24 February 2021

News Flash

विश्वचषकातील तिसरा मुंबईकर

‘विश्वचषक स्पर्धेतील तिसरा मुंबईकर,’ असं म्हटल्यावर चटकन व सर्वप्रथम डोळ्यांपुढे नाव येतं ते धवल कुलकर्णीचं!

| February 21, 2015 06:07 am

‘विश्वचषक स्पर्धेतील तिसरा मुंबईकर,’ असं म्हटल्यावर चटकन व सर्वप्रथम डोळ्यांपुढे नाव येतं ते धवल कुलकर्णीचं! अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा यांसह, पण राखीव खेळाडू म्हणून ठेवलेल्या धवलचं. ऑस्ट्रेलियन दौऱ्याआधीपासूनच तंदुरुस्त नसलेल्या भुवनेश्वर कुमारला पर्याय म्हणून ठेवलेल्या धवलचं. भारतीय wclogoसंघातील एक मोहरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं तो भुवनेश तंदुरुस्त नसल्याचा दु:खद निर्णय अखेर घेतला गेला काय आणि धवलचा अंत पाहणारी प्रतीक्षा संपवण्यात आली असावी काय, हेच प्रश्न कुणाच्याही मनापुढे आले असते.
पण सत्य हे कथा-कादंबऱ्या, तसेच तर्कशुद्ध निष्कर्ष, यापेक्षा वेगळे असू शकते. तिसऱ्या मुंबईकराची कहाणीही तशीच मजेशीर आहे. मुंबईच्या रणजी संघाची दारे ज्याला उघडता येत नव्हती, त्याच्या हाती नियतीने दिल्या झगमगत्या विश्चषकाच्या कुलुपाच्या चाव्या. त्यासाठी अट घातली ती मुंबईतील खडतर स्पर्धात्मक क्रिकेटला रामराम ठोकून, दुबईचा आसरा घेण्याच्या शॉर्टकटचा. या अक्कलहुशारीतून प्रकाश पाटील व स्वप्निल पाटील बनले एका भरारीचे नायक! अन् स्वप्निल पाटील बनला, विश्वचषकातील तिसरा मुंबईकर!
केवळ दुबईत नोकरी पत्करल्याने सारे प्रश्न थोडेच सुटत होते? संयुक्त अरब अमिरातीच्या निवडीसाठी पात्र होण्याकरिता, स्वप्निलला नियमांनुसार चार वर्षे उमेदवारी करावी लागणारच होती. फॉर्म टिकवून धरावयास हवा होता, नावाचा दबदबा निर्माण करावयाचाच होता. त्यातला निर्णायक टप्पा, विश्वचषक पात्रता स्पर्धेचा. अंतिम फेरीत स्कॉटलंडशी नाबाद ९९ची खेळी, त्याचे असे वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण करू शकणारी ठरली. मधल्या फळीत ४३ वर्षीय खुर्रम खानसह आधारस्तंभ व त्याचा संभाव्य वारसदार व यष्टीरक्षक अशी त्याची प्रतिमा साकार होऊ लागली.
घर सोडण्यास तय्यार!
क्रिकेटच्या माध्यमातून करिअर बनवावे, नशीब अजमवावे, अशी स्वप्ने आज देशातील लाखो मुले व त्यांचे पालक बघत असतील. त्यातील पाटील पिता-पुत्रांच्या कहाणीचा एक धागा मजेशीर. क्रिकेट प्रशिक्षण वर्ग जोपासत राहण्यासाठी प्रकाश पाटीलांनी आपले घर सोडण्यास नकार दिला. नागपूरला होणारी बदली नाकारली. अन् स्वेच्छानिवृत्ती पसंत केली ती वयाच्या पन्नासाव्या वर्षी, पण त्याच प्रकाशभाईंनी, आपल्या मुलाची मुंबईत होणारी कोंडी फोडण्यासाठी दुबईहून आलेला प्रस्ताव स्वप्निलसाठी स्वीकारला. स्वप्निल वय वर्षे वीस, शिक्षण दहावी उत्तीर्ण, रवाना केला फलंदाज-यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दुबईला!
मुंबईतर्फे १४, १९ व २२ वयोगटांत तसेच मुंबई कोल्ट्स संघात स्वप्निलची निवड झाली होती. २०००-२००१ तसेच २००४-२००५ या दोन्हीही मोसमात, मुंबईच्या रणजी संघातील निवडक ३० जणांमध्ये त्याचं नाव होतं. पण पहिल्या १५मध्ये तो स्थान मिळवू शकत नव्हता. वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून तो दहावी उत्तीर्ण झाला. त्याचे गुण फक्त ४८ टक्के. ‘‘अभ्यास करत राहा, अशी सक्ती मी त्याच्यावर कधीही केली नाही. त्याचा कल क्रिकेटकडेच होता. तेच त्याचं शक्तिस्थान आहे, हे मी ओळखलं होतं!’’ प्रकाशभाई सांगतात.
स्वत: प्रकाश पाटील बऱ्यापैकी क्रिकेटपटू. टाइम्स ढाल स्पर्धेत, चौगुलेतर्फे ‘फ’ ऊर्फ सहाच्या गटात फलंदाजीचे आणि ‘सी’ अन् ‘डी’ म्हणजे तिसऱ्या-चौथ्या गटात गोलंदाजीचे बक्षीस महाबँकेतर्फे या डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूने पटकावलेले. वसई व डहाणू येथे मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे प्रशिक्षण वर्ग निदान तपभर चालवलेले. मुलाचे वैफल्य त्याच्यातील क्रिकेटपटू समजू शकत होता. दुबईतील शिव पगरानी यांच्या योगी ग्रुपतर्फे, गोव्याचे रणजीवीर आम्बे पर्वतकर यांनी प्रस्ताव दिला. पाटीलांनी क्रिकेटतज्ज्ञांचा सल्ला घेतला, होकार कळवला. तिथेच स्वप्निलची गाडी आली. त्यासाठी गाडीचा ट्रॅक बदलण्याचा निर्णय अचूक व ‘लाख’मोलाचा!
ट्रॅक बदलला!
ट्रॅक अचूक बदलला आणि गाडी व्यवस्थित चालू लागली! स्वप्निल स्वयंशासित बनू लागला. जेवणात तळलेले पदार्थ, वडा-भजी, कटाक्षाने टाळू लागला. मटण-चिकन तात्पुरते तरी बंद. आधी त्याचे पोट अकाली वयाच्या विशी-बाविशीत, सुटलेले, पण प्रयत्नपूर्वक त्याने पाच-सहा किलो वजन घटवले. त्याचे मालक वडीलभावासारखे. सुरुवातीस त्याला रिसेप्शनिस्ट ठेवले. मग सेल्स एक्झिक्युटिव्ह बनवले. सुरुवातीचा पगार असावा सुमारे २०-२२ हजार रुपये. तो किमान तिप्पट वाढवला. आता स्वतंत्र फ्लॅट व ऑफिस कामकाजासाठी गाडीही दिली.
विश्वचषकाच्या पदार्पणात झिम्बाब्वेसमोर स्वप्निलची कामगिरी सनसनाटी नसली, तरी अपेक्षा निर्माण करणारी, २८व्या षटकांत ३ बाद १२२ अशा अवस्थेत, तो पाचव्या क्रमांकावर आला. मग तीन षटकांतच ४ बाद १३४. धावगती अवघी साडेचार आणि पायाभरणी असमाधानकारक. तरीही स्वप्निलच्या ३८ चेंडूंत चार चौकारांसह ३२ धावा. मग यष्टीरक्षण करताना, दहा वाइड चेंडूंसह ४८ षटकांत त्याने एकही बाय दिली नाही व एक झेल टिपला.
घर सोडले, दुबई गाठले, वैफल्यातून थोडय़ाफार यशाकडे वाटचाल केली. त्यातून स्वप्निलला लाभली उमेद व आत्मविश्वास. घर सोडून स्वत:च्या पायांवर उभे राहताना त्याच्यातील सुप्त गुणही फुलले. वडील प्रकाशभाई चळवळे. प्रा. सदानंद वर्टी, नवनीत शहा, पंढरी चौधरी, डॉमिनिक गोन्सालवीस, तसेच भाऊसाहेब मोहोळ यांच्या परिवारातले. मुलांत सामाजिक जाणिवा. आज फारशा दिसत नाहीत. पण त्याला वडीलधाऱ्यांची केवढी आस्था! मुलगा पालकांना दरमहा पैसे पाठवतोच. पण आजी, आत्या यांनाही आठवणीने पाठवतो! विश्वचषकानंतर गुणी मुलाची दृष्ट काढावी, असेच त्याच्या आई-वडिलांना वाटतेय!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 6:07 am

Web Title: swapnil patil third mumbai player in world cup
Next Stories
1 शॉनचे बाबा!
2 दक्षिण आफ्रिका भारताला हरवेल!
3 भुवी सज्ज
Just Now!
X