इजा, बिजा, तिजा ..तंबूत!

क्रिकेट म्हणजे धावांची फॅक्टरी’ असे समीकरण आता पक्के झाले आहे. ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, ए बी डी’व्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या कर्दनकाळांमुळे गोलंदाज म्हणजे क्रूर कत्तल, असे भीषण चित्र रूढ होताना दिसते आहे.

‘क्रिकेट म्हणजे धावांची फॅक्टरी’ असे समीकरण आता पक्के झाले आहे. ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, ए बी डी’व्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या कर्दनकाळांमुळे गोलंदाज म्हणजे क्रूर कत्तल, असे भीषण चित्र रूढ होताना दिसते आहे. धावांची टांकसाळ उघडलेली असताना बळी मिळवणे दिवसेंदिवस कठीण आहे आणि त्यातही हॅट्ट्रिक साधणे महादुर्मीळ. विश्वचषकासारख्या महासोहळ्यात हा विक्रम करणाऱ्यांची यादी wc10हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढीच आहे. मात्र यंदाच्या विश्वचषकाच्या सलामीच्या दिवशीच इंग्लंडच्या स्टीव्हन फिनने हॅट्ट्रिक नोंदवली. हॅट्ट्रिकसह पाच बळी घेऊनही फिन इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकला नाही.
क्रिकेटमध्ये भारत महासत्ता आहे. योगायोगाने विश्वचषकातल्या पहिल्यावहिल्या हॅट्ट्रिकचा मान भारतीय खेळाडूच्याच नावावर आहे. जावेद मियाँदादच्या शेवटच्या चेंडूवरल्या ‘त्या’ षटकाराची शिकार ठरलेल्या चेतन शर्माच्या नावावर हा अनोखा विक्रम आहे. १९७५, १९७९, १९८३ अशा तीन विश्वचषकांमध्ये मिळून जोएल गार्नर, अ‍ॅण्डी रॉबर्ट्स, मायकेल होल्डिंग, डेनिस लिली, जेफ थॉमसन, रिचर्ड हॅडली, इम्रान खान, कपिलदेव असे एकापेक्षा एक धडकी भरवणारे गोलंदाज सहभागी झाले होते. या सगळ्यांनी आपापल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र विश्वचषकातली पहिली हॅट्ट्रिक होण्यासाठी चौथी आवृत्ती उजाडली. १९८७च्या विश्वचषकात नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर केन रुदरफोर्ड, इयन स्मिथ आणि इव्हान चॅटफिल्ड या तिघांनाही त्रिफळाचीत करत चेतन शर्माने इतिहास घडवला. भारताने हा सामना जिंकला, मात्र त्यानंतर स्पर्धेतली त्यांची वाटचाल उपांत्य फेरीतच संपुष्टात आली.
विश्वचषकात पुन्हा हॅट्ट्रिक पाहण्यासाठी तब्बल एक तप प्रतीक्षा करावी लागली. स्विंगसाठी प्रसिद्ध इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानावर पाकिस्तानच्या साकलेन मुश्ताकने हेन्री ओलोंगा, अ‍ॅडम हकल आणि मुपलेलो मंगब्वा या तळाच्या फलंदाजांना चकवत हॅट्ट्रिक नोंदवली. अकरा विश्वचषकात हॅट्ट्रिक नोंदवणारा तो एकमेव फिरकीपटू आहे. पुढच्याच विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने दुबळ्या केनियाविरुद्ध तर श्रीलंकेच्या चामिंडा वासने अननुभवी बांगलादेशविरुद्ध हॅट्ट्रिकचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा विजय स्वाभाविक होते.
फसवे धीमे फुलटॉस आणि घोटीव यॉर्करने फलंदाजांनी भंबेरी उडवणाऱ्या लसिथ मलिंगाने हॅट्ट्रिकच्या रूपात कमाल केली. चार चेंडूंत चार बळी (शॉन पोलॉक, अ‍ॅण्ड्र हॉल, जॅक कॅलिस आणि मखाया एनटिनी) घेत मलिंगाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला विजयासमीप नेले. मात्र रॉबिन पीटरसनच्या फटकेबाजीमुळे मलिंगाच्या हॅट्ट्रिकच्या माथी विजयाचा टिळा लागला नाही. मात्र ही कसर मलिंगाने पुढच्या विश्वचषकात केनियाविरुद्ध हॅट्ट्रिक घेत भरून काढली. कोलंबो येथे घरच्या मैदानावर मलिंगाने सलग दुसऱ्या विश्वचषकात हॅट्ट्रिकचा मान पटकावला. याच विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या केमार रोचने नेदरलॅण्ड्सच्या फलंदाजांना नामोहरम करत हॅट्ट्रिक मिळवली.
आठपैकी पाच हॅट्ट्रिक आशियाई गोलंदाजांनी मिळवल्या आहेत. मात्र विश्वचषकात हॅट्ट्रिक पटकावणाऱ्या एकाच गोलंदाजाचे जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. यंदाच्या विश्वचषकात हॅट्ट्रिकची हॅट्ट्रिक साजरी करण्याची दुर्मीळ संधी लसिथ मलिंगाला आहे. हॅट्ट्रिकसाठी गोलंदाजांच्या कौशल्याबरोबर नशिबाची भरपूर साथ आवश्यक असते. विश्वचषकात लिंबटिंबूंच्या समावेशाने हॅट्ट्रिकच्या संधी वाढल्या आहेत. प्रत्येक चेंडू मैदानाबाहेर फटकावण्याच्या नादात विकेट फेकण्याची रूढ झालेली पद्धत हॅट्ट्किसाठी उपयुक्त ठरू शकते. फिनच्या हॅट्ट्रिकने विक्रमचषकाची सुरुवात दणक्यात झाली आहे हे निश्चित!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cricket a factory of run