इथेच टाका तंबू!

हॉटेल्समध्ये निवासासाठी जागा नाही तर राहणार कुठे? हा प्रश्न भारत व पाकिस्तानच्या चाहत्यांना पडला खरा, मात्र त्यांचा उत्साह लक्षात घेऊन येथील विमानतळ अधिकाऱ्यांनी या चाहत्यांच्या निवासाची समस्या चुटकीसरशी सोडवली

हॉटेल्समध्ये निवासासाठी जागा नाही तर राहणार कुठे? हा प्रश्न भारत व पाकिस्तानच्या चाहत्यांना पडला खरा, मात्र त्यांचा उत्साह लक्षात घेऊन येथील विमानतळ अधिकाऱ्यांनी या चाहत्यांच्या निवासाची समस्या चुटकीसरशी सोडवली. त्यांनी विमानतळावरील एका टर्मिनलजवळील मोकळ्या जागेतच गाद्या टाकून त्यांना दिलासा दिला.
भारत व पाकिस्तान यांच्यात रविवारी विश्वचषक क्रिकेट सामना होत आहे. हा सामना पाहण्यासाठी येथे शेकडो चाहते आले आहेत. विमानतळ अधिकाऱ्यांनी टर्मिनलजवळील मोठय़ा जागेत चाहत्यांसाठी निवासाबरोबरच खाद्यपदार्थाचे स्टॉल्सही उभारले. तसेच मोठे पडदे लावून चित्रपट दाखवीत त्यांच्या मनोरंजनाचीही सोय केली. विमानतळाचे कार्यकारी सरव्यवस्थापक ब्रँन्टन कॉक्स यांनी सांगितले, प्रथमच येथील विमानतळ रात्री कार्यरत राहणार आहे. येथे आम्ही पाच हजार लोकांची निवास व्यवस्था केली आहे. सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी १९ उड्डाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.  अ‍ॅडलेडच्या स्टेडियमची क्षमता ५० हजार असून २० हजार प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. सर्व हॉटेल्स भारत व पाकिस्तानच्या चाहत्यांमुळे भरली आहेत. भारतीय संघाचा पोशाख घातलेले पाच हजारहून अधिक चाहत्यांनी स्टेडियमवर मिरवणुकीनेच येण्याचे नियोजन केले आहे. भारतीय चाहत्यांची स्वामी आर्मीसुद्धा अ‍ॅडलेडला डेरेदाखल झाली आहे. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला आइस्क्रीम मोफत दिले जाणार आहे.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian fans to stay at airport waiting room