मेलबर्नमध्ये रविवारी सकाळ लवकर झाली. सकाळपासून कॅफे लोकांच्या गर्दीमुळे ओसंडून वहात होते. पिवळे, हिरवे आणि काळे रंग हे प्रामुख्याने सूर्यप्रकाशात प्रखरतेने दिसून येत होते. आजच्या दिवसाकरिता किवी असो वा ऑसी हे मेलबर्नकर होते. मेलबर्नमधील बऱ्याच कॅफेंमध्ये रस्त्यावर (फुटपाथवर) बसून logo04शहराचा आवाज ऐकत सकाळचा कॉफीचा आस्वाद घेण्याची पद्धत आहे. रस्त्यावर मांडलेल्या खुच्र्यावर बसून मित्रांबरोबर क्रिकेटच्या गप्पा मारण्यात मेलबर्नकर रमले होते. रविवारी काही वर्तमानपत्रांना सुट्टी असल्यामुळे छापून आलेल्या वर्तमानपत्रांचा खप रविवारी जोरात होता. ‘सन हेराल्ड’ने चक्क किवींच्या उच्चारांची टर उडवली होती. किवींचे इंग्रजी शब्द सुलभ आणि सहजपणे कसे समजावे आणि ओळखावे याची सूची आणि तपशील दिला होता.
ऑसी, किवी, भारतीय, दक्षिण आफ्रिकी, पाकिस्तानी असे सगळ्या देशांचे क्रिकेटचे वारकरी जगज्जेतेपदाचा क्षण ‘याची डोळा’ पाहण्यासाठी ‘जी’ (एमसीजी) येथे जमले होते. जी प्रेक्षकांच्या गर्दीने वाहून गेले होते. स्टेडियमच्या आतच नव्हे, तर बाहेरदेखील बरीच गर्दी जमली होती. तिकिटे मोठय़ा संख्येने काळ्या बाजारात विकली जात होती. ज्यांना तिकिटे मिळाली नाहीत, त्यांनी स्टेडियमच्या बाहेर पार्कमध्ये आयोजित केलेल्या स्क्रीनवर सामना पाहण्याचे प्रयोजन केले. भारत खेळत नसणाऱ्या सामन्यात एवढी गर्दी कधीच दिसली नव्हती. हजारोंच्या संख्येने ऑसी प्रेक्षक मदानावर आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हजर होते. एकदिवसीय सामना सोडा, पण अ‍ॅशेसमध्येदेखील इतकी गर्दी कधीही दिसली नसावी. भारताबाहेरदेखील क्रिकेटसाठी तेवढीच निष्ठा आणि रसिक आहेत, हे एकदिवसीय क्रिकेटचे मोठे यश आहे. ‘जी’वरील वातावरणाचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे.
काही तासांपूर्वी निर्जीव असे हे मदान अचानक जिवंत झाले होते. १९९२च्या विश्वचषकच्या अंतिम फेरीपेक्षा अधिक विक्रमी ९१ हजार क्रिकेटरसिकांचे प्रोत्साहन आणि एकीकडून ‘ऑसी, ऑसी, ऑसी..’, ‘ओय.. ओय.. ओय..’ तर दुसरीकडून ‘लेट्स गो किवी, लेट्स गो..’ अशा जयघोषांमुळे वातावरणात आगळा कैफ चढला होता. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय ध्वज जवळपास सारखेच दिसत असल्यामुळे लक्षपूर्वक पाहिल्याशिवाय कोण कुणाचे समर्थन करतोय, हे सांगणे कठीण ठरत होते.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच ऑसी संघाने वर्चस्व मिळवले होते. ब्रेंडन मॅक्क्युलम तंबूत परतताच किवींचा आवाज कमी झाला आणि ऑसी समर्थकांनी आपला आवाज बुलंद केला. ऑसी खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करत आपल्या चाहत्यांना गप्प बसू दिले नाही. ग्रँट एलियट आणि रॉस टेलरच्या भागीदारीने किवी प्रेक्षकांना जयघोष करण्याची थोडी संधी मिळाली, पण ती फार काळ टिकली नाही. या काळात स्टेडियम थोडे शांत होते. मात्र टेलर बाद होताच ऑसी जागे झाले. एलियट तंबूत परतला, तेव्हा काही किवी स्टेडियम सोडून परतीच्या मार्गावर लागले आणि काही ऑसी त्यांना अजून काही काळ थांबा, आम्ही सामना लवकर संपवू. ‘आम्ही चषकासोबत आणि तुम्ही रिक्त हस्ते’ असे एकत्र घरी जाऊ अशी फिरकी घेत होते.
किवी फलंदाजांनी आपल्या समर्थकांना हर्षनाद करण्याचा ‘मौका’ दिला नाही म्हणून गोलंदाजीच्या सुरुवातीपासून समर्थकांनी ‘लेट्स गो किवी, लेट्स गो..’ असा जयघोष करून खेळाडूंना प्रोत्साहित करीत होते. साऊदीच्या पहिल्याच षटकात चौथी स्लीप लागताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि लगेचच आरोन िफच तंबूत परतला, तेव्हा किवी प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार नव्हता. मग ते ऑसी समर्थकांना चिडवू लागले. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरने काही फटके मारले आणि ऑसी समर्थक पुन्हा आपल्या पायावर उभे राहून ‘ऑसी, ऑसी..’ अशा घोषणा करू लागले. समर्थकांमधील हा सामना एखाद्या टेनिसच्या खेळाप्रमाणे कधी किवींच्या बाजूने, तर बऱ्याचदा ऑसींच्या बाजूने कल राखताना दिसत होता. यानंतर जो ज्वालामुखी अवतरला तो एलियटने वॉर्नरचा झेल टिपल्यावर, किवी समर्थक पुन्हा एकदा झेंडे फडकावत जयघोष करू लागले. एवढय़ात मायकल क्लार्कचे एकदिवसीय खेळासाठी मदानात अखेरचे आगमन झाले आणि ऑसी समर्थकदेखील उभे राहून त्याचे स्वागत करू लागले. काही काळ शांत गेला आणि मग प्रेक्षकांनी आपल्या मनोरंजनासाठी मदानात ‘मेक्सिकन वेव्ह’ तयार करायला सुरुवात केली. त्यातल्या काही थोडय़ा अंतरावर जाऊन विलीन झल्या तर काही स्टेडियमच्या भोवती गिरक्या घेत होत्या. क्लार्कचे अर्धशतक झाले आणि त्याला रसिकांनी उभे राहून अभिवादन केले. सामन्यात मग फक्त औपचारिकता उरली होती. तेवढय़ात क्लार्कने एका षटकात सलग चार चौकार ठोकले आणि प्रेक्षकांचे मनोबल उंचावले. पण लगेचच क्लार्क बाद झाला आणि पुन्हा सर्व रसिकांनी उभे राहून शेवटची सलामी देत टाळ्यांचा पाऊस पाडला. स्मिथ शेवटी विजयी फटका खेळला आणि चषकावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. स्टेडियमवर आनंदाचे आणि उत्साहाचे भरते आले आणि पुन्हा ‘ऑसी, ऑसी, ऑसी..’ हेच नाद ऐकू येत होते. मग ऑस्ट्रेलिया संघाने स्टेडियमला चक्कर मारत आपला आनंद साजरा केला. क्लार्कने चषक उचलला आणि नंतर एक आगळा जल्लोष आणि महोत्सव सुरू झाला. हा सोहळा रात्रभर सुरू राहणार होता. घरी जाता जाता एक किवी समर्थक एका ऑसी रसिकाजवळ आला आणि म्हणाला, ‘‘वेल डन मेट. थीस टाइम द कप इज युवर्स. सी यू इन फोर इअर्स टु गेट इट बॅक!’’ (अप्रतिम खेळलात. या वेळी विश्वचषक तुमचा, परंतु चार वर्षांनी आम्ही तो परत नेऊ.)