News Flash

अब की बार..

विश्वचषक म्हटला की मातब्बर संघ आले आणि त्या संघांतले आपल्यावर खेळाचे गारूड करणारे खेळाडूही. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी जसे कोणता संघ जिंकणार याचे चर्वितचर्वण सुरू होताना

| February 14, 2015 04:35 am

विश्वचषक म्हटला की मातब्बर संघ आले आणि त्या संघांतले आपल्यावर खेळाचे गारूड करणारे खेळाडूही. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी जसे कोणता संघ जिंकणार याचे चर्वितचर्वण सुरू होताना दिसते, तसेच कोणता wc11खेळाडू चमकणार, कोणत्या खेळाडूची फलंदाजी पाहायला मजा येणार किंवा कोणाची गोलंदाजी किती घातक ठरणार, यावर चर्चा घडायला सुरुवात झाली आहे. या गुणी खेळाडूंवर सध्या क्रिकेटजगताची नजर असून त्यांच्या नजाकतभऱ्या कामगिरीसाठी सारेच उत्सुक आहेत.
यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ तर गुणी खेळाडूंची खाण आहे, सर्वच एकापेक्षा एक सरस. एकाने चांगला खेळ केला नाही तर दुसऱ्याचा पर्याय खुला. सलामीला येणारा डेव्हिड वॉर्नर कोणत्या चेंडूवर कधी चाल करेल, हे सांगणे कठीण. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर गोलंदाजीची कत्तल तो बेमालूमपणे करतो. शेन वॉटसनसारखा अष्टपैलू खेळाडू म्हणजे कधीही काहीही करून संघाला विजय मिळवून देणारा. कर्णधार मायकेल क्लार्क आणि जॉर्ज बेली कधी सहजपणे प्रतिस्पध्र्याच्या हातून सामना हिरावून घेतील, सांगणे सोपे नाही. स्टिव्हन स्मिथ म्हणजे धावांचा भुकेला, सामन्यागणिक त्याची भूक वाढतच चाललेली. ग्लेन मॅक्सवेल नावाप्रमाणेच मोठी खेळी साकारणारा. गेल्या आयपीएलमध्ये त्याच्या तडफदार फलंदाजीचा नमुना अजूनही डोळ्यांपुढे आहेच. अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करणारा यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिन त्यांच्याकडे आहे. जेम्स फॉल्कनर म्हणजे फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, संघाला पराभवाच्या दाढेतून बाहेर काढण्याची किमया साकारणारा. गोलंदाजीकडे वळल्यावर मिचेल जॉन्सन हे पहिले नाव डोळ्यांपुढे येते आणि त्याच्या गोलंदाजीतला भेदकपणाही. कोणत्याही फलंदाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बाद करण्याची क्षमता जॉन्सनकडे आहे. मिचेल स्टार्क हा युवा गोलंदाजही सध्या भन्नाट फॉर्मात आहे. जोश हॅझेलवूडने आपल्या वेगवान माऱ्याच्या जोरावर साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
ए बी डि’व्हिलियर्स आणि डेल स्टेन ही दोन्ही नावे अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अग्रस्थानावर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच सर्वाधिक जलद शतक झळकावण्याचा विश्वविक्रम डि’व्हिलियर्सने रचला आहे. चेंडू कुठेही टाकला तरी तो सीमापार धाडण्याचे कसब डि’व्हिलियर्सकडे आहे. आपल्या तुफानी खेळींच्या जोरावर तो अजून कोणता विश्वविक्रम रचतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. हशिम अमला म्हणजे धावांची ‘रनमशीन’च आहे. सातत्याने धावा करण्याचा वसा त्याने घेतलेला दिसतो. क्विंटन डी कॉक या युवा सलामीवीराने अल्पावधीत जास्त धावा आणि प्रसिद्धी मिळवली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये नावारूपाला आला तो डेव्हिड मिलर. आपल्या घणाघाती फलंदाजीने त्याने गोलंदाजांना नाचवले आहे. संघातील फलंदाज जर एकामागोमाग धारातीर्थी पडायला लागले तर डाव सावरण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडे जे पी डय़ुमिनी आहे. सुरुवातीला सावध फलंदाजी करत खेळी उत्तमपणे बांधण्याची कला त्याच्याकडे आहे. स्टेन हे त्यांचे प्रमुख अस्त्र असेल. आपल्या वेगवान आणि अचूक गोलंदाजीने त्याने जगातील सर्वच फलंदाजांची भंबेरी उडवली आहे, त्यामुळे त्याच्या प्रत्येक चेंडूवर क्रिकेट जगताची नजर असेल. त्याला या वेळी मॉर्ने मॉर्केलची सुरेख लाभेल. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलत प्रत्येक चेंडूला तो उसळी देऊ शकतो.
न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमही तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याला रॉस टेलर आणि केन विल्यमसन या अनुभवी खेळाडूंची चांगली साथ मिळेल. कोरे अँडरसन हा या विश्वचषकातील लक्षणीय ठरू शकतो. आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एकहाती सामना अँडरसन फिरवू शकतो. गोलंदाजीमध्ये टिम साऊदी हा जबरदस्त फॉर्मात असलेला वेगवान गोलंदाज आहे.
श्रीलंकेकडे कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशान हे अनुभवी फलंदाजांचे त्रिकूट आहे. श्रीलंकेला जर सामना जिंकायचा असेल तर फलंदाजीमध्ये ते मुख्यत्वेकरून या तिघांवर अवलंबून असतील आणि गोलंदाजीच्या जोरावर त्यांना सामना जिंकायचा असेल तर लसिथ मलिंगा हे त्यांचे ब्रह्मास्त्र असेल. मलिंगा जर पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर या खेळपट्टय़ांवर तो फलंदाजांना नाचवू शकतो. वेस्ट इंडिजकडे ख्रिस गेल नावाचा झंझावात आहे. हा झंझावात आल्यावर भल्याभल्यांना लोटांगण घालावे लागते. वेस्ट इंडिजसाठी गेल हा सर्वात महत्त्वाचा फलंदाज असेल आणि त्याच्या खेळीवरच संघाचे जय-अपयश अवलंबून असेल. इंग्लंडकडे जेम्स अँडरसनसारखा ‘चॅम्पियन’ गोलंदाज आहे, अचूक आणि भेदक माऱ्याच्या जोरावर त्याने क्रिकेट जगतामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. फलंदाजीमध्ये इयान बेल आणि इऑन मॉर्गन या दोघांवर इंग्लंडच्या फलंदाजीची भिस्त असेल. अनुभव पणाला लावत या दोघांनी आतापर्यंत बरेच सामने जिंकवून दिले आहेत.
भारताच्या संघात बरेच ‘सेलिब्रेटी’ क्रिकेटपटू आहेत, पण फॉर्मात कुणीही नाही. विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक. एके काळी ज्याच्या मागे धावा धावायच्या, तोच सध्या धावांचा दुष्काळ भोगताना दिसत आहे. रोहित शर्माकडे मोठय़ा खेळी साकारण्याची क्षमता आहे, तो पुन्हा तिसरे द्विशतक झळकावणार का, हीच त्याच्याबाबतीतली उत्सुकता असेल. अजिंक्य रहाणेने परदेशातील खेळपट्टय़ांवर कसा खेळ करायचा, हे दाखवून दिले आहे. महेंद्रसिंग धोनी सर्वोत्तम ‘मॅच फिनिशर’ असला तरी सध्या त्याला मोठी खेळी साकारता आलेली नाही.
यंदाच्या विश्वचषकापूर्वी हे सारे खेळाडू चर्चेत आहेत, पण यांच्यामधला कोणता तारा कधी चमकेल आणि निखळेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 4:35 am

Web Title: strong cricketers in icc world cup
Next Stories
1 आफ्रिकन लढाई
2 वादाची राख..
3 ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिकेला पसंती
Just Now!
X