अभी तो पार्टी शुरू हुई है..

विश्वचषक सुरू झाल्याचा शंखनाद भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेतीनला झाला आणि क्रिकेटची सुनी मैफल नंतर क्षणाक्षणाला बहरायला लागली.

विश्वचषक सुरू झाल्याचा शंखनाद भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेतीनला झाला आणि क्रिकेटची सुनी मैफल नंतर क्षणाक्षणाला बहरायला लागली. विश्वचषकाच्या नाटय़मय थरारकतेची पहिल्याच दिवशी क्रिकेटरसिकांना अनुभूती मिळाली. यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी अपेक्षेप्रमाणेच तीनशेपल्याड धावसंख्येचे डोंगर उभारत अनुक्रमे इंग्लंड आणि श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. आरोन फिंचचे शतक, कुमार संगकाराचा पराक्रम, स्टीव्हन फिनची हॅट्ट्रिक, मिचेल मार्शचे पाच बळी यांनी पहिल्याच दिवसावर छाप पाडली. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल, कोरे अँडरसन, ब्रेंडन मॅक्क्युलम यांची ट्वेन्टी-२० क्रिकेटला साजेशी हटके फटकेबाजीने या मैफलीला चारचाँद लावला. तूर्तास, विश्वचषकाची ‘अभी तो पार्टी शुरू हुई है.., आगे आगे देखो होता है क्या..’

‘प्रति’अ‍ॅशेसचे महत्त्व प्राप्त झालेली विश्वचषकाची सलामीची लढाई ऑस्ट्रेलियाने आरामात जिंकली. आरोन फिंचने एक डझन चौकार आणि तीन षटकारांची बरसात करीत विश्वचषकातील पहिलेवहिले शतक झळकावले. त्यानंतर मिचेल मार्शने पाच बळी घेत इंग्लिश डावाला पूर्णविराम देण्यात सिंहाचा वाटा उचलला. चार वेळा विश्वविजेत्या यजमान ऑस्ट्रेलियाने ९० हजारहून अधिक क्रिकेटरसिकांच्या साक्षीने परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडला तब्बल १११ धावांनी हरवले.
मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर फिंचने एकदिवसीय कारकीर्दीतील सातवे शतक साकारत ऑस्ट्रेलियाला ९ बाद ३४२ धावांचे दमदार आव्हान उभे करून दिले. त्यानंतर ४१.५ षटकांत इंग्लंडचा डाव २३१ धावांवर संपुष्टात आला. ६ बाद ९२ अशी केविलवाणी अवस्था झाली असताना जेम्स टेलरची नाबाद ९८ धावांची झुंजार खेळी अपयशी ठरली.
फिंचने १२८ चेंडूंत १३५ धावा काढून ऑस्ट्रेलियाचा पाया रचल्यानंतर उत्तरार्धात ग्लेन मॅक्सवेलने ४० चेंडूंत ११ चौकारांची आतषबाजी करीत वेगवान ६६ धावा केल्या. याशिवाय प्रभारी कर्णधार जॉर्ज बेलीने ६९ चेंडूंत ५५ धावांची संयमी खेळी उभारली. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या अखेरच्या षटकात स्टीव्हन फिनने ब्रॅड हॅडिन, ग्लेन मॅक्सवेल व मिचेल जॉन्सन यांना अनुक्रमे चौथ्या, पाचव्या व सहाव्या चेंडूवर बाद करून हॅट्ट्रिक नोंदवली. फिनने ७१ धावांत पाच बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ९ बाद ३४२ (आरोन फिंच १३५, ग्लेन मॅक्सवेल ६६; स्टीव्हन फिन ५/७१) विजयी वि. इंग्लंड : ४१.५ षटकांत सर्व बाद २३१ (जेम्स टेलर नाबाद ९८; मिचेल मार्श ५/३३)
सामनावीर : आरोन फिंच.

अँडरसन वादग्रस्तपणे धावबाद
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना वादग्रस्त ठरला तो जेम्स अँडरसनला धावबाद दिल्याच्या निर्णयामुळे. जोश हॅझेलवूडने टाकलेला चेंडू जेम्स टेलरच्या पॅडवर आदळला आणि त्याला मैदानावरील पंचांनी बाद ठरवले, तेव्हा तो चेंडू निकाली निघाला होता; पण त्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी अँडरसनला धावबाद केले. तिसऱ्या पंचांनी टेलरला नाबाद ठरवले आणि ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी अँडरसनला धावबाद ठरवण्यासाठी अपील केले. पंचांनी अँडरसनला धावबाद दिले आणि नवीन वादाला तोंड फुटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Australia vs england thunder down under australia beat england by 111 runs