03 March 2021

News Flash

चाणाक्ष धोनी

संघ हा फक्त खेळाडूंवर नाही तर रणनीतीवर चालत असतो. कोणत्या खेळाडूला कधी, कुठे आणि कसे वापरायचे, हे जर माहिती असेल तर संघात जास्त गुणवत्ता नसली

| February 21, 2015 06:10 am

संघ हा फक्त खेळाडूंवर नाही तर रणनीतीवर चालत असतो. कोणत्या खेळाडूला कधी, कुठे आणि कसे वापरायचे, हे जर माहिती असेल तर संघात जास्त गुणवत्ता नसली किंवा जास्त अनुभव नसला तरी चालू शकतं. सध्याच्या घडीला हे फक्त चाणाक्ष महेंद्रसिंग धोनीला माहीत आहे आणि त्याच्याच भोवती संघाची wc11रणनीती फिरत असते. यंदाच्या विश्वचषकामध्ये सर्व देशांमध्ये नसलेला आणि भारताकडे असलेला एक अतिरिक्त गुण म्हणजे धोनी. कारण त्याने आपल्या याच गुणांमुळे कुचकामी खेळाडूंना नायक बनवत संघाला विजय मिळवून दिले आहेत. मैदानावरील रणनीती ठरवण्यात धोनी माहीर, त्यामुळे त्याने या विश्वचषकासाठी नवीन रणनीती आखल्याचे दिसते आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारताने धावांचा पाठलाग करताना बहुतांशी सामने जिंकले आहेत, ती त्यांची खासियत असल्याचे म्हटले गेले आणि या विजयांमध्ये बऱ्याचदा सामना जिंकून देणारा ठरला तो धोनी. अखेपर्यंत सामना खेचायचा आणि विजयाला गवसणी घालायची, हे ठरलेलेच. धोनी आहे ना, मग भारतच जिंकणारच, असे बोलले जायचे, पण गेल्या न्यूझीलंड दौऱ्याने हे सारे ठोकताळे चुकीचे ठरवले. धोनीने या एकदिवसीय मालिकेत तिनदा धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण एकदाही त्याला यश मिळाले नाही. धावांचा पाठलाग करताना बऱ्याचदा त्याच्याबरोबर तळाचे फलंदाज असतात. आतापर्यंत बऱ्याच कमी वेळा धोनीबरोबर एखादा खंदा फलंदाज अखेपर्यंत उभा राहिलेला दिसतो. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक वेळी आपण अखेपर्यंत उभे राहून सामना जिंकू शकत नाही, याची जाणीव कुठे तरी धोनीला झाली आहे. याच साऱ्या गोष्टींचा अभ्यास करत धोनी आणि त्याच्याबरोबर खेळाचा अनुभव असलेल्या काही व्यक्तींनी एकत्रित बसून नवीन रणनीती आखली आणि ती म्हणजे पहिली फलंदाजी स्वीकारून प्रतिस्पर्धी संघाला धावांचा पाठलाग करायला लावायचा.
या रणनीतीमध्ये सकारात्मकता म्हणजे पहिल्यांदा फलंदाजी करताना जास्त दडपण फलंदाजांवर नसते, त्यामुळे मुक्तपणे फलंदाजी करता येऊ शकते. काही फलंदाज चांगल्या फॉर्मात नसल्याने त्यांना स्थिरस्थावर होण्यासाठी वेळ मिळू शकतो. त्यांच्याबरोबरच फलंदाजीमध्ये सातत्य नाही आणि अशामध्ये धावांचा पाठलाग करणे जोखमीचे ठरू शकते. मुळात धोनीचा फलंदाजीचा आत्मविश्वास कुठे तरी डळमळला आहे. त्याला आपण मोठी खेळी साकारू किंवा चोख फटके मारू शकू, याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे त्याने सरावानंतर रवी शास्त्री यांच्याकडून शिकवणीही घेतली. धोनी आता ३३ वर्षांचा आहे, रिफ्लेक्सेस कमी झाले असतील आणि यामुळेच रणनीती बदलली जाऊ शकते.
ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेत भारताने पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी पसंती दिली. इंग्लंडविरुद्धचा अखेरचा साखळी सामना आठवा, आपण त्यांना जाळ्यात ओढले होते, पण जेम्स टेलरने आपल्याकडून सामना खेचून नेला. अशीच परिस्थिती प्रतिस्पर्धी संघाची या विश्वचषकात करायची. पहिल्या दहा षटकांमध्ये किमान एका फलंदाजाला तरी बाद करायचे. पहिला पॉवर प्ले संपल्यावर फिरकीपटू आणि मध्यमगती गोलंदाजांना आणून फलंदाजांवर दडपण आणायचे, त्यांना धावा जमवण्यासाठी झुंजवायचे. एकदा का धावगती वाढायला लागली की मोठे फटके मारण्याच्या नादात असलेल्या फलंदाजाला आपल्या जाळ्यात ओढायचे. यासाठी धोनीला पहिल्या दहा षटकांमध्ये मोहम्मद शमीकडून एक बळी अपेक्षित आहे, तर त्यानंतर आर. अश्विन, स्टुअर्ट बिन्नी आणि रवींद्र जडेजा यांच्याकडूनही मोठय़ा अपेक्षा आहेत. या तिघांनी जर ठरवल्याप्रमाणे गोलंदाजी केली तर रणनीती यशस्वी होऊ शकते. ३० षटकांपर्यंत कोणते गोलंदाज चांगली कामगिरी करतायत हे जोखून घ्यायचे आणि त्यानंतरच्या दोन्ही ‘पॉवर प्ले’मध्ये त्यांचा चतुराईने वापर करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना मोठे फटके मारण्यासाठी प्रवृत्त करायचे. ट्वेन्टी-२०च्या जमान्यातील फलंदाज धोनीच्या जाळ्यात अडकू शकतात. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टय़ांचा अंदाज घेता फिरकी गोलंदाजीला चांगला वाव आहे आणि हेच भारताला हवे आहे.
विश्वचषकातील प्रतिस्पर्धी संघांवर नजर टाकली तर त्यांच्याकडे उत्तम मारा आहे, पण फलंदाजीमध्ये जास्त खोली नाही, याला अपवाद ऑस्ट्रेलियाचा. कारण त्यांचा हुकमी फलंदाज जेम्स फॉल्कनर आठव्या क्रमांकावर येतो. इंग्लंडकडून बेल, टेलर आणि कर्णधार मॉर्गन, दक्षिण आफ्रिकेकडून हशिम अमला, ए बी डी’ व्हिलियर्स, डेव्हिड मिलर आणि न्यूझीलंडकडे ब्रेंडन मॅक्क्युलम, केन विल्यमसन आणि कोरे अँडरसन यांच्यापासून भारताला सर्वाधिक धोका आहे. पण हे खेळाडू भारताच्या या रणनीतीचे शिकार ठरू शकतात. त्याचबरोबर या संघांमध्ये अखेपर्यंत टिकून राहून सामना जिंकण्याचे कौशल्य फार कमी जणांकडे आहे.
धोनी हा शहाणा कर्णधार आहे, त्यामुळे ही रणनीती तो वारंवार वापरणार नाही, फक्त महत्त्वाच्या सामन्यांमध्ये वापरेल. पाकिस्तानविरुद्ध त्याने अनपेक्षितपणे प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि सामना जिंकला. या विजयानंतर भारत जवळपास उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला असून, त्याला प्रयोग करायला किंवा प्रतिस्पर्धी संघाला चकवा देण्याची आता चांगली संधी आहे. त्यामुळे तो फक्त प्रथम फलंदाजीच्या रणनीतीमध्ये सातत्य दाखवणार नाही, पण बाद फेरीपासून हे होऊ शकते. शेवटी विश्वचषकाचे दडपण आणि त्यात बाद फेरी, यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करताना दडपण जास्त असेल आणि तेच भारताला आपल्या पथ्यावर पाडायचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 6:10 am

Web Title: wise ms dhoni
टॅग : Ms Dhoni
Next Stories
1 विश्वचषकातील तिसरा मुंबईकर
2 शॉनचे बाबा!
3 दक्षिण आफ्रिका भारताला हरवेल!
Just Now!
X