विश्वचषक गाजवत आहेत, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क अन् न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट. त्यांना साथ देत आहेत मिचेल जॉन्सन व टीम साऊदी. दक्षिण आफ्रिकेची डेल स्टेन व मॉन्रे मॉर्कल ही कसलेली जोडी जमत आहे. logo03भारताच्या मोहम्मद शमीने सर्वावर छाप पाडलेली आहे; पण उपांत्य फेरीआधीच्या ४६ सामन्यांत म्हणजे सुमारे सव्वा चार हजार
षटकांच्या खेळात सर्वात थरार निर्माण करणारा स्पेल, यापैकी कोणत्याही गोलंदाजाच्या नावावर नाही. तो आहे पाकिस्तानी वहाब रियाझच्या नावावर!
उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानला कांगारूंनी मर्यादित केलं २१३ धावसंख्येत; पण अ‍ॅडलेडच्या तेज खेळपट्टीवर, पाहता-पाहता वॉर्नर-फिंच या बिनीच्या जोडीपाठोपाठ कर्णधार मायकल क्लार्क तंबूत परतला. आखूड टप्प्याच्या उसळत्या चेंडूवर क्लार्कला शॉर्ट लेगला टिपलं गेलं ते रियाझच्या माऱ्यावर. मग त्याच्याच उसळत्या चेंडूवर शेन वॉटसनच्या (४) फसलेल्या हूकचा सोपा झेल राहत अलीच्या हातातून सुटला. एरवी कांगारूंची हालत झाली असती ४ बाद ८३! त्यानंतर वहाबच्या पुढच्या स्पेलमध्ये ग्लेन मॅक्सवेलचा (५) असाच सरळ साधा झेल सोडला तो सोहेल खानने. मग वॉटसनने भरारी मारली ४वरून नाबाद ६४वर, तर मॅक्सवेलनं ५वरून नाबाद ४४वर!
रियाझ ठरणार होता एका खळबळजनक विजयाचा नायक; पण त्याच्या नशिबी ओढवली होती शोकांतिकेतील नायकाची भूमिका. त्याच्या त्या स्पेलवर फिदा झाले होते अँग्लो-ऑस्ट्रेलियन मान्यवर. दस्तुरखुद्द मायकल क्लार्क म्हणाला, ‘‘गेल्या
कित्येक वर्षांत झटपट क्रिकेटमध्ये मला सामोरे जाव्या लागलेल्या तिखट स्पेलमध्ये
मी याची गणना करीन.’’ केव्हिन पीटरसनने अभिप्राय दिला की, ‘‘ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर परदेशी गोलंदाजाचा
झटपट क्रिकेटमधील हा सर्वोत्तम स्पेल.’’ अ‍ॅलन बॉर्डरने पीटरसनच्या निरीक्षणास दुजोरा दिला. शेन वॉर्नही वहाबचं कौतुक करण्यात मागे राहिला नव्हता. ‘‘झटपट क्रिकेटमध्ये मी पाहिलेला हा सर्वात झणझणीत स्पेल!’’
*कांगारू-पाक ४-४
या सामन्याआधी जाणकार तपासून बघत होते विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान लढतींचा विलक्षण इतिहास. चार सामने कांगारूंनी जिंकलेले, तर पाकिस्तानच्या खात्यातही तितकेच जय. पाच-पाच बळी घेणारे डेनिस लिली (१९७५) व क्रेग मॅकडरमॉट (१९८७) हे कांगारूंच्या प्राथमिक विजयाचे शिल्पकार, तर १९९९च्या अंतिम फेरीत शेन वॉर्नचा जादूई लेग-स्पिन अन् त्यानंतरच्या विश्वचषकात सायमंड्सचे दणकेबाज शतक, हे ऑस्ट्रेलियन विजयाचे मानकरी.
पाकिस्तानने हे हिशोब चुकते करण्यात हयगय केली नाही. त्यांचा पहिला विजय, कांगारूंच्या कमकुवत संघाविरुद्धचा. उत्तमोत्तम १५-१८ खेळाडू केरी पॅकर यांच्या किफायतशीर सर्कशीत दाखल झालेले व त्यांच्या गैरहजेरीत दुबळ्या बनलेल्या संघावर पाकचा मोठा जय. त्यात माजिद खानचा वाटा मोठा; पण पाकचे सर्वात संस्मरणीय यश, १९९२च्या विश्वचषकातले. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड संयुक्तपणे यजमान. प्रथमच कांगारूंच्या मुलखात विश्वचषक अन् आधीच्या विश्वचषकातील विजयाचे वलय, अ‍ॅलन बॉर्डरच्या संघाभोवती; पण जलदगती जावेद अकिब व लेगस्पिनर मुश्ताक अहमद यांनी कांगारूंना नमवलं. त्या स्पर्धेतील अपयशाची मालिका पाकनं खंडित केली व विश्वचषक कब्जात घेणारी घोडदौड सुरू केली, ती त्या लढतीत!
याही वेळी त्या गौरवशाली इतिहासाचं स्मरण करत होता कर्णधार मिसबाह उल हक व त्याचे सहकारी. इम्रान खानच्या त्या संघाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची स्वप्नं बघत होते; पण यंदा तसं काही घडणार नाही. तसं काही घडवण्याची क्षमता पाकिस्तानच्या ना आजच्या खेळाडूंत, ना आजच्या निवड समितीत, ना आजच्या पाकिस्तानी प्रशासनात.
दुखापती नव्या नाहीत!
दुखापतींनी पाक संघाला यंदा भंडावलंय. डावखुरा जुनैद खान स्पर्धेआधीच बाद झाला होता. मग सात फूट एक इंच उंचीचा मोहम्मद इरफानही उपांत्यपूर्व फेरीआधीच स्पर्धेबाहेर फेकला गेला. (भारतालाही इशांत शर्मा हा मोहरे गमवावा लागला नाही का!) मोहम्मद हफीझ व सईद अजमल संघाबाहेर आहेत, ते त्यांच्याच सदोष शैलीमुळे. १९९२मध्ये ऐन वेळी वकार युनूससारखा मोहरा दुखापतींमुळे पाकिस्तानला गमवावा लागला होता, अन् स्वत: कर्णधार इम्रान पाठदुखीतून स्वत:ला सावरत होता. मुख्यत: फलंदाज म्हणूनच खेळत होता अन् वासिम अक्रम व अकीब जावेद या लाडक्या शिष्यांना वाव व मार्गदर्शन देत होता.
इम्रानचे डावपेच आत्मविश्वासातून आक्रमकतेकडे झुकलेले. लेगस्पिनची भेदकता त्यानं जाणलेली. मुश्ताक अहमदचा वापर त्यानं कुशलतेनं केला. याउलट
यासिर शहाची पिटाई भारतीयांनी केली. मग पराभूत मिसबाह व प्रशिक्षक वकार
यांनी त्याला कायमची रजा दिली!
शहाची धुलाई भारताने केली तशीच इतर साऱ्यांनी, ही गोष्ट त्यांनी कशी नजरेआड केली?
राष्ट्रीय निवड समितीनं निवडलेल्या यष्टिरक्षक फलंदाज सर्फराझ नवाझला पहिल्या चारही सामन्यांत प्रशिक्षक वकार युनूसनं संघाबाहेर ठेवलं. त्याची निवड केली गेली नाइलाजास्तव. दोन सणसणीत पराभवांनंतर व जमशेद-युनूस खान हे सलामीत अपयशी ठरल्यानंतर निवड झाल्याबरोबर सर्फराझ ४९ चेंडूंत ४९ वर धावचीत व सहा झेल, मग नाबाद शतक! वकार युनूसची झोप उडवणारा खेळ. म्हणूनच या संघात विजयाची ना क्षमता ना लायकी. म्हणूनच रियाझ नायक शोकांतिकेचाच!