विश्वचषक ही सर्वात मोठी स्पर्धा असते, चार वर्षांपासून सारेच या स्पर्धेची वाट पाहत असतात. त्यामुळे या स्पर्धेमध्ये प्रत्येकावर दडपणही अधिक असते. माझ्यामते ही स्पर्धा कामगिरीपेक्षाही अधिक मानसिकतेच्या जोरावर जिंकता येऊ शकते. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाबरोबर आहे. हा सामना भारतीय संघासाठी फार महत्त्वाचा असेल. कारण या सामन्याच्या निकालावर संघाचे मनोबल अवलंबून असेल. देशातील चाहत्यांची संघाकडून या सामन्यात मोठी अपेक्षा नक्कीच असेल. त्यामुळे जर हा सामना भारताने जिंकला, तर त्यांचे मनोबल उंचावेल आणि पुढचा प्रवास अधिक सुकर होण्यास मदत होऊ शकेल.

तिरंगी मालिकेमध्ये भारताला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली, तरी या कामगिरीचा विश्वचषकावर जास्त परिणाम होणार नाही. कारण विश्वचषक ही वेगळी आणि फार मोठी स्पर्धा आहे, आपण आधी काय केलं यापेक्षाही आपल्याला काय नेमके करायचे आहे, याचा विचार करायला हवा. गेले बरेच दिवस भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये असल्याने त्यांना वातावरणाशी जुळवून घेता आले असेल. आता त्यांच्यापुढे तंदुरुस्तीचा मोठा प्रश्न असेल, हा प्रश्न लवकरच निकाली लागायला हवा. भारतीय फलंदाजीमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत आणि हे फलंदाज कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतात. शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांच्यापैकी दोघे जण सलामीला येऊ शकतात. सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीसारखे ‘मॅच फिनिशर’ संघात आहेत. माझ्यामते विराट कोहलीने ज्या क्रमांकावर जास्त धावा केल्या आहेत, त्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे. दोन्ही टोकाकडून नवीन चेंडू वापरणार असल्यामुळे तो जर तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला आणि झटपट बाद झाला तर काय करायचे, हा प्रश्न संघापुढे असल्यामुळे त्याला कदाचित चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवत असतील.
भारताकडे झहीर खानसारखा गोलंदाज नाही. क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ म्हणून ओळखला जातो, पण गेल्या विश्वचषकात जेव्हा भारताला गरज होती तेव्हा त्याने विकेट्स काढून दिल्या होत्या. माझ्यामते फिरकी गोलंदाजांनाही या खेळपट्टय़ांवर चांगली मदत मिळू शकते. फिरकी गोलंदाजांना फॉर्मात असणं फार महत्त्वाचं आहे. स्टुअर्ट बिन्नीसारखा चांगला अष्टपैलू संघात आहे, पाचवा गोलंदाज म्हणून त्याचा वापर संघाने करायला हवा. या स्पर्धेत भारताशिवाय दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगलाच बलवान वाटत आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांना घरच्या मैदानात खेळता येणार असल्याने त्यांनाही कमी लेखून चालणार नाही.

प्रवीण अमरे, माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक

शब्दांकन : प्रसाद लाड