भारताचा पाकिस्तानविरुद्ध विजयी ‘षटकार’

विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाक रणसंग्रामात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान संघाला ३०१ धावांचे आव्हान दिले आहे.

भारताच्या ३०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची २२४ धावांतच भंबेरी उडाली. टीम इंडियाच्या दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनीही भेदक मारा करत पाकिस्तानला २२४ धावांवर गुंडाळले आणि या विजयासह भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत पाकविरुद्ध विजयाचा ‘षटकार’ साजरा केला.
विश्वचषक स्पर्धेत आजवर पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पाच सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवले आहे आणि यंदाही टीम इंडियाने आपला विजयी गड अभेद्यच ठेवला. टीम इंडियाने पाकिस्तानला अॅडलेडवरील सामन्यात ७६ धावांनी धूळ चारली.
शाहिद आफ्रिदी आणि मिसबाह-उल-हक या मैदानात जम बसवेल्या जोडीला फोडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आल्यानंतर पाकिस्तानच्या पुढचा डाव पूर्णपणे गडगडला. शाहिद आफ्रिदी २२ धावांवर झेलबाद झाला असून त्यापाठोपाठ वहाब रियाझ देखील अवघ्या ४ धावा करून माघारी परतला. पाकिस्तानकडून कर्णधार मिसबाह-उल-हक याने सर्वाधिक ७६ धावा केल्या.
दरम्यान, भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकची सुरुवात निराशाजनक झाली. युनिस खान या अनुभवी फलंदाजाला पाकने स्वस्तात गमावले. मोहम्मद शमीने यष्टीरक्षक धोनी करवी युनिस खानला झेलबाद केले. आर.अश्विनने हारिस सोहेल याला ३६ धावांवर माघारी धाडून टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले. मैदानाता चांगला जम बसविलेल्या सलामीवर अहमद शेहजाद याला उमेश यादवने ४७ धावांवर बाद केले. रविंद्र जडेजाने अहमद शेहजादचा सुरेश झेल टीपला. त्यानंतर शोएब मकसूद आणि उमर अकमल आल्या पावलांनी माघारी गेले. या दोन्ही फलंदाजांना भोपळाही न फोडू देता तंबूत धाडण्यास भारतीय गोलंदाजांना यश आले.  
विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाक रणसंग्रामात प्रथम फलंदाजी करणाऱया भारतीय संघाने पाकिस्तानला ३०१ धावांचे आव्हान दिले होते. या महामुकाबल्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत शतक साजरे केले. शतकासोबत विराट कोहली विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. कोहलीने १२६ चेंडुत १०७ धावा ठोकल्या. याआधी सचिन तेंडुलकरने विश्वचषक स्पर्धेत पाकविरुद्ध सामन्यात ९८ धावांची वैयक्तिक खेळी साकारली होती. कोहली बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या तीनशेच्या पार नेण्याच्या घाईत धोनी, जडेजा, अजिंक्य रहाणे यांनी स्वस्तात विकेट्स बहाल केल्या. 
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कोहली आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाच्या धावसंख्येला आकार देत शतकी भागिदारी रचली. परंतु, जवळच्या चेंडूवर गरज नसताना धाव घेण्याच्या नादात शिखर धवन ७३ धावांवर धावचित झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया टीम इंडियाच्या सलामीवीरांनी सावध सुरूवात केली होती. परंतु, रोहित शर्मा सोहेल खानच्या गोलंदाजीवर मिसबाह करवी १५ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर संघावर दबाव निर्माण न होऊ देता विराट कोहली आणि शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी केली. गेल्या काही सामन्यांमध्ये दिशा चुकलेला शिखर धवन यावेळी सुर गवसला. त्याने कोहलीच्या साथीने ७३ धावा ठोकल्या.

स्कोअरकार्ड: 
भारत- ३००/७
पाकिस्तान सर्वबाद २२४

सामनावीर- विराट कोहली (१०७ धावा)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Live cricket score world cup 2015 india vs pakistan