ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब प्रदर्शनानंतर भारताची विश्वचषकाच्या दावेदारांमध्ये गणना करण्यात येत नव्हती. परंतु, खेळाडूंना सुरूवातीपासूनच स्वत:वर विश्वास असल्याने टीकाकारांना अचंबित करण्यात मदत झाल्याचे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने म्हटले आहे. ‘क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत विराट म्हणाला, खरं सांगायच तर अनेकांना आम्ही उपांत्य सामन्यातदेखील पोहोचू, याची आशा नव्हती. आम्ही अनेकांना अचंबित केले, परंतु, आम्हाला स्वत:ला याचे कधीच आश्चर्य वाटले नाही. स्वत:मधील क्षमतेची आम्हाला कल्पना होती. आमच्यातील प्रतिभा आणि जिंकण्याची जिद्द यामुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश संपादनकरता आले. आमच्या कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान असून, जर का आम्ही असेच खेळत राहिलो, तर त्याचे परिणाम आपोआप समोर येतील. भारताला गुरुवारी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाबरोबर खेळायचे असून, कोहलीला या विजयाचे महत्व चांगलेच ठाऊक आहे. तो म्हणाला, विश्वचषक जिंकणे हे खूप मोठे यश असणार आहे. खास करून जेव्हा तो ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर जिंकण्यात येईल, तेव्हा त्याचे महत्व काही वेगळेच असेल. विश्वचषक सामन्याअगोदर झालेल्या त्रिशंकू मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आला नाही. त्रिशंकू मालिका आणि विश्वचषकादरम्यान नव्याने सुरुवात करण्याची आवश्यकता असल्याचे संघाच्या लक्षात आल्याचे सांगत तो म्हणाला, विश्वचषकात चांगली कामगिरी करावी लागेल हे गोलंदाजांच्या लक्षात आले. ज्याची आम्हाला मदत झाली. आम्ही मागील खराब कामगिरी विसरून केवळ सकारात्मक गोष्टी लक्षात घेऊन नव्याने सुरुवात केली.