popat(आलिशान एसयूव्हीतून चंपक उतरतो. नमस्कार चमत्कारानंतर गाडीवाल्याला निरोप देऊन तो तोतारामकडे येतो.)
तोताराम : मजा आहे राव. आज एकदम गाडीतून!
चंपक : ती संस्थेची होती. आपलीही येईल की. नक्की कोणत्या तारखेला, वाराला येईल ते काम तुमचं.
तोताराम : जरूर सांगू. आम्हाला एक राइड मिळेल ना?
चंपक : बास्स काय?.. राइड काय? आपण दिवसभर फिरू! बरं हशिम अमला जागा झाला, आफ्रिका जिंकली. तुम्ही सांगितलंत तस्संच. ऑस्ट्रेलियाही असंच जिंकेल?
(विठ्ठलपंत पिवळं कार्ड हाती देतात)
तोताराम : जिंकावं आणि तेही प्रचंड फरकाने जिंकावं लागेल. स्पर्धेतला प्रवास फार बरा चाललेला नाही त्यांचा. प्रतिस्पध्र्याचा पार पालापाचोळा करता येईल अशा संधी विश्वचषकात फार कमी मिळतात. बुधवारी अशीच संधी ऑस्ट्रेलियाच्या दारी चालून आलेय. पण कसं आहे अहंकार आणि फाजील आत्मविश्वास यांची लागण चटकन होते, स्वाइन फ्ल्यूच्या वरताण. ऑस्ट्रेलियाला ते जपायला हवं. अफगाणिस्तानचे दोर कापलेले आहेत. त्यामुळे जे काही सिद्ध करायचं आहे ते ऑस्ट्रेलियाला. ज्याची इच्छाशक्ती आणि तयारी प्रबळ त्यांचे विक्रम होतील.
चंपक : बांगलादेश-स्कॉटलंड?
तोताराम : आता किमान स्कॉटलंडला तरी हरवावं की.
चंपक : बरं, निघतो. अकरा नंबरच्या बसने..