विश्वचषकात ‘धक्का’दायक विजयांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आर्यलडने बुधवारी संयुक्त अरब अमिरातीवर अखेरच्या षटकापर्यंत झुंज देत झगडून विजय मिळवला. यष्टीरक्षक-फलंदाज गॅरी विल्सनने ६९ चेंडूंत ८० धावांची जबाबदारीची खेळी साकारून आर्यलडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर केव्हिन ओ’ब्रायनने अर्धशतक झळकावून त्याला छान साथ दिली.
संयुक्त अरब अमिरातीचे २७९ धावांचे अवघड आव्हान पेलताना अमजद जावेदच्या (३/६०) अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर आर्यलडचा निम्मा संघ १७१ धावांत तंबूत परतला होता. परंतु  विल्सनने ए. बालबिर्नी (३०) सोबत पाचव्या विकेटसाठी ७४ धावांची आणि केव्हिन (५०) सोबत सहाव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे दोन विकेट राखून आर्यलडला विश्वचषकातील सलग दुसरा विजय साजरा करता आला. अखेरच्या सत्रात अमिरातीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत आर्यलडच्या संघावर अंकुश ठेवला. अखेरच्या दोन षटकांत आर्यलडला १० धावांची आवश्यकता होती. १०व्या क्रमांकाचा फलंदाज जॉर्ज डॉकरेलने (नाबाद ७) अमजदला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार ठोकल्याने अमिरातीच्या विजयाच्या आशा मावळल्या.
त्याआधी, ३५ वर्षीय शैमान अन्वरने (१०६) संयुक्त अरब अमिरातीकडून विश्वचषकातील पहिलेवहिले शतक झळकावण्याचा मान मिळवला. त्यांचा आठव्या क्रमांकाचा फलंदाज अमजद जावेदने ३५ चेंडूंत वेगाने ४२ धावा केल्या. त्यामुळेच अमिरातीला ९ बाद २७८ धावांचे आव्हान उभे करता आले.

संक्षिप्त धावफलक
संयुक्त अरब अमिराती : ५० षटकांत ९ बाद २७८ (शैमान अन्वर १०६, अमजद अली ४५; पॉल स्टर्लिग २/२७, अ‍ॅलेक्स क्युसॅक २/५४) पराभूत वि. आर्यलड : ४९.२ षटकांत ८ बाद २७९ (गॅरी विल्सन ८०, केव्हिन ओ’ब्रायन ५०; अमजद जावेद ३/६०)
सामनावीर : गॅरी विल्सन

हा विजय फार आनंद देणारा आहे. विश्वचषकात सलग दुसरा सामना आम्ही जिंकलो आहे. सामना चांगलाच अटीतटीचा झाला, पण आम्ही विकेट्स हातामध्ये राखल्यामुळे सामना जिंकू शकलो. मधल्याफळीत आम्ही चांगली फलंदाजी केली. मोक्याच्या क्षणी फलंदाजांनी चांगला खेळ केला.
– विल्यम पोर्टरफिल्ड, आर्यलडचा कर्णधार

शैमान अन्वरने अप्रतिम फलंदाजी केली, त्याच्या फलंदाजीमुळे आम्ही ६ बाद १३० वरून २८० धावांपर्यंत पोहोचू शकलो. ३५ व्या षटकांपर्यंत आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण त्यानंतर दवाचे प्रमाण वाढले आणि चेंडू बॅटवर सहजपणे यायला लागला. गोलंदाजांनी चांगला प्रयत्न केला, पण आम्ही अपयशी ठरलो.
– मोहम्मद तौकिर, अमिरातीचा कर्णधार