News Flash

पॉवर प्ले : रं ग त-सं ग त

ठेच लागल्यावर माणूस शहाणा होतो असे म्हणतात, या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याबाबतीतही असेच म्हणता येईल.

| March 18, 2015 02:31 am

wc04ठेच लागल्यावर माणूस शहाणा होतो असे म्हणतात, या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याबाबतीतही असेच म्हणता येईल. गटातील दोन मोठय़ा संघांकडून पराभव पत्करावा लागल्यावरही त्यांनी अन्य सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत बाद फेरीत स्थान पटकावले आहे. आफ्रिका आणि श्रीलंका या संघांमध्ये उपांत्यपूर्व सामना होणार असून, यापूर्वी या दोन्ही देशांमध्ये विश्वचषकात चार सामने झाले आहेत. या चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली असून, श्रीलंकेला एका सामन्यात विजय मिळाला आहे, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
आपली स्वत:ची ओळख निर्माण झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १९९२ साली पहिल्यांदा विश्वचषकात पाऊल ठेवले. या विश्वचषकात त्यांचा श्रीलंकेबरोबरचा सामना चांगलाच अटीतटीचा झाला, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. अर्जुन रणतुंगा यांनी चमकदार अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. रणतुंगा (२) आणि डॉन अनुरासिरी (३) यांनी आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना बाद करत त्यांच्यावर अंकुश ठेवला. त्यामुळे आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करताना १९५ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रोशन महानामाने (६८) संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण अ‍ॅलन डोनाल्डने त्यांची ४ बाद ८७ अशी अवस्था केली. सामना अखेरच्या षटकापर्यंत पोहोचला. रणतुंगा यांच्या नाबाद ६४ धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने १ चेंडू आणि तीन विकेट्स राखून सामना जिंकला.
१९९९च्या विश्वचषकात लान्स क्लुसनर हा आफ्रिकेसाठी नायक ठरला होता आणि या विश्वचषकात त्याने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेला पराभूत केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेची ८ बाद १२२ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर क्लुसनरने नाबाद ५२ धावांची खेळी साकारल्यामुळे आफ्रिकेला १९९ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना क्लुसनर आमि जॅक कॅलिस यांनी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत श्रीलंकेचा डाव ११० धावांमध्ये गुंडाळला.
२००३च्या विश्वचषकातील सामना तर आफ्रिकेने जिंकता जिंकता बरोबरीत सोडवला. माव्‍‌र्हन अटापट्टूच्या १२४ धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २६८ धावा केल्या. पावसामुळे आफ्रिकेला ४५ षटकांमध्ये २३० धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. हर्षल गिब्सने (७३) चांगली सुरुवातही करून दिली, पण क्लुसनरसारख्या फलंदाजाला ८ चेंडूंमध्ये फक्त एकच धाव करता आली आणि सामना अनपेक्षितपणे बरोबरीत सुटला.
२००७च्या विश्वचषकातील या दोन्ही संघांतील सामना चांगलाच चुरशीचा झाला होता. तिलकरत्ने दिलशान (५८) आणि रसेल अरनॉल्ड (५०) यांच्या अर्धशतकांमुळे श्रीलंकेने २०९ धावांपर्यंत मजल मारली होती. कॅलिस (८६) आणि ग्रॅमी स्मिथ (५९) यांनी आफ्रिकेला विजयाचे स्वप्न दाखवले, पण हे दोघे बाद झाल्यावर आफ्रिकेचा डाव गडगडला. मात्र त्यांच्या अखेरच्या जोडीने कसा बसा सामना जिंकून दिला.
यंदाच्या विश्वचषकात हे दोन्ही संघ पाचव्यांदा आमनेसामने आले आहेत. श्रीलंकेचा विचार केला तर कुमार संगकारा हा भन्नाट फॉर्मात आहे, तिलकरत्ने दिलशानही चांगली फलंदाजी करत आहे, पण महेला जयवर्धनेला मात्र अजूनही सूर गवसलेला नाही. गोलंदाजीमध्ये मात्र एकाही खेळाडूला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. लसिथ मलिंगाकडे चांगला अनुभव असला, तरी त्याला छाप पाडता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना मात्र ते अधिक फिरकी गोलंदाजीचा उपयोग करतील. आफ्रिकेचा संघ हा ‘चोकर्स’ या नावाने ओळखला जातो. ऐनवेळी ते कच खाताना दिसतात. साखळी फेरीत त्यांची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. फलंदाजीमध्ये हशिम अमला आणि कर्णधार ए बी डि’व्हिलियर्सवर अवलंबून असलेला दिसतो. गोलंदाजीमध्ये डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल यांनाही अजून सूर गवसलेला दिसत नाही. पाचव्या गोलंदाजाची समस्या आफ्रिकेला चांगलीच जाणवेल. एकंदरीत दोन्ही संघ चांगलेच तुल्यबळ आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांतील सामना चांगला अटीतटीचा होईल, अशी क्रिकेट चाहत्यांना आशा असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 2:31 am

Web Title: south africa hope to shrug off chokers tag against sri lanka
Next Stories
1 ऑस्ट्रेलियातून.. : तिकिटासाठी कायपण..!
2 BLOG : थांबा, थांबा! आधी बांगलादेशला हरवायचंय!
3 विश्वचषक प्राथमिक परीक्षेचा निकाल
Just Now!
X