News Flash

पॉवर प्ले : दे धक्का!

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असं म्हटलं जात असलं तरी आतापर्यंत बरेच धक्के क्रिकेटजगतानं पचवले आहेत आणि त्यातलाच एक भूकंप सोमवारी न्यूझीलंडच्या नेल्सनमध्ये झाला.

| February 17, 2015 04:33 am

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असं म्हटलं जात असलं तरी आतापर्यंत बरेच धक्के क्रिकेटजगतानं पचवले आहेत आणि त्यातलाच एक भूकंप सोमवारी न्यूझीलंडच्या नेल्सनमध्ये झाला. ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, डॅरेन ब्राव्हो, मालरेन सॅम्युअल्स, डॅरेन सॅमी, दिनेश रामदिन, आंद्रे रसेल, लिडेंल सिमन्स या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूंच्या संघाला आर्यलडने पराभूत करून पुन्हा एकदा अनिश्चिततेची जाणीव करून दिली. मुळात अतिआत्मविश्वास, निष्काळजीपणा, गाफील राहण्याची सशासारखी वृत्ती वेस्ट इंडिजला नडली आणि चिकाटीने सातत्यपूर्ण खेळ करत आर्यलडने बाजी मारली.
गेल आणि स्मिथ दोघे जेव्हा फलंदाजीला आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मगरुरी दिसत होती. समोरच्या संघाला सहज मातीमोल करू, असा निर्धास्तपणा होता; पण आर्यलडचा हा विजय ‘फ्लूक’ नव्हता, हे स्पष्ट जाणवते, कारण त्यांनी वेस्ट इंडिजची ५ बाद ८७ अशी अवस्था केली होती. त्यानंतरही वेस्ट इंडिजने तीनशे धावांचा टप्पा गाठला; पण आर्यलडचा संघ डगमगला नाही. त्यांनी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या डोळ्यांत डोळे घालून खुन्नस दिली नाही, तर खेळावर लक्ष केंद्रित करत त्यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना नतमस्तक व्हायला भाग पाडले. आपल्या मनगटातील ताकदीच्या जोरावर जिद्द आणि विजिगीषु वृत्ती बाळगत आर्यलडने मिळवलेला हा विजय नक्कीच या विश्वचषकातील समीकरणे बदलू शकतो.
यापूर्वीही आर्यलडने मातब्बर संघांना धक्के दिलेले आहेत. गेल्या विश्वचषकात बंगळुरूला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केव्हिन ओ’ब्रायनच्या झंझावाती फलंदाजीमुळे आर्यलडने असाच एक धक्कादायक विजय नोंदवला होता आणि सामन्यानंतर आयरिश चाहत्यांनी स्टेडियमबाहेर एकच जल्लोष साजरा केला होता. २००७च्या विश्वचषकात आर्यलडने पाकिस्तानवर विजय मिळवत पहिला धक्का दिला होता. त्या वेळीच त्यांना गंभीरतेने घ्यायला हवे होते; पण तसे घडले मात्र नाही.
विश्वचषकातील धक्कादायक विजय म्हटला, की पहिल्यांदा डोळ्यांपुढे येतो तो भारताचा विश्वविजय. १९८३ च्या विश्वचषकात भारतीय संघ कोणाच्या खिजगणतीतही नव्हता. झिम्बाब्वेविरुद्धची कपिलच्या खेळीनंतर तरी वेस्ट इंडिजने सावध व्हायला हवे होते. अंतिम फेरीत भारतीय संघाला १८३ धावांवर तंबूत धाडल्यावर वेस्ट इंडिजने आपला विजय पक्का समजला होता. त्याच आविर्भावात ते होते. श्ॉम्पेनसह जल्लोषाची जय्यत तयारी त्यांनी केली होती; पण कपिलदेवने रिचर्ड्सचा अप्रतिम झेल टिपला आणि भारताने विश्वविजयाला गवसणी घातली. १९९९च्या विश्वचषकात भारताला असाच धक्का झिम्बाब्वेने दिला होता. सचिन तेंडुलकर वडिलांच्या निधनामुळे भारतात परतला आणि त्या वेळी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारत जिंकता जिंकता हरला होता. २००७च्या विश्वचषकात भारताला बांगलादेशने असाच एक धक्का दिला होता. सौरव गांगुलीच्या ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने १९२ धावांचे आव्हान बांगलादेशपुढे ठेवले होते आणि त्यांनी हे आव्हान लीलया पूर्ण केले.
२००३च्या विश्वचषकात तर केनियासारख्या संघाने थेट उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यांनी श्रीलंकेसारख्या मातब्बर संघाला पराभूत करत क्रिकेटविश्वाला मोठा धक्का दिला होता. न्यूझीलंडचा संघ उपस्थित राहू न शकल्याने केनियाला चार गुण मिळाले आणि बांगलादेश, कॅनडा या दोन्ही देशांना पराभूत करत त्यांनी ‘सुपर सिक्स’मध्ये स्थान मिळवले. ‘सुपर सिक्स’मध्ये झिम्बाब्वेला पराभूत करत उत्तम सरासरीच्या जोरावर त्यांनी उपांत्य फेरी गाठली आणि भारताने त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. भारत आणि केनिया यांच्यामध्ये दोन सामने झाले, ते दोन्ही भारताने जिंकले. भारताचे सध्याचे निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील हे त्या वेळी केनियाचे प्रशिक्षक होते.
झिम्बाब्वेने असेच बरेच धक्के विश्वचषकात दिले आहेत. भारताला १९९९ साली त्यांनी पराभूत केले होते, त्याच वेळी त्यांनी दक्षिण आफ्रिकेवरही मात केली होती. ऑस्ट्रेलियाला १९८३ सालीही त्यांनी पराभूत केले होते. भारताचे सध्याचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी नाबाद ६९ धावा आणि चार बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. १९९२ साली झिम्बाब्वेने इंग्लंडवर विजय मिळवला होता.
आतापर्यंत अनेक धक्के बसलेले असले तरी यानंतरही बसणाऱ्या धक्क्यांसाठी आपण तयार राहायला हवे. असे धक्के बसायलाही हवेत, कारण त्यामुळेच शर्यतीत गाफील न राहण्याचा धडा मिळत असतो. प्रत्येक प्रतिस्पर्धी हा घातकच असतो आणि प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्यासाठीच आपण सामना खेळत असतो, हे मनाशी पक्के करायला हवे. विश्वचषकाच्या तिसऱ्याच दिवसात पहिला धक्का बसला आहे. ‘आगे आगे देखो होता है क्या!’
प्रसाद लाड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 4:33 am

Web Title: shocking match of cricket world cup
टॅग : Cricket World Cup
Next Stories
1 विश्वचषक २०१५: प्रसारभारतीला स्वतंत्र वाहिनीची व्यवहार्यता तपासण्याचे आदेश
2 विश्वचषक २०१५: ‘जायंट किलर’ आर्यलड!
3 परंपरा.कॉम!
Just Now!
X