भारत-पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच उत्सुकतेने पाहिले जातात. विश्वचषकाच्या फायनलपेक्षा आपल्याकडील मंडळी या सामन्याला जास्तच महत्त्व देतात. विश्वचषक जिंकला नाही तरी चालेल, पण हा सामना आपल्याला जिंकायला हवा, अशी आपल्याकडील मानसिकता दिसते. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या wc06पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधली जशी स्पर्धा असते तशीच आशिया खंडातली ही स्पर्धा असते. आत्तापर्यंतचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड आपण पाहिला तर तो एकदमच ‘हायक्लास’ आहे, आपण एकदाही पाकिस्तानकडून हरलेलो नाही.. आणि ही एक अहंकार सुखावणारी भारतीयांसाठी गोष्ट आहे, पण एका बाजूने आपण विचार केला तर एखाद्या पॉइंटनंतर माणूस म्हणून, खेळाडू म्हणून किंवा कलाकार म्हणून मला असं वाटतं की, या सामन्याला वेगळा आकार किंवा वेगळं स्वरूप येऊ नये. खेळ हा स्पोर्टिगलीच खेळला जावा. आजही शेवटच्या बॉलला जावेद मियाँदादने मारलेला सिक्सर, ही एक अश्वत्थामाची भळभळती जखम अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनात भळभळत आहे. काही करा, पण त्यांच्याकडून हरू नका, अशी एक मानसिकता असते आणि एकूणच वेगवेगळ्या लीडर्सनी कसं हे द्वेष वाढेल, याच्या बिया पेरलेल्या आहेत. एखाद-दोन जणांमुळे पाकिस्तान हा देशच घाणेरडा आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण भारत-पाकिस्तान यांच्या सामन्यांनंतर जेव्हा खेळाडू हस्तांदोलन करतात, मला सगळ्यात जास्त चित्र ते बघायला आवडतं. यामधून एक चांगला संदेश दिला जातो, एक स्पर्धा होती आणि तिच्याकडे आम्ही फार विजिगीषुवृत्तीने बघितलं जातं, ही माझ्यासाठी एक माणूस म्हणून फार सुखावणारी गोष्ट आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपल्याकडे जसे दिग्गज होऊन गेले तसे त्यांच्याकडे इम्रान खान, वसिम अक्रम होऊन गेले. त्यांच्याकडेही फार गुणवान खेळाडू होते. या सामन्याकडे फक्त स्पर्धा म्हणून बघावं. मला स्वत:लाही असंच वाटत की हा सामना आपण जिंकलाच पाहिजे, त्याला जे एक विषारी स्वरूप दिलं जातं ते थोडं खटकतं किंवा त्याचा त्रास होतो. सरतेशेवटी हा एक खेळ आहे, त्यामध्ये जिंकण्याची ईर्षां असावी, पण सामना संपल्यावर निकाल स्पोर्टिगली घ्यायला हवा. या खेळाडूंमध्ये स्पोर्टिगली वातावरण असतं. शाहिद आफ्रिदी आपल्या सचिन तेंडुलकरशी गोड हसताना दिसलेला आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये जर चांगले वातावरण असेल तर ते आपल्यामध्येही असायला हवं, सकारात्मक वृत्ती असायला हवी. दोन्ही संघातील खेळाडूंनी जर ते सकारात्मक पद्धतीने घेतलेलं असलं तर ते विषारी आपण का करायला हवं.
विश्वचषकाबाबत बोलायचं झालं तर पाकिस्तानबरोबरचा आपला ट्रॅक रेकॉर्ड अप्रतिमच आहे. १९९२ साली पाकिस्तानने विश्वचचषक जिंकला असला तरी त्यांना भारताला हरवता आलं नव्हतं. विश्वचषक जिंकण्यापेक्षा पाकिस्तानबरोबर आपण जिंकायला हवं, असं आपण अल्पसंतुष्टपणे या गोष्टीकडे पाहतो. या सामन्यात सचिन नाही, हे सत्य आहे आणि शेवटी तुम्हाला ते स्वीकारावं लागणारच आहे. सचिनचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्वितीय असाच होता. तो जेव्हा निवृत्त झाला तेव्हा क्रिकेटवजा सचिन बाकी सारं शून्य राहातं, असं बऱ्याच जणांना वाटत होतं. मलाही त्या वेळी तसंच वाटत असलं तरी हा त्रास मला कपिल देव, सुनील गावस्कर यांच्याबाबतीतही झाला होता. अरे आता ते खेळणार नाही, ते आता रिटायर्ड होतायत हे मन कुठे तरी स्वीकारत नाही, पण ते स्वीकारायला लागेल. पण विराट कोहलीकडे जर आपण बघितलं तर त्याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे, सचिनला जेवढे सामने पहिले शतक झळकवायला लागले त्यापेक्षा किती तरी कमी सामने कोहलीला लागले. आत्ता जे खेळाडू आहेत त्यांच्यावर आपण प्रेम करायला पाहिजे. त्यांच्या पाठिशी एक चाहता म्हणून आपण ठाम उभे राहायला हवं, ही आपली जबाबदारी आहे. रोहित शर्माकडे आपण पाहिलं तर त्याची फलंदाजी ही नेत्रदीपक असते. एक चेंडू किती पद्धतीने फटकावता येऊ शकतो, याचे पर्याय त्याच्याकडे आहेत. पण गोलंदाजीमध्ये तशी दहशत म्हणावी तशी नाही.
२०११चा विश्वचषक आपल्याकडे असल्यामुळे चांगली तयारी झाली होती. तेव्हा जी काही वातावरणनिर्मिती झाली होती, ती आत्ताच्या घडीला दिसत नाही. पण हळूहळू वातावरण निर्माण होईल. भारतीय संघाचेही सध्या असेच काहीसे दिसते. गेल्या काही सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आलेला नसला तरी यापुढे नक्कीच ते विजय मिळविण्याची प्रयत्नांची पराकाष्टा करतील.
वर्तमानपत्रांमध्ये वाचलं की खेळाडूंवर विश्वचषकासाठी काही र्निबध घालण्यात आले आहेत आणि जर पुन्हा खेळावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर अशा गोष्टी व्हायला हव्यात. खेळामध्ये गंमत आहे, त्याचा आनंद लुटायला हवा. जर खेळाडूंनी आनंद लुटला नाही तर तर प्रेक्षकांनाही सामना बघताना मजा येणार नाही. तुम्ही खेळाचा आनंद लुटा आणि तो आम्हालाही द्या, एवढंच म्हणणं आहे.
शब्दांकन : प्रसाद लाड