विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत केवळ शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची नसून सामन्याची तंदुरुस्ती अधिक महत्त्वाची असते. क्षेत्ररक्षण करताना व एकेरी-दुहेरी धावा काढताना ही तंदुरुस्ती उपयोगी पडते. आपल्या संघातील सध्या तीन-चार खेळाडूंमध्ये ही तंदुरुस्ती नाही. या खेळाडूंची तंदुरुस्तीची चाचणी त्वरित केली पाहिजे. ते जर तंदुरुस्त नसतील तर त्यांच्या जागी पर्यायी खेळाडूंना संधी दिली पाहिजे. या तंदुरुस्तीवरच भारताचे या स्पर्धेतील भवितव्य अवलंबून आहे.
संघातील अंतिम ११ खेळाडू निवडतानाही खेळाडूंच्या अगोदरच्या कामगिरीला प्राधान्य न देता सामन्यासाठी शंभर टक्के तंदुरुस्त असणाऱ्यांनाच संधी दिली पाहिजे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू मोलाची कामगिरी करतात, हे लक्षात घेऊनच स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा यांना या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्याची संधी आहे. भारताचा कर्णधार धोनीला विश्वचषकाचा भरपूर अनुभव आहे. त्याने प्रत्येक सामन्याचे नियोजन करताना हवामान, खेळपट्टी याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. अंतिम ११ खेळाडू निवडताना हे नियोजन उपयोगी पडणार आहे. या नियोजनाची योग्य रीतीने अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याची रणनीतीच सामन्याचे चित्र बदलू शकते.
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या दोन्ही संघांना अनुकूल प्रेक्षक, वातावरण व खेळपट्टी याचा फायदा मिळणार आहे. या दोन्ही संघांचे खेळाडू यंदाच्या मोसमात सातत्याने चमक दाखवीत आहेत. या दोन संघांबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा संघही विजेतेपदाचा दावेदार आहे. आफ्रिकेचे खेळाडू ‘चोकर’ची उपमा पुसून टाकतील अशी मला खात्री आहे. यंदा त्यांच्या संघाची चांगली घडण झाली आहे. भारताने योग्य रीतीने रणनीती ठेवीत खेळ केला व तंदुरुस्तीवर भर दिला तर तेदेखील विजेतेपदाचे दावेदार असतील.
भारताप्रमाणेच पाकिस्तान व श्रीलंका या संघांतील खेळाडूंना कमी षटकांचे सामने खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. आशियाई देशांचे आव्हान त्यांच्यावरच आहे.
संकलन : मिलिंद ढमढेरे

चंदू बोर्डे, माजी क्रिकेटपटू