भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवला असला तरी पुढच्या सामन्यात त्यांच्यापुढे दक्षिण आफ्रिकेचे कठीण आव्हान असेल, असे मत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
‘‘पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीयांनी एकेरी धावांवर भर दिला होता; पण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षण चांगले असून त्यांच्याविरुद्ध खेळताना धावांसाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागेल,’’ असे सचिनला वाटते.
‘‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीयांना एकेरी धाव घेणे सोपे नसेल, कारण त्यांचे क्षेत्ररक्षण दमदार असते. त्यांच्या क्षेत्ररक्षणाचे कवच भेदणे सोपे नसते. त्यांच्या वेगवान वावरामुळे संपूर्ण मैदानात ते क्षेत्ररक्षण करत असतात, त्याचबरोबर त्यांची चेंडूफेकीही उत्तम असल्यामुळे भारतीय फलंदाजांना धावा काढणे फार सोपे नसेल,’’ असे सचिनने एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना सांगितले.
सचिनने या वेळी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनवर बारकाईने नजर ठेवण्याचा सल्लाही संघाला दिला आहे.
‘‘स्टेन हा दक्षिण आफ्रिकेचा मुख्य गोलंदाज आहे आणि त्याची गोलंदाजी ही अविश्वसनीयच असते. त्याची गोलंदाजी कुणीही गृहीत धरू शकत नाही. तो दिवस त्याच्यासाठी वाईट असेलही; पण त्याच्या गोलंदाजीचा सन्मान करायलाच हवा. त्याची गोलंदाजी बारकाईने पाहायला हवी आणि त्यानंतरच त्याच्या गोलंदाजीवर फटके खेळायला हवेत,’’ असे सचिन म्हणाला.
पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने जिंकला असला तरी रोहित शर्माला मोठी खेळी साकारता आली नव्हती. याबद्दल सचिन म्हणाला की, ‘‘रोहितवर तुम्ही दडपण आणू नका, त्याच्या डोक्यामध्ये संदिग्धता भरू नका. रोहितला कशालाही घाबरण्याची भीती नाही. पुढच्या वेळी नक्कीच त्याच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळेल.’’