antrangधमाक्याचा आवाज कानात घुमू नये यासाठी कानांची प्रवेशद्वारेच बंद करण्यासाठी पोरेटोरे दोन्ही कानांना हातांच्या पंजांनी झाकतात किंवा कानांत एकेक बोट घालण्याची दक्षता घेतात आणि आपल्या सहकाऱ्यांना आणखी मागे जाण्यासाठी खुणावतात. मग त्यातला एक धीट पोरगा आस्तेआस्ते पुढे जातो. फटाक्यांतील महाफटाका ऊर्फ अ‍ॅटमबॉम्ब फटाका जमिनीवर ठेवतो. हलकेच त्याची वात पेटवतो अन् चपळाईने झपकन त्या अ‍ॅटमबॉम्बपासून बराच मागे मागे धाव घेतो. त्यानंतरचे काही क्षण उत्कंठेचे, प्रतीक्षेचे, अ‍ॅटमबॉम्ब फटाक्याच्या धमाक्याचे, त्या आवाजाने आसमंत दणाणून सोडण्याचे. श्वास रोखून पोरेटोरे बघत राहतात, फटाक्याची पेटवलेली वात फटाक्याला भिडण्याची अन् स्फोट होण्याची वाट पाहात राहतात, एकेक सेकंद मोजत राहतात. पाहाता पाहाता, पेटवलेली वात जळून भस्मसात होते. मग तोच प्रयोग नव्याने होतो. पुन्हा काही क्षण उत्कंठेचे अन् प्रतीक्षेचे; पण फटाका फुटतो तो आवाज देतो फुऽऽऽऽस!
सारेच ओम् फस्, बारच फुसका!
अगदी अस्साच प्रकार घडला १५ फेब्रुवारीला, अ‍ॅडलेड मैदानातील ४१ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने तसेच टेलीव्हिजनवरील करोडो प्रेक्षकांसमोर. सात फूट एक इंच उंचीचा (हो, ७ फूट १ इंच उंचीचा) महम्मद इरफान, साऱ्या भारतीयांना त्राही भगवान करून सोडणार, अशी भाकितं सर्रास केली जात होती. मोईन खानसारखा पाकिस्तानचा माजी कर्णधार ती भाषा करत होता आणि त्याच्या आधारावर पाकिस्तानी विजयाची स्वप्ने बघत होता. सामन्याआधी आपल्या संघाला उत्तेजन देण्यासाठी त्याच्याकडून तीच अपेक्षा होती; पण भारताचा माजी संघनायक राहुल द्रविडही भारताला सावधानतेचे इशारे देत होता.
इरफान धोकादायक
‘‘महम्मद इरफान हेच पाकिस्तानचे मुख्य अस्त्र, तोच असेल निर्णायक खेळाडू. त्याची गोलंदाजी मी अलीकडेच पाहिलीय. पाकिस्तानचा जलदगती मारा हे त्यांचे पारंपरिक शक्तिस्थान. भारतीय डावाच्या सुरुवातीलाच तो काही धक्के देऊ शकला, तर आफ्रिदीसारख्या फिरकीपटूचे काम सोपे होईल’’, अ‍ॅडलेड सामन्याआधी राहुल द्रविडने सांगितले  होते.
पाकिस्तानी कप्तान मिसबाह-उल-हक याने तीन हप्त्यांत इरफानची दहा षटके वापरली. पहिल्या ५ षटकांत २५ धावा, त्यानंतर २ षटकांत ७ अन् शेवटच्या हप्त्यात ३ षटकांत २५ धावा. गोळाबेरीज १०-०-५८-० म्हणजे परीक्षेत नापासच! त्याचा वेग जास्तीत जास्त ताशी १४९ किलोमीटर्सपर्यंत पोचलेला. हा वेग तुफानच; पण त्याच्याचप्रमाणे डावखुरा असलेल्या वहाब रियाझनेही एक-दोन चेंडू ताशी १४७ किलोमीटर्स गतीचे व नागपूरचा उमेश यादव तसेच उत्तर प्रदेशातील खेडय़ातून कोलकात्यात गेलेल्या मोहम्मद शमीचा वेगही ताशी १४५ पार करणारा. मग इरफानने सात फूट उंचीचा कोणता फायदा उठवला?
झंझावाती गोलंदाजाचे चेंडू, बॅटच्या पट्टय़ात मध्यभागी घेणे, फलंदाजांना कठीण जात असते. उसळते चेंडू बॅटच्या अगदी वरच्या भागात, कधीकधी हँडलवरही आघात करतात. कधी बॅटची उजवी-डावी किंवा बाहेरची-आतली कड घेऊन जातात; पण शिखर धवन, रोहित शर्मा व विराट कोहली यांनी ८० ते ९० टक्के चेंडू ‘मिडल’ केले, म्हणजे बॅटच्या पट्टय़ात मध्यभागी घेतले आणि सात-आठ टक्के चेंडू आरामात व्यवस्थित सोडून दिले. या त्रिकुटांपैकी कोहली चकवला गेला. तीनदा आफ्रिदीचा लेग-ब्रेक पूल केला, तेव्हा मिडविकेट सीमेपासून दहा मीटर्सवर यासिर शहा झेल पकडू शकला नाही. मग हॅरिस सोहेलच्या डावऱ्या फिरकीवर, कामचलाऊ यष्टिरक्षक उमर अकमल झेल टिपू शकला नव्हता आणि त्यापेक्षाही कोहलीला गंडवून पण यष्टींनाही गंडवून गेला होता सोहेल खानचा भेदक चेंडू; पण इरफानला हेही जमले नव्हते!
अनवाणी व स्पाइकस् शूज
मुलतान शहरापासून नव्वद मैलांवर असलेल्या गग्गू मंडी गावात टेनिस चेंडूने खेळणारा हा शाळकरी मुलगा उस्ताद नदीम इकबाल यांच्या नजरेत भरला. त्याच्या पायाच्या आकाराचे शूज पाकिस्तानात मिळतच नव्हते. इंग्लंडमधील एका मित्राकडून त्यांनी ते मागवून घेतले. दुसरी अडचण स्पाइक्सची. ते वापरण्याची सवय, अनवाणी खेळणाऱ्या या मुलाला असण्याचा प्रश्नच नव्हता; पण नईम इकबाल त्याच्या मानसिकतेशी समरस झाले होते. स्पाइक्सचे शूज घालून आस्ते आस्ते धावण्याचा व्यायाम त्यांनी करवून घेतला. ते शूज पायात ठेवण्यास तो सरावल्यावरच त्याच्या हाती चेंडू ठेवला. ताडमाड उंचीचे नाना फायदे, पण अशा उंचीतून नाना समस्या, नाना अडचणी. क्रिकेटची पांढरी पँट त्याच्यासाठी पाच फूट उंचीची म्हणजे जवळपास गुंडाप्पा विश्वनाथच्या उंचीची! त्या मोजमापाच्या रेडिमेड पँट मिळणार कुठे? मग ते काम दिले गेले एका क्रिकेटशौकिन शिंप्याला. पाच फूट लांबीच्या पँट अन् तीन-सव्वा तीन फूट लांबीच्या शर्टची ती विक्रमी मागणी!
घरात इरफानच्या झोपण्याची व्यवस्था काय केली जात होती आणि त्याला चटईवर (किंवा थंडीत चटईवरच्या रगावर) आराम करायला लागत होता काय, ते माहिती नाही; पण क्रिकेट दौऱ्यावर त्याला झोपावे लागे डबल बेडवर, तिरक्या रेषेत!
उस्तादांचे भाकीत
प्लॅस्टिक-पाइप फॅक्टरीतील या कामगाराची शिफारस उस्ताद नदीमनी केली प्रशिक्षक अकीब जावेद यांच्या राष्ट्रीय अ‍ॅकॅडमीकडे; पण प्रत्येक उगवत्या खेळाडूला नवनवीन प्रशिक्षकांच्या हातांखालून जावे लागते. इरफानही अकीब जावेद ते वकार युनूस अशांच्या मार्गदर्शनातून घडत आहे; पण या प्रक्रियेवर त्याचे मूळ प्रशिक्षक नाखूश आहेत. ‘‘या प्रक्रियेत तो घडतोय की बिघडतोय?’’ हा सवाल त्यांना सतावतोय.
ताडमाड उंची लाभलेला जोएल गार्नर, कॉलिन क्रॉफ्ट, कर्टली अ‍ॅम्ब्रोज तसाच डावखुरा ऑस्ट्रेलियन ब्रूस रीड खूप यशस्वी ठरले; पण कसोटी पदार्पणात ११ बळी घेणारा मुलतानी झहीद पाठदुखीने तडकाफडकी क्रिकेटबाहेर फेकला गेला. आता इरफानच्या वाटचालीविषयी त्याचे मूळ प्रशिक्षक साशंक आहेत. मोईन खान व राहुल द्रविड हे इरफानची खूप प्रशंसा करत असताना उस्ताद नदीम इकबाल भाकीत करत होते. ‘‘स्विंगविना यांत्रिकपणे मारा करणारा (हा बिघडत गेलेला) इरफान, भारतीय फलंदाजांना भेडसावू शकणार नाही. भारताच्या सामन्यावर छाप पाडू शकणार नाही!’’ उस्तादांना आपले भाकीत खरे ठरले याचा विषाद वाटत असेल, हे नक्की!