सिंहाने एखादी छोटी शिकार बेमालूमपणे करावी, असेच काही विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अव्वल ठरलेल्या भारताने संयुक्त अरब अमिरातीच्या बाबतीत शनिवारी केले. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर फिरकीपटू आर. अश्विनने चार बळी मिळवत कमाल केली आणि अमिरातीचे आव्हान बेचिराख केले. भारताच्या भेदक माऱ्यापुढे अमिरातीचा संघ १०२ धावांमध्ये गडगडला आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान नऊ विकेट्स राखत पूर्ण केले. विश्वचषकात विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करत भारतीय संघाने aaaउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.
अमिरातीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांना सुरुवातीपासूनच एकामागून एक धक्के बसत गेले. उमेश यादवने त्यांना सुरुवातीलाच दोन धक्के दिले. या धक्क्यातून त्यांना अश्विनने सावरायला संधीच दिली नाही. आपल्या फिरकीच्या तालावर अमिरातीच्या फलंदाजांना चकित करत त्याने चौघांना माघारी धाडले. त्याला अन्य गोलंदाजांची योग्य साथ मिळाल्यामुळे भारताला अमिरातीचा १०२ धावांमध्ये खुर्दा उडवता आला. अमिरातीच्या आठ फलंदाजांना या दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. अमिरातीकडून शैमान अन्वरने सर्वाधिक ३५ धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना फॉर्मात असलेला शिखर धवन (१४) झटपट माघारी परतला. पण त्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली (नाबाद ३३) यांनी संयत फलंदाजी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. या खेळीतून रोहित फॉर्मात आल्याने भारतीय संघ सुखावला आहे, रोहितने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५७ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

रोहित शर्मा
५७
चेंडू    ५५
चौकार    १०
षटकार    १
आमच्याकडून आज चांगली सांघिक कामगिरी झाली. आधी गोलंदाजांनी भेदक मारा करत विजयाचा पाया रचला आणि मग फलंदाजांनीही चांगली कामगिरी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. आम्ही एक झेल सोडला असला तरी तो वगळता क्षेत्ररक्षण उत्तम झाले. तिन्ही आघाडय़ांवर आम्ही बाजी मारत सामना जिंकला.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

संक्षिप्त धावफलक
संयुक्त अरब अमिराती : ३१.३ षटकांत सर्व बाद १०२. शैमान अन्वर ३५, आर. अश्विन ४/२५) पराभूत वि. भारत : १८.५ षटकांत १ बाद १०४ (रोहित शर्मा नाबाद ५७; मोहम्मद नवीद १/३५) सामनावीर : आर. अश्विन.

आर. अश्विनने विश्वचषकातील सामन्यात भारताकडून केलेली ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी आहे. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर युवराज सिंग आहे. त्याने विश्वचषकात २०११मध्ये ५ बळी व २००३मध्ये बळी मिळवले होते.

१८७ भारताने सर्वात जास्त चेंडू राखून मिळवलेल्या विजयांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा विजय. २००१मध्ये भारताचा केनियाविरुद्ध २३१ चेंडू राखून विजय.

४/२५ वाकाच्या खेळपट्टीवरील ही भारतीय फिरकीपटूची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी. यापूर्वी १९९१ साली रवी शास्त्री यांनी १५ धावांत ५ बळी मिळवले होते.

आर. अश्विन १०-१-२५-४