अमाप गुणवत्ता असलेले प्रतिभावान खेळाडू हे दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक संघाचे वैशिष्टय़ मानले जाते. मात्र मोक्याच्या क्षणी कच खाण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ही सगळी प्रतिभा मातीमोल ठरते. यंदा अद्भुत खेळासाठी प्रसिद्ध ए बी डी’व्हिलियर्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने ‘चोकर्स’ हा शिक्का पुसण्याचा निर्धार केला आहे. बुधवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोरचे पहिले आव्हान आहे ते श्रीलंकेचे.
दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीत दोनदा चारशे धावांचा डोंगर उभारत दणदणीत विजय मिळवले. मात्र भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या पराभवांनी त्यांचे कच्चे दुवे प्रकर्षांने समोर आले. फलंदाजीत डी’व्हिलियर्सवर त्यांची भिस्त आहे. हशिम अमला, क्विंटन डि कॉक, फॅफ डू प्लेसिस, जे पी डय़ुमिनी, डेव्हिड मिलर, रिले रोसू अशी फलंदाजांची मोठी फळी आफ्रिकेकडे आहे. मात्र एकालाही सातत्यपूर्ण प्रदर्शन करता आलेले नाही.
गोलंदाजीत इम्रान ताहीरने प्रत्येक सामन्यात बळी मिळवण्याची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेची ताकद असलेल्या वेगवान त्रिकुटाला अद्यापही लय सापडलेली नाही. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल आणि व्हरनॉन फिलँडर यांनी एकत्रित सुरेख कामगिरी केल्यास ते श्रीलंकेला अडचणीत टाकू शकतात. वेन पार्नेल, फरहान बेहरादीन आणि रिले रोसू या तिघांपैकी एकाची निवड दक्षिण आफ्रिकेसाठी अवघड निर्णय ठरेल.
 दुखापतींनी वेढलेल्या श्रीलंका संघाला कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान यांनी तारले आहे. सलग चार सामन्यांत चार शतके झळकावणारा अनुभवी संगकारा श्रीलंकेचा हुकमी एक्का आहे. अष्टपैलू दिलशानने पाचव्या गोलंदाजाची समस्याही सोडवली आहे. साखळी फेरीत एकमेव शतकानंतर महेला जयवर्धनेला सातत्य राखता आलेले नाही. लहिरू थिरिमाने, कुशल परेरा आणि उपुल थरंगा ही दुसऱ्या फलंदाजांची फळी कमकुवत आहे.
अँजेलो मॅथ्यूज आणि थिसारा परेरा या अष्टपैलू खेळाडूंमुळे श्रीलंकेचा संघ समतोल जाणवत आहे. रंगना हेराथ बोटाच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने श्रीलंकेच्या चिंतेत भर पडली आहे. लसिथा मलिंगालाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. न्यूवान कुलसेकरा, सुरंगा लकमल हे मलिंगाला अपेक्षित साथ देऊ शकलेले नाहीत. सदोष शैलीचे निराकरण करून आलेला सचित्र सेनानायके आणि सीक्युगे प्रसन्न यांना सिडनीची खेळपट्टी साहाय्यकारी ठरू शकते.
काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती. श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवण्याची किमया दक्षिण आफ्रिकेने केली होती. या दोन देशांदरम्यानची प्रत्येक लढत अटीतटीची होते. बुधवारी होणारा सामनाही याला अपवाद नाही.
महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांच्यासाठी ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असणार आहे. साखळी फेरीचा अडथळा पार केल्यानंतर या जोडगोळीवर श्रीलंकेला उपांत्य फेरीत नेण्याची मोठी जबाबदारी आहे. हॅन्सी क्रोनिए, शॉन पोलॉक या कर्णधारांना जे स्वप्न प्रत्यक्षात साकारता आले नाही ते स्वप्न पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी डी’व्हिलियर्सच्या खांद्यावर आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या निमित्ताने संगकारा आणि डी’व्हिलियर्स यांच्यात द्वंद्व चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

सामना क्र.:४३ 
द. आफ्रिका वि.श्रीलंका

स्थळ : सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी   
वेळ : सकाळी ९ वा. पासून

बोलंदाजी
मी एकच सांगू इच्छितो की या वेळी चोकर्स हा शिक्का आमच्यावर बसणार नाही. दर्जेदार खेळासह जिंकण्याचा आमचा मानस आहे. गोष्टी किचकट करण्यापेक्षा सोपं करून खेळण्याचा आमचा निर्धार आहे
– ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)

नाणेफेक सामन्याचा निर्णय ठरवेल असे वाटत नाही. खेळपटय़ा चांगल्या आहेत. अनेक संघांनी तीनशे किंवा त्यापेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग केला आहे. एखाद्या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारून तीनशे धावा केल्या म्हणजे सामना संपला असे नाही
-अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)

संघ
श्रीलंका :  अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लाहिरु थिरिमाने, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, कुशल परेरा, सीकुगे प्रसन्ना, रंगना हेराथ, न्यूवान कुलसेकरा, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, दुश्मंत चमीरा, थिसारा परेरा, सचित्र सेनानायके, उपुल थारंगा,
दक्षिण आफ्रिका : ए बी डी’व्हिलियर्स, हशिम अमला, क्विंटन डि कॉक, फॅफ डू प्लेसिस, डेव्हिड मिलर, जेपी डय़ुमिनी, रिले रोसू, इम्रान ताहीर, आरोन फँगिसो, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, व्हरनॉन फिलँडर, वेन पार्नेल, कायले अबॉट, फरहान बेहराडीन,

खेळपट्टी
खेळपट्टी कोरडी असून, मात्र ती संथ आणि फिरकीला साथ देणारी नाही. पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मात्र जोरदार पावसाची अपेक्षा नसल्याने कमी षटकांचा सामना पूर्ण होऊ शकतो.

आमने सामने
सामने : ५९
श्रीलंका : २९ ’ दक्षिण आफ्रिका : २८ ’ टाय / रद्द : २

* दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात बाद फेरीचे सर्व सामने गमावले आहेत. १९९२, ११९६, २००७ आणि २०११ मध्ये बाद फेरीत झालेल्या पराभवांमुळे त्यांच्यावर चोकर्स हा शिक्का मारण्यात येतो. १९९९ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत त्यांनी बरोबरीत सोडवली.
* एकमेकांविरुद्ध खेळलेल्या नऊ एकदिवसीय सामन्यात डेल स्टेनला कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेला एकदाही बाद करता आलेले नाही.
* शैलीदार आणि कलात्मक फलंदाजीसाठी प्रसिद्ध अनुभवी महेला जयवर्धनेची एकदिवसीय प्रकारात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सरासरी केवळ २२.८९
* २०११ विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात १३ एकदिवसीय सामने झाले आहेत. यापैकी श्रीलंकेने ७ तर दक्षिण आफ्रिकेने ६ जिंकले आहेत.
* शेवटच्या दहा षटकांत दक्षिण आफ्रिकेने ५.४४ इकॉनॉमी रेटने धावा देत प्रतिस्पध्र्याना रोखले आहे. यंदाच्या विश्वचषकातील साखळी फेरीत ६ पेक्षा कमी दराने धावा देणारा एकमेव संघ.
* २०११ विश्वचषकानंतरच्या एकदिवसीय सामन्यांत, २५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने फक्त तीन सामने जिंकले आहेत तर दहा सामने गमावले आहेत.
* विश्वचषक साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या ४ ते ७ क्रमाकांच्या फलंदाजांनी मिळून ७६.२१च्या सरासरीने १०६७ धावा केल्या आहेत. मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

श्रीलंका दक्षिण आफ्रिकेवर सरशी साधेल
न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांचा होरा
वेलिंग्टन : श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना नेहमीच रंगतदार होतो. बुधवारी होणाऱ्या सामन्यात श्रीलंका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बाजी मारेल असा होरा न्यूझीलंडचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी व्यक्त केला. दक्षिण आफ्रिका-श्रीलंका मोठा सामना आहे. सिडनीच्या खेळपट्टीवर खेळणे सोपे नाही. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारावी आणि मोठी धावसंख्या उभारणे हेच उद्दिष्ट असावे. सिडनीची खेळपट्टी लक्षात घेता श्रीलंकेचा संघ धोकादायक आहे.

हेराथचा सहभाग अनिश्चित
श्रीलंकेचा प्रमुख फिरकीपटू रंगना हेराथ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार की नाही, याविषयी साशंकता आहे. इंग्लंडविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना डावखुऱ्या हेराथच्या डाव्या हातालाच दुखापत झाली. त्याच्या बोटाला चार टाके पडले आहेत. सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित सराव सत्रात हेराथने केवळ पाच चेंडू टाकले. यानंतर दुखापतीचा त्रास जाणवत असल्याने हेराथने माघार घेतली.