wclogoचोकर्स, कचखाऊ संघ, हा शिक्का दक्षिण आफ्रिकेच्या बलवान संघावर बसायला सुरुवात झाली, ती आठवते? ‘‘मित्रा, तुझ्या हातातून नुसता चेंडू निसटलाय विश्वचषक!’’ असा जगप्रसिद्ध टोमणा कांगारू कर्णधाराने दक्षिण आफ्रिकेच्या हर्शेल गिब्सला मारला होता, तो आठवतो?
तो किस्सा १९९९मधील सातव्या विश्वचषकाचा, गटवार प्राथमिक साखळीपाठोपाठ, अव्वल सहा संघांतील सामन्याचा. ५० षटकांत २७२ धावांचे आव्हान, पण १२व्या षटकात. ३ बाद ४८ अशी कांगारूंची खराब सुरुवात. मग स्टीव्ह वॉ खेळू लागला कर्णधारासह. मंत्रमुग्ध झालेला रिकी पॉन्टिंग खुशीत म्हणाला, ‘‘कप्तानसाहेब झकास खेळत आहेत, त्यांचा खेळ डोळ्यांत साठवून ठेवतोय. किती परिपूर्ण फलंदाजी; जणू त्यानं अंगावर चिलखतच चढवलंय!’’
पण अचानक स्टीव्हची एकाग्रता भंग पावली. मिडविकेटच्या दिशेने त्यानं सोपा झेल दिला. क्रिकेटच्या भाषेत लॉलीपॉपसारखा. अन् तिथे जगातील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गिब्स उभा होता. पण अतिउत्साहाच्या जोशात त्यानं केली धांदल! हाताच्या पकडीत चेंडू घट्ट पकडून ठेवण्याआधीच झेल साजरा करण्याची घाई केली; चेंडू हवेत उंच फेकला आणि नीट झेलण्याऐवजी, हातातून जमिनीवर सांडू दिला. त्यावर स्टीव्हचं भाष्य, ‘‘मित्रा, तुझ्या हातातून निसटलाय तो नुसता चेंडू नव्हे, तर विश्वचषकच!’’
ही कथा, की दंतकथा? क्रिकेटपरिवारात तिला स्थान मिळालंय सत्यकथेचं. पण हे नाटय़ घडलं तेव्हा नॉनस्ट्रायकर असलेल्या पॉन्टिंगचं मत थोडं वेगळं आहे. स्टीव्हच्या तोंडून हे शब्द उच्चारले गेले असल्यास, निदान आपण तरी ते ऐकलेले नव्हते, असं तो कायम सांगत आलाय. ‘‘स्टीव्हची सवय शेरे मारण्याची आहे. पण तो मैदानात बोलत राहतो ते तोंडातल्या तोंडात. हा किस्सा कसा पसरत गेला, ते सांगणं कठीण. आपण मैदानात काही बोललो असलो, तर त्याची जाहीर वाच्यता करणे त्याच्या स्वभावात बसत नाही. क्रीडांगणातील गोष्टी क्रीडांगणातच बंदिस्त असाव्यात, हाच आहे त्याचा स्वभावधर्म!’’
दिव्यदृष्टी!
पण याच सामन्याआधी ऑस्ट्रेलियन संघाची बैठक होती. ती बैठक संपण्याच्या सुमारास शेन वॉर्न बोलू लागला, ‘‘फलंदाजीसाठी जाताना, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. गिब्सच्या दिशेने तुम्ही झेल उडवलाच, तर स्वत:ला झेलबाद समजून पॅव्हेलियनचा रस्ता पकडण्याची घाई करू नका. त्याने चेंडू झेलण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, याची आधी नीट खात्री करून घ्या. कारण चेंडू हाती लागताक्षणी तो हवेत फेकण्याची सवय त्याला लागलेली आहे.’’
घडलंही तस्सच! काय म्हणावं याला. शेन वॉर्नचे चपखल निरीक्षण की दिव्यदृष्टी!
चार दिवसांनंतर हेच दोन संघ आमने-सामने आले. तिथल्या गोंधळाने दक्षिण आफ्रिकन संघावरचा कचखाऊ किंवा चोकर्स हा शिक्का अधिकच ठसठशीत झाला. बर्मिगहॅममधील एजबॅस्टनवर त्यांना आव्हान २१४ धावांचं. ४५व्या षटकात जॅक कॅलिसला (९२ चेंडूत ५३) शेन वॉर्नने चकवलं. पण डावखुऱ्या लान्स क्लुसनरची बेहोश आतषबाजी चालूच; फक्त १६ चेंडूंत नाबाद ३१. त्यात एक षटकारासह चार चौकार. वॉर्न व मॅकग्रा यांची त्यांच्या वाटय़ाची १०-१० षटकं संपलेली. शेवटच्या षटकासाठी जलदगती डॅनियल फ्लेमिंग. क्लुसरनला साथ देण्यास ११वा अ‍ॅलन डोनॉल्ड – ९ बाद २१३. सामना धावबरोबरीत. याआधी कलिनन व एलवर्दी धावचीत झालेले. आता क्लुसनर धावचीत होता होता वाचलेला. मग चौथ्या चेंडूवर अनावर क्लुसनर धावत सुटला. डोनाल्ड जागच्या जागी खिळलेला. दोघेही जण गोलंदाजांकडील क्रीझमध्ये. फ्लेमिंगने भान राखलं. चेंडू जमिनीलगत, सरपटी दिला यष्टीरक्षक गिलख्रिस्टकडे. डोनॉल्ड सहज धावचीत. सामना टाय, बरोबरीत आणि आधीच्या फेरीतील विजयाच्या आधारे, ऑस्ट्रेलिया विजयी! द. आफ्रिका पुन्हा एकदा कचखाऊ.
गिलख्रिस्टला शौक, सामन्यातील यष्टी संग्रहित करण्याचा. पण त्या धांदलीत, तोही धावला गोलंदाज फ्लेमिंगपर्यंत! आपल्या बाजूची यष्टी न उखडता, २२ यार्डावरील यष्टी संपादन करण्यासाठी!
घाबरगुंडी-घसरगुंडी
गेल्या विश्वचषकात त्यांना न्यूझीलंडकडून आव्हान २२२चे. बांगलादेशमधील मिरपूरची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी. पहिल्या षटकासाठी द. आफ्रिकेने चेंडू दिला, स्पिनर पीटरसनकडे, तर किवींनी नॅथन मॅक्क्युलम-व्हेटोरी या जोडीकडे. द. आफ्रिकेने अर्धी मजल नीट मारली. २४ षटकांत २ बाद १०८. त्यानंतर १९ षटकांतील ६४ धावांत ८ फलंदाज गारद! द. आफ्रिकेने कच खाल्ली, ४९ धावांनी हरली.
तीच गत त्याआधी ९६च्या विश्वचषकात कराचीत झालेली. हॅन्सी क्रोनिएचा बोलबाला तेव्हा जबरदस्त. उपांत्यपूर्व फेरीत ब्रायन लारा ९४ चेंडूंत १११ आणि विंडीजची मजल २६४, दक्षिण आफ्रिका ३ बाद १८६ वरून सर्व बाद २३२, म्हणजेच शेवटचे ७ जण ४६ धावाच जमवू शकले. ही घसरगुंडी कुणापुढे? गोलंदाजीपेक्षा फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या जिमी अ‍ॅडम्स व किथ आर्थर्टनच्या कामचलाऊ फिरकीपुढे!
या साऱ्या पचकापचकीवरही कहर केला, तो मायभूमीवरील गोंधळाने. सामना २००३च्या विश्वचषकातला दरबानच्या किंग्जमेड मैदानातला. श्रीलंका ५० षटकांत ९ बाद २६८. दक्षिण आफ्रिकन डाव रंगत असताना पावसाची स्पष्ट लक्षणे. ४४.५ षटकांत ६ बाद २२९. अशा अवस्थेत डकवर्थ-लुईस नियमावलीनुसार, त्यांना विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज. पण दक्षिण आफ्रिकन प्रशिक्षक व कर्णधार शॉन पोलॉक यांनी त्या नियमावलीचे ताजे छापील कोष्टक धड अभ्यासले नव्हते. त्यांनी फटकेबाज मार्क बाऊचर व लान्स क्लुसनर यांना आदेश पाठवला, कोणत्याही परिस्थितीत बाद होऊ नका, धाव काढली नाही तरी चालेल!’’ या आत्मघातकी आदेशाचे तंतोतंत पालन झाले व आफ्रिकी आत्मघातावर शिक्कामोर्तब झाले!..आणि आता भारताविरुद्ध मेलबर्नला, विश्वचषकाच्या १७ सामन्यांत डी’व्हिलियर्ससारखा मोहरा चौथ्यांदा धावचीत! चापल्याचा, धावा चोरण्याच्या गतीचा अभिमान सार्थ, पण त्याचा अतिरेक अंगावर उलटणारा!
 वि. वि. करमरकर