इतिहासाची पाने चाळली तर क्रिकेटचा उल्लेख सोळाव्या शतकापासून सुरू होतो. सुमारे चारशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी या खेळाचा शोध लावला होता. हळूहळू ब्रिटिशांनी या खेळाचा प्रसार जगभरात करायला सुरुवात केली. उत्तर इंग्लंडमध्ये पोहोचण्यापूर्वी हा खेळ उत्तर अमेरिकेत पोहोचला होता. त्यानंतर वेस्ट इंडिया आणि wc08ईस्ट इंडिया कंपन्यांच्या माध्यमातून याचे आगमन भारतात झाले.
इंग्रजांनी ऑस्ट्रेलियाचा शोध लावला. मग आरोपी आणि कैद्यांना शिक्षा देण्याकरिता इंग्रजांनी ऑस्ट्रेलियामध्ये पाठवायला सुरुवात केली. या निमित्ताने क्रिकेटला ऑस्ट्रेलियातदेखील प्रवेश मिळाला. काळाबरोबर क्रिकेटचा प्रसार जगभरात झाला होता आणि पाहता पाहता बऱ्याच देशांमध्ये हा खेळ लोकप्रिय झाला. एकोणिसाव्या शतकापासून इंग्लंडने ऑस्ट्रेलियात क्रिकेट स्पध्रेचे आयोजन करायला सुरुवात केली आणि अशा रीतीने या दोन देशांमधील क्रिकेट महायुद्ध सुरू झाले. क्रिकेट जगतामधील हे सर्वात जुने महायुद्ध आहे. ऑस्ट्रेलियाचा जन्म आणि पालन पोषण जरी इंग्रजांच्या हाती झाले असले तरी या दोन संस्कृतींमध्ये बरेच अंतर आहे.
जवळपास साऱ्या जगावर राज्य करणारा इंग्लंड हा एक छोटासा देश. इकडे वर्षांचे अधिक महिने तापमान थंडच असते. आकाशात ढगांची दाट चादर असल्यामुळे सूर्याचे दर्शन कमीच घडते. इंग्लंडचे नाव घेताच लांब जाडजूड कोट घातलेली माणसे डोळ्यांसमोर येतात. ती बोलायला लागली की थंडीमुळे त्यांच्या तोंडातून धूर बाहेर पडताना दिसतो.
नीटनेटके कपडे, गोरा वर्ण, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि स्वतला शिष्टाचारी समजणाऱ्या इंग्रजांचा क्रिकेट हा खेळ. खेळाबद्दलच प्रेम, चांगली खेळाडूवृत्ती आणि जगज्जेतेपद प्राप्त करण्याची जिद्द इंग्रजांमध्ये ठासून भरली आहे. पण स्वतला जंटलमन म्हणणाऱ्यांची ऑस्ट्रेलियाबाबतची वृत्ती वेगळी आहे. आरोपी आणि कैद्यांपासून सुरुवात झलेल्या या देशात उद्धट आणि उर्मट लोकच असू शकतात, अशी बहुतेकांची धारणा असावी. त्याशिवाय त्यांनी शोध लावलेल्या खेळात हे खालच्या स्तराचे लोक कसे उत्तम असू शकतात?
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलखंडात एक प्रचंड मोठा, तरुण आणि प्रगत देश. अन्न, पाणी, स्वच्छ हवा, अफाट किनारा म्हणजे ‘पोस्टकार्ड पर्फेक्ट’ देखाव्याची या देशात कमी नाही. स्वच्छ मोकळे आकाश, छान उबदार ऊन, स्वतंत्र विचार, आत्मविश्वास, जिद्द, कुणालाही न जुमानता जे योग्य वाटेल ते करण्याची लक्षवेधी वृत्ती. गेल्या दोन शतकांत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या सावलीतून बाहेर पडून आपले एक वेगळे व्यक्तिमत्त्व कोरले आहे. प्रत्येक खेळात विषेशत क्रिकेटमध्ये गेली बरीच वर्षे ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले आहे आणि आता इंग्रजांच्या खेळात त्यांना हादरे देत आहे.
गेल्या वर्षी त्याने इंग्लंडचा धुव्वा उडवून अ‍ॅशेस परत घरी आणला. दोन्ही संघांत जमीन अस्मानाचा फरक आहे. पण ज्या फॉर्मात सध्या ऑस्ट्रेलिया आहे, त्यात त्यांचा पराभव करायला खरे तर चमत्कारच व्हावा लागेल.