पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरीने मिळवलेल्या मोठय़ा विजयानंतर वेस्ट इंडिजचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. त्यामुळे आता झिम्बाब्वेचा सफाया करून त्यांच्यावर मोठा विजय मिळवण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ सज्ज आहे. झिम्बाब्वेने आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली असून त्यांच्यामध्ये नक्कीच विंडीजला धक्का देण्याची कुवत आहे.
वेस्ट इंडिजच्या नावाजलेल्या फलंदाजांना अजूनही मोठी खेळी साकारता आली नाही. पण काही युवा खेळाडूंच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर विंडीजने आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे. गेल्या सामन्यात आंद्रे रसेलने अफलातून फलंदाजीचा नमुना पेश केला होता, तर जेरॉम टेलरने पाकिस्तानची भंबेरी उडवली होती.
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या कामगिरीमध्ये सातत्य पाहायला मिळत नाही, त्यामुळे हा संघ कधीही कोणत्याही संघापुढे कच खाऊ शकतो. त्यामुळे जसा आर्यलडने त्यांना धक्का दिला होता, तसाच धक्का झिम्बाब्वेही देऊ शकते.
झिम्बाब्वेने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला चांगलेच झुंजवले होते. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. संघातील शॉन विल्यम्स, ब्रेंडन टेलरसारखे खेळाडू लौकिकाला साजेसा खेळ करीत आहेत. त्यामुळे संघाने एकजुटीने जिंकण्याचा ईष्र्येने खेळ केल्यास त्यांच्यासाठी विजय दूर नसेल.

डॅरेन ब्राव्हो मुकणार
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्नायूंच्या दुखापतीमुळे डॅरेन ब्राव्होला माघारी परतावे लागले होते. ब्राव्हो या दुखापतीतून अजूनही सावरला नसल्याने त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागणार आहे.

‘‘ डॅरेन ब्राव्हो हा दुखापतीमुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी तो तंदुरुस्त होऊन खेळल, अशी आम्हाला आशा आहे,’’ असे संघ घोषित करताना सांगण्यात आले आहे

सामना क्र. : १५    वेस्ट इंडिज वि. झिम्बाब्वे (ब-गट)
स्थळ : मानुका ओव्हल, कॅनबेरा  ल्ल वेळ : सकाळी ९.००

बोलंदाजी
समोर कोणताही संघ असला तरी आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचाच प्रयत्न करतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये आम्ही सर्वस्व पणाला लावले होते आणि तो सामना आम्ही सहजपणे जिंकलो. या विजयाने संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. आता यापुढच्या सर्व सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करू.
– आंद्रे रसेल, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू

वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना आम्हाला जिंकावाच लागणार आहे, कारण हा सामना जिंकल्यावर बाद फेरीत पोहोचण्याचा आमचा मार्ग सुकर होऊ शकतो. त्यामुळे या सामन्यात तिन्ही आघाडय़ांवर आम्ही अथक मेहनत घेतली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये आमचे क्षेत्ररक्षण चांगले झाले नव्हते, त्यामुळे त्यावर आम्ही अधिक भर दिला आहे.
एल्टन चिगुंबुरा, झिम्बाब्वेचा कर्णधार

आमने सामने
सामने ४४  – वेस्ट इंडिज ३४ ’  झिम्बाब्वे ९ ’ रद्द झ्र् १

संघ
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), दिनेश रामदीन (यष्टिरक्षक), मार्लन सॅम्युअल्स, सुलेमान बेन, डॅरेन ब्राव्हो, जोनाथन कार्टर, शेल्डन कॉट्रेल, ख्रिस गेल, निकिता मिलर, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, जेरॉम टेलर.
झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), सिकंदर रझा, रेगिस चकाबव्हा, तेंडाई चटारा, चामू चिभाभा, क्रेग इरव्हिन, तफाड्झ्वा कामुनगोई, हॅमिल्टन मसाकाझा, स्टुअर्ट मॅत्सिकेनयेरी, सोलोमन मिरे, तवांडा मुपारिवा, तिनाशे पानयांगरा, ब्रेन्डन टेलर (यष्टिरक्षक), प्रॉस्पर उत्सेया, सीन विल्यम्स.