विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत द.आफ्रिकेच्या २९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने जगातील सर्वोत्तम तेजतर्रार गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या डेल स्टेनचा यावेळी खरपूस समाचार घेतला. मॅक्क्युलमने विस्फोटक खेळी करत केवळ २५ चेंडूत तब्बल ५९ धावा कुटल्या. मॅक्क्युमच्या या खेळीमुळे न्यूझीलंडने अवघ्या ४.१ षटकात अर्धशतक गाठलं. मॅक्युलमने डेल स्टेनच्या एकाच षटकात तब्बल २५ धावा ठोकल्या. स्टेनच्या या षटकात मॅक्युलमने- ६, अवांतर, ४,६,४,४,० अशा धावा केल्या. त्याने मारलेले फटके पाहून खुद्द डेल स्टेन भारावून गेला. त्यानंतर मॉर्ने मॉर्केलने मॅक्क्युलमला रोखले आणि ५९ धावांवर खेळत असताना तो स्टेन करवी झेलबाद झाला.