दूरदर्शनवर क्रिकेट विश्वचषकाचे सामने प्रसारित करण्यासाठी स्वतंत्र वाहिनी सुरू करण्याबाबत प्रसारभारतीला त्यांची भूमिका मांडण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले. विश्वचषकाचे सामने प्रसारित करावयाचे झाल्यास खास विश्वचषक सामन्यांसाठीच स्वतंत्र नवी वाहिनी सुरू करण्याची तयारी प्रसारभारतीची आहे का? आणि असल्यास त्याबाबतची व्यवहार्यता तपासण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने प्रसारभारतीला दिले.
दूरदर्शनवर सामने प्रसारित झाल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते अशी भूमिका घेत बीसीसीआय आणि प्रक्षेपण वाहिनी स्टार समूहाने न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली न्यायालयाने बीसीसीआय आणि स्टार समूहाच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर प्रसारभारतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. दूरदर्शन विनाशुल्क फीड वापरत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागते अशी भूमिका स्टारने पुन्हा एकदा मांडली. मात्र गेल्या सात वर्षांपासून दूरदर्शन थेट प्रक्षेपणाचे फीड वापरत आहे. प्रक्षेपण असेच सुरू राहावे असा निर्णय न्यायामूर्ती रंजन गोगोई आणि पिनाकी चंद्रा घोष यांच्या खंडपीठाने दिला होता. यावरील पुढील सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेट रसिकांना कोणत्याही अडचणींना सामोरे न जाता क्रिकेट सामने पाहण्याचा आनंद अनुभवता आला पाहिजे अशी भूमिका मांडून दोन्ही पक्षांनी आर्थिक वाद आपापसांत सोडवणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.