झिम्बाब्वेने विश्वचषकाला धडाक्यात प्रारंभ केला होता. १९८३च्या पहिल्या विश्वचषकातील सलामीच्या लढतीत त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला पराभूत करत साऱ्यांनाच धक्का दिला होता. त्यानंतर काही वर्षे त्यांचा धसका क्रिकेट जगताला होता. एके काळी त्यांचा संघ बलाढय़ संघांनाही डोईजड व्हायचा. पण देशातील राजकीय वातावरणामध्ये त्यांच्या संघाची वाताहत झाली. झिम्बाब्वेच्या संघाने एक निर्माण केलेली दहशत आता जाणवत नाही, पण तरीही त्यांच्यामध्ये धक्का देण्याची धमक मात्र नक्कीच आहे.

१९८३च्या विश्वचषकात पहिल्याच लढतीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. सध्याचे भारताचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर हे झिम्बाब्वेचे कर्णधार होते. या सामन्यात त्यांनी चार बळी घेत नाबाद ६९ धावांची k02खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण या विजयानंतर मात्र झिम्बाब्वेचा संघ एकही सामना जिंकू शकला नाही. १९८७मध्ये जॉन ट्रायकॉसच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेच्या संघाला साखळीतील एकही सामना जिंकता आला नाही. १९९२च्या विश्वचषकात झिम्बाब्वेने पुन्हा एकदा एक धक्का दिला. अँडी फ्लॉवरने इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषकातील पदार्पणाच्या सामन्यात नाबाद ११५ धावांची अप्रतिम खेळी साकारली आणि या खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेला १३४ धावा फटकावता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १२५ धावांवर संपुष्टात आला आणि झिम्बाब्वेने नऊ धावांनी इंग्लंडवर मात केली. इडो ब्रँडीसने २१ धावांमध्ये चार बळी मिळवत इंग्लंडला एकामागून एक हादरे दिले. पण अन्य सामन्यांमध्ये मात्र झिम्बाब्वेची हाराकिरीच पाहायला मिळाली. १९९६ च्या विश्वचषकात अँडी फ्लॉवरकडे नेतृत्व देण्यात आले होते. या विश्वचषकात त्यांनी फक्त केनियावर विजय मिळवला. पॉल स्ट्राँगने पाच बळी घेत झिम्बाब्वेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
आतापर्यंतच्या विश्वचषकात झिम्बाब्वेने फक्त एकच विजय मिळवला होता. पण अलिस्टर कॅम्पबेलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेच्या संघाने १९९९च्या विश्वचषकात थेट बाद फेरीत प्रवेश केला होता. या विश्वचषकात अष्टपैलू निल जॉन्सन हा त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरला होता. फलंदाजीबरोबरच गोलंदाजीमध्येही त्याने चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. केनियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जॉन्सनने चार बळी घेतले आणि ५९ धावांची खेळी साकारली. त्यामुळे संघाला पाच विकेट्स राखून सहज विजय मिळवता आला. यानंतर झिम्बाब्वेने भारताला अनपेक्षित धक्का दिला. सचिन तेंडुलकरला वडिलांच्या निधनामुळे भारतात यावे लागले होते आणि त्यामुळेच या सामन्यात त्याला खेळता आले नव्हते. अँडीच्या नाबाद ६८ धावांच्या खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २५२ धावा फटकावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवातच अडखळत झाली. सलामीवीर सदगोप्पन रमेशने ५५ धावांची खेळी साकारत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. हिथ स्ट्रीक आणि हेन्री ओलांगा या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत भारतीय संघाचे कंबरडे मोडले होते. भारतीय संघाला ४५ षटकांमध्येच गुंडाळत झिम्बाब्वेने या अटीतटीच्या लढतीत तीन धावांनी विजय मिळवला. त्यानंतर झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढय़ संघालाही सहज पराभूत करण्याची किमया साधली. जॉन्सनच्या ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने २३३ धावा जमवल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव झिम्बाब्वेने १८५ धावांमध्ये गुंडाळला. जॉन्सनने पुन्हा अष्टपैलू खेळाची चमक दाखवत दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या विजयासह झिम्बाब्वेने ‘सुपर सिक्स’ फेरीमध्ये धडक मारली. या फेरीत त्यांना एकही सामना जिंकता आला नसला तरी लॉर्ड्सवरील ऑस्ट्रेलियाविरुद्घची जॉन्सनची शतकी खेळी कोणालाही विसरता येणार नाही. मार्क वॉ याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३०३ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने दमदार सुरुवात केली ती जॉन्सनच्या खेळीच्या जोरावर. जॉन्सनने मरे गुडविनच्या साथीने ११४ धावांची भागीदारी रचली होती. झिम्बाब्वे आता हा सामना जिंकणार, असे जवळपास दिसत होते. पण गुडविन बाद झाल्यावर जॉन्सनला एकाही फलंदाजाने साथ दिली नाही. जॉन्सनने (नाबाद १३२) अखेपर्यंत खिंड लढवली, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
२००३च्या विश्वचषकात स्ट्रीकच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेने पुन्हा एकदा ‘सुपर सिक्स’ फेरी गाठली, पण या फेरीत त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. या विश्वचषकानंतर झिम्बाब्वेच्या संघाची पडझड सुरू झाली. राजकीय वादंगांमुळे संघातील वातावरण बिघडले. प्रॉस्पर उत्सेयाच्या कप्तानीखाली झिम्बाब्वेला २००७च्या विश्वचषकात आर्यलडविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवता आला, पण एकही विजय त्यांना मिळवता आला नाही. २०११च्या विश्वचषकात एल्टन चिगुंबुराच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेला कॅनडा आणि केनिया या दोन संघांवरच मात करता आली.
संकलन : प्रसाद लाड
बलस्थान आणि कच्चे दुवे
एल्टन चिगुंबुरा, सिकंदर रझा, हॅमिल्टन मसाकाझा, ब्रेन्डन टेलर, प्रॉस्पर उत्सेया, सीन विल्यम्स या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर यांच्याकडेही छोटय़ा संघांना मार्गदर्शन करण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे सारे काही जुळून आल्यास झिम्बाब्वेचा संघ बादफेरीत पोहोचण्याचे स्वप्न पाहू शकतो. झिम्बाब्वे दौरा गेल्या काही महिन्यांमध्ये झालेला नाही, त्यामुळे त्यांच्या खेळाडूंना सामन्याचा सराव नसेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळपट्टय़ांचा, वातावरणाचा त्यांना अंदाज नसेल. त्यामुळे विश्वचषकात स्थिरस्थावर होण्यासाठी झिम्बाब्वेला वेळ लागू शकतो.

अपेक्षित कामगिरी
‘ब’ गटामध्ये झिम्बाब्वेपुढे भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचे आव्हान असेल. त्यामुळे या बलाढय़ संघांपैकी एखाद-दुसऱ्या संघाला धक्का दिल्यास त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता येऊ शकते. संघामध्ये अनुभवी खेळाडूंनी जबाबदारीने खेळ केल्यास झिम्बाब्वेचा संघ बलाढय़ संघांनाही भारी पडू शकतो.