wclogविश्वचषकाची उपांत्य फेरीची लढत ४८ तासांवर आली असताना भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघातील अन्य सहकाऱ्यांच्या सोबत बसून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कला लिहिलेले पत्र-
प्रिय मायकेल,
मी आणि माझ्या सर्व संघसहकाऱ्यांचा तुला साष्टांग नमस्कार!
तुझ्यासमोर येऊन बोलण्याचे माझ्यात धाडस नाही म्हणूनच हा पत्रप्रपंच.
भारतापेक्षा आमचे मानसिक सामथ्र्य चांगले आहे, आम्ही त्यांचा खेळ जवळून पाहिलाय, असे तुमचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड म्हणाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे ती पराभवाची मालिका लक्षात ठेवावी आणि मदानात उतरावे, असे अष्टपलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल म्हणाला. एवढेच कशाला, सट्टेबाजारानेही कौल दिलाय की, आम्ही तुमच्याविरोधात अजिबात जिंकू शकत नाही.. आणि हे आम्हाला सारे मान्यच आहे. यापूर्वी झालेल्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तुम्ही आम्हाला अक्षरश: लोळवले आहे. त्यामुळे तुमच्यासमोर येण्याच्या विचारानेच आमचा अवसानघात झाला आहे. आमचे पाय लटपटत आहेत. तुम्ही आम्हाला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत नक्की धूळ चारणार, अशीच माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची ठाम समजूत आहे. आत्मविश्वास हरवलेला वेस्ट इंडिज संघ, सूर हरवलेला पाकिस्तान, नशिबाशी झगडा करणारा दक्षिण आफ्रिका, िलबू-टिंबू आर्यलड, नवसाक्षर संयुक्त अरब अमिराती, चाचपडत असलेला झिम्बाब्वे आमच्या ‘ब’ गटात होते. आम्ही आमच्या गटात पहिले होतो, याला तसा काहीच अर्थ नाही. केवळ आम्ही ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ ठरलो. गटामध्ये तशी सोपीच आव्हाने अधिक. तेव्हा आम्हाला वचकून राहण्याची तुम्हाला गरज नाही. बघा ना, तुमच्या गटामध्ये शेवटी आलेला बांगलादेशचा संघ आम्हाला बाद फेरीत मिळाला. केवळ नशिबानेच आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो आहोत. आम्ही काय आहोत, हे तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही. आमचा खेळ कसा आहे, हे तुम्ही कुणापेक्षाही जास्त जाणता. मिसबाह उल हकला वाटतंय की, आम्हीच जिंकू! हा त्याचा अतिविश्वास ठेवण्याचा आशियाई स्वभाव समजावा. आशियातले दुसरे कुणीच उरलेले नाही, तर निदान भारत तरी जिंकावा, अशी त्याची बालिश आशा आहे. लहान मुलाचे भाबडे विचार समजून तुम्ही त्याकडे कानाडोळा करावा ही विनंती. प्रतिस्पर्धी संघाचे सात सामन्यांत ७० बळी आम्ही मिळवले. या आकडेवारीला काही अर्थ नाही. मोहित शर्मा ‘बाऊन्सर’चा वापर करतो. आखूड टप्प्याचे चेंडू हे त्याचे महत्त्वाचे अस्त्र आहे, हे आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. याआधीच्या आमच्या खेळांच्या चित्रफिती तुम्ही वारंवार अभ्यासल्या असतीलच. मोहम्मद शमी आणि उमेश यादवचा वेग कितीही वरच्या दर्जाचा असो, हेझलवूडची त्यांना सर नाही. मिचेल स्टार्कला पाहिले तरी आमचे हृदय धडधडते. ऑस्ट्रेलियातर्फे मुख्य फिरकीपटू असेल ग्लेन मॅक्सवेल. त्याच्यापुढे आमचा आर. अश्विन अजून नवखाच आहे. रवींद्र जडेजा तर युवराज सिंगच्या जागी आलोय, याच अपराधी भावनेतून बहुधा खेळतोय.
डेव्हिड वॉर्नर, आरोन िफच, स्टीव्हन स्मिथ, तू स्वत:, शेन वॉटसन, मॅक्सवेल.. नुसती नावे घेतली तरी घाम फुटतो. विश्वचषकात आजपर्यंत सर्वाधिक वेळा तुम्ही उपान्त्य फेरी गाठली आहे. सलग तीन वेळा तुम्ही विश्वचषकावर नाव कोरले आहे. तुमची बरोबरी करणे आम्हाला स्वप्नातही शक्य नाही.
आम्ही तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ तुमच्या देशात आहोत, याचा अर्थ असा होत नाही की आम्ही तुमच्या खेळपट्टय़ांना सरावलो आहोत. या खेळपट्टय़ांवर आखूड टप्प्याचे चेंडू टाकून आम्ही तुम्हाला कोंडीत पकडूच शकणार नाही. वहाब रियाझने तुम्हाला चांगलेच नाचवले होते. पण रियाझप्रमाणे गोलंदाजी करणे, भारतीय गोलंदाजांना शक्यच होणार नाही, असे आमचे माजी गोलंदाज प्रशिक्षक जो डॅवेस यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा! शिवाय उपलब्ध दिवसांत सिडनीची खेळपट्टी तुम्ही तुमच्या बाजूने कौल द्यावी अशी तयार करून घेतली असणारच, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. रोहित शर्मा सुरुवातीला किती बॉल फुकट घालवतो, हे तुम्हाला माहीत आहेच. त्याच्याकडून तुम्हाला अजिबात भीती नाही. उलट रोहित वेळ घेऊन आमची धावगती संथ करतो.
सुरेश रैना तर आल्या आल्या फटके मारतो. कारण एकच, यंदा साहेबांना कर्तव्य आहे! मदानात उभे राहून वेळ घालवण्यापेक्षा मदानाबाहेर वधुपरीक्षा करीत फिरायचे, यासाठीच रैना घाईत असतो. तेव्हा रैनाबद्दल तर मुळीच काळजी नसावी. विराट कोहली तर प्रत्येकावर चिडतो. सगळे काही मीच करणार असा त्याचा रुबाब असतो. त्याच्या या स्वार्थीपणामुळे आम्ही मेटाकुटीस आलो आहोत. केवळ अनुष्काला खूष करण्यासाठी तो खेळतोय, असा मला दाट संशय आहे. अजिंक्य रहाणे तर मी म्हणेन ते करायला तयार होतो, असे तुम्हाला वाटते. प्रत्यक्षात अजिंक्य मी सांगेन तेवढेच करतो. माझा तो सर्वात आज्ञाधारी खेळाडू आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. त्याच्यापासून तर तुम्हाला काहीच भीती बाळगायची गरज नाही. शिखर धवन तर स्वत:च्याच प्रेमात असल्यासारखा असतो. यांची आपआपसात इतकी भांडणे आहेत की विचारता सोय नाही. यांच्या नाकदुऱ्या काढून मी दमलो आहे. आता माझ्या बुद्धीलाही शीण जाणवतोय. माझे शांत असणे कधीच संपले आहे. मी आता भर मदानातच माझ्या सहकाऱ्यांवर ओरडताना दिसतो. या ‘दमलेल्या धोणीची कहाणी’ मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडली आहे. तुम्ही झोपेत खेळलात तरी आम्ही हरूच तुमच्याशी, कारण खेळण्याच्या विचारानेच आमची झोप उडाली आहे. आम्ही प्रचंड निराश आणि पराभूत मन:स्थितीत आहोत. इतिहास तुमच्याबरोबर आहे. तुम्ही आम्हाला हरवणार आहात, तेव्हा बिनधास्त या!
कळावे, लोभ नसावा, ही विनंती. तसदीबद्दल क्षमस्व. धन्यवाद!
तुझा विनयशील प्रतिस्पर्धी,
माही