ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आमच्याकडून चांगली कामगिरी झाली नव्हती, पण सध्याच्या घडीला आम्ही चांगल्या फॉर्मात आहोत. त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना जिंकून पराभवाचे उट्टे काढण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
‘‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये आमच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी झाली नाही, एकाही सामन्यामध्ये आम्हाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे जमले नाही. आता सारे काही बदललेले आहे. विश्वचषकात एकामागून एक विजय मिळवत आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो असून समोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. त्यामुळे आमच्यासाठी ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची ही योग्य वेळ आहे,’’ असे कोहली म्हणाला.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने एक खोचक टिप्पणी केली होती. भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे उपांत्य फेरीत आमचे पारडे जड असेल, असे मॅक्सवेल म्हणाला होता. याबद्दल कोहली म्हणाला की, ‘‘ संघामध्ये आता फारच सकारात्मक बदल झाला आहे. आमच्या खेळामध्ये लक्षणीय बदल झाला आहे. फलंदाजांबरोबर गोलंदाजही चांगली कामगिरी करीत आहेत. त्यामुळे आता हा सारा हिशेब चुकता करायची ही योग्य वेळ आहे.’’