श्रीलंकेचा अनुभवी कुमार संगकारा विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आपल्या शेवटच्या विश्वचषकात श्रीलंकेला विश्वचषक मिळवून देण्यासाठी संगकारा आतुर आहे. धावांच्या अभियानात दुखापतीने कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी संगकाराने मान आणि डोक्याच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त कवच असणाऱ्या शिरस्त्राणाचा (हेल्मेट) उपयोग केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी येथे झालेल्या लढतीत संगकारा नव्या हेल्मेटसह अवतरला होता.
योगायोग म्हणजे या मैदानावरच फिलीप ह्य़ूजचा दुर्दैवी अपघात झाला होता. पुन्हा असा प्रसंग कोणत्याही क्रिकेटपटूच्या आयुष्यात येऊ नये या उद्देशातून संगकाराने अतिरिक्त सुरक्षा असलेल्या हेल्मेटचा उपयोग सुरू केला आहे.
हेल्मेट उत्पादनासाठी प्रसिद्ध ‘मसुरी’ कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला ‘स्टेमगार्ड’ नावाचे हेल्मेट तयार केले आहे. प्लॅस्टिक आणि फोम यांच्यापासून निर्मिती झालेल्या या हेल्मेटमध्ये मान आणि डोक्याच्या सुरक्षेसाठी कवच बसवण्यात आले आहे. मसुरी कंपनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला या हेल्मेटची माहिती दिली जेणेकरून खेळाडू याचा वापर करू शकतात. या हेल्मेटचा उपयोग करणारा संगकारा पहिला खेळाडू ठरला आहे.