात समाविष्ट करण्यात आले आणि काय आश्चर्य.
दक्षिण आफ्रिकेच्या तेजतर्रार माऱ्यासमोर आत्मविश्वासाने खेळ करत त्याने ४९ धावांची खेळी केली. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना त्याने ६ झेल टिपत नवा विक्रम रचला. सर्फराझच्या अद्भुत कामगिरीमुळे इतके दिवस याला का संधी दिली नाही, असा प्रश्न संघव्यवस्थापनाला नक्कीच पडला असावा. आपण केवळ एका डावाचा चमत्कार नाही हे सिद्ध करत सर्फराझने आर्यलडविरुद्धच्या ‘करो या मरो’च्या लढतीत शतकी खेळीसह पाकिस्तानचे बाद फेरीचे तिकीट पक्के केले. गोलंदाजांसह हमखास चांगली कामगिरी करणारा हुकमी एक्का मिळाल्याने पाकिस्तान संघव्यवस्थापन सध्या आनंदित आहे. मात्र सर्फराझला सूर गवसल्याने प्रतिस्पध्र्याची डोकेदुखी वाढली आहे.