तेच नाटय़, तेच नाटक. प्रतिपक्षाचा एक मोहरा मिळवण्यात पंचांकडून तडकाफडकी मिळालेली निर्णायक साथ. तिथे २००२मध्ये भारत-पाक दुसऱ्या कसोटीत कोलकाता येथे पंच होते सचिन तेंडुलकरचा छळ करणारे wclogoडॅरेल हार्पर यांचे थोरले बंधू स्टीव्ह बकनर. आता पर्थमध्ये त्यांची भूमिका बजावत होते ब्रिटिश पंच नायजेल लाँग. कोलकातात पंचांच्या निर्णयाचा शिकार झालेला सचिन हा साऱ्या भारतीयांचा जीव की प्राण. पण पर्थमध्ये पंचांनी घेतलेला बळी अजून सुपरस्टार न झालेला अजिंक्य रहाणे हा मात्र बहुसंख्य भारतीय क्रीडा पत्रकारांकडून अनुल्लेखाने बाजूस सारलेला.
या दोन्हीही फलंदाजांविरुद्ध यष्टिरक्षकाने झेल पकडल्याच्या अपिलात एक महत्त्वपूर्ण साम्य. तेव्हा सचिनविरुद्ध, तर आता अजिंक्यविरुद्ध झेलबादचा कौल मागणाऱ्या अपिलात जोशाचा अभाव. यष्टिरक्षकाचे अपील अजिंक्यबाबत अधिकच हलक्या आवाजातले. तेव्हा पाकिस्तानी यष्टिरक्षक कामरान अकमलच्या अपीलला गोलंदाज रझाकची अजिबात साथ नव्हती. त्यामुळे खवळलेल्या यष्टिरक्षकाने गोलंदाजाला हातवारे करून बजावले की तूही आवाज दे, मला एकाकी पाडू नकोस! याही वेळी गोलंदाज केमार रोचचे अपील नाममात्र. अपील करून पाहावे असेच रोच व यष्टिरक्षक दिनेश रामदिन यांचे अपील.
पंच लाँग मात्र आपल्या निवाडय़ाबाबत नि:शंक होते. सौम्य अपिलानंतर काही सेकंदांतच त्यांची तर्जनी उंचावली. ते बोट वर करण्याआधी त्यांची कोणतीही चलबिचल झालेली दिसली नाही. त्यापेक्षाही आश्चर्याची व चिंतेची बाब म्हणजे पंच लाँग यांचा निर्णय उचलून धरण्यासाठी टीव्ही पंच न्यूझीलंडचे बिली बाऊडन यांना फारसा वेळ घेण्याची आवश्यकता भासली नाही. मैदानी पंचांना उपलब्ध नसलेली अ‍ॅक्शन रिप्ले-स्निकोमीटर आदी अत्याधुनिक यंत्रणा टीव्ही पंचांच्या हाताशी होती. त्या यंत्रणेतून कोणत्या गोष्टी प्रकाशात येत होत्या?
दिशाबदल
ताशी ८५-९० मैल (ताशी १३५-१४५ किमी) वेगाने सोडलेला चेंडू, बॅटचा स्पर्श झाल्यास दिशा हमखास बदलणारच ना? पण तेव्हा सचिनबाबत व आता अजिंक्यबाबत यष्टिरक्षकाकडे जाताना चेंडूने दिशा अजिबात बदललेली नव्हती. यातून कोणता अर्थ निघू शकतो? कोणत्याही परिस्थितीत तडकाफडकी वा तात्काळ निर्णय घेण्यासाठी कोणता आधार त्यातून पंचांनी शोधला?
अजिंक्यबाबत स्निकोमीटरही बॅटला चेंडू लागल्याचं स्पष्टपणे दाखवत नव्हता. थोडा आवाज होत होता, तो चेंडू बॅट किंवा पॅडला लागल्याचा असू शकतो. अशा परिस्थितीत संशयाचा फायदा फलंदाजालाच दिला जायला हवा होता. पंचांनी तसं का केलं नाही?
भारत जिंकलाय, बस्स झालंय अशा भावनेत हा विषय टीकाकारांनी गुंडाळला असू शकेल. पण असा प्रकार विराट कोहली वा धोनीबाबत घडला असता, तर त्याची बरीच जास्त दखल घेतली गेली असती. अजिंक्य पडला बिचारा पोरका!
पाच तोफांचा तोफखाना
पर्थची वाका खेळपट्टी तेज व उसळत्या माऱ्यास हात देणारी. यष्टिरक्षकाने तीस यार्ड मागे उभं राहावं, इतपत ती आता स्फोटक राहिलेली नसली, तरी किंबहुना जलद गोलंदाजीस झुकते माप देणारी. अशा खेळपट्टीवर सुलेमान बेन या एकमेव डावखुऱ्या फिरकीपटूला रजा द्यायची आणि जेरॉम टेलर, जेसन होल्डर, आंद्रे रसेल यांसह केमार रोचला उतरवायचं. डॅरेन सॅमी बहुधा गोलंदाजीसाठी तंदुरुस्त नसावा. म्हणून ड्वेन स्मिथ व सॅम्युअल्स यांच्यात उरलेली दहा षटकं वापरावीत. ही रणनीती क्लाइव्ह लॉइडनं १९७६मध्ये किंग्जस्टन कसोटीपासून वापरली. तीच आता निवड-समिती अध्यक्ष व युवा-नवशिक्या कप्तान जेसन होल्डरचा ‘गॉडफादर’ या नात्यानं वापरायला लावली. पाच तोफांचा तोफखाना मैदानात उतरवला. चेंडू आपटत राहण्याचे आदेश दिले.
तीन फिरकी गोलंदाज हाताशी असतानाही चौथ्या-पाचव्या दिवसाच्या फिरणाऱ्या खेळपट्टीवर भारतानं पोर्ट ऑफ स्पेनला ४ बाद ४०६ अशी विक्रमी विजयी मजल मारली होती, ती आठवते ना? मग निर्णायक कसोटीत लॉइडनं स्पिनर्सना पाठवलं घरी अन् चेंडू दिला होल्डिंग, रॉबर्ट्सकडे आणि शरीरवेधी मारा सुरू केला. अंशुमन गायकवाड, विश्वनाथ, मोहिंदर यांना शेकवून काढलं. गोलंदाजांचे हात दुखावू नयेत म्हणून सहा-सात फलंदाज बाद झाल्यावर डाव सोडण्याचा आसरा कर्णधार बेदीला शोधावा लागला होता!
विंडीजच्या पडत्या काळात विंडीजला संजीवनी देण्यासाठी पर्थपेक्षा अधिक योग्य आखाडा कोणता? १९७५पासून सुमारे २० वर्षे याच पर्थच्या वाका खेळपट्टीवर विंडीजची विजयमाला सुरू झाली. सुरुवात केली अँडी रॉबर्ट्स, किथ बॉइस, बर्नी ज्युलियन व होल्डिंग यांनी. मग माल्कम मार्शल आला. त्यापाठोपाठ आले जोएल गार्नर व कॉलिन क्रॉफ्ट, इयन बिशप व पॅट पॅटर्सन, कोर्टनी वॉल्श व कर्टली अ‍ॅम्ब्रोज. नवनव्या जलद चौकडय़ा. आग ओकत राहणाऱ्या ताशी दीडशे किलोमीटर्सच्या वादळी वेगानं फलंदाजाच्या नाका-तोंडांसमोर चेंडू उसळवणाऱ्या पर्थच्या वाकावरील त्या विजयमालेतील नवं पुष्प गुंफू बघत होता लॉइड!
दारूगोळा
नव्या तोफांचा ‘ब्रँड’ वेस्ट इंडियन. पण त्यात दारूगोळा ठासून भरलेला नव्हता का? त्यात दगाफटका झालेला नव्हता. दारूगोळाच पूर्वीइतका ज्वालाग्राही नव्हता. टेलरचा वेग ताशी १४६ किलोमीटर्स. पण उमेश यादवचा तर १४७. रसेल-रोच १४१ पर्यंत, पण मोहम्मद शमी १४५ आणि सर्वात मिळमिळीत होल्डर १३० ते १३५, पण मोहित शर्मा १३० ते १४१. त्यामुळे सामन्यातील प्रत्येक टप्प्यात भारतच विंडीजच्या पुढे- दहा षटकांनंतर विंडीज २ बाद ३८, तर भारत २ बाद ४२. वीस षटकांनंतर विंडीज ५-७१, तर भारत ४ बाद ९३. तीस षटकांअखेर विंडीज ७ बाद १०५, तर भारत ६ बाद १३५.
पर्थची वाका खेळपट्टीही विंडीजला तारून नेऊ शकली नाही. पण भारत त्या परीक्षेत झाला काठावर पास. पण अखेर पास झाला, विजयाचे दोन गुण कमावू शकला, मग अजिंक्यवरील अन्यायाची चर्चा कशाला, असाच विचार बळावला!