मायकेल क्लार्कसाठी हा शेवटचा विश्वचषक आणि अंतिम सामना हा कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना होता. ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध पिवळी जर्सी परिधान करण्याचा योग मायकेल क्लार्कच्या आयुष्यात यानंतर येणार नव्हता. अंतिम लढतीत क्लार्कच्या चतुर नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला झटपट गुंडाळले. त्यानंतर अर्धशतक झळकावत क्लार्कने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ‘‘विश्वविजेतेपद आणि अंतिम लढतीत भरीव कामगिरीसह अलविदा, यामुळे एकदिवसीय कारकिर्दीचा शेवट परीकथेसारखा झाल्याचे वाटत आहे,’’ असे क्लार्कने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘याच्यापेक्षा चांगला शेवट असू शकत नाही. घरच्या मैदानावर, मित्रपरिवार-स्नेह्य़ांच्या उपस्थितीत शेवटचा सामना खेळायला मिळाला, याचे समाधान आहे. उपांत्य फेरीच्या लढतीनंतर अंतिम सामन्यासाठी आम्ही मानसिकदृष्टय़ा तयार होतो. आमच्या खेळातून ते परावर्तित झाले. संघातील प्रत्येक खेळाडूने या विजयात योगदान दिले आहे. सगळ्यांनीच प्रचंड मेहनत घेतली. विश्वविजेतेपद या प्रयत्नांची परिणिती आहे. न्यूझीलंडला १८३ धावांत गुंडाळल्यानंतरही आमचे काही फलंदाजांनी त्वरित सराव सुरू केला. धावांचा पाठलाग करतानाही कोणताही उणीव राहू नये यासाठी तो प्रयत्न होता.’’
‘‘ह्य़ूजच्या जाण्याने आम्ही हळवे झालो होतो. हा विश्वचषक आमच्यासाठी भावनिक असला तरी भावना जिंकून देत नाहीत, जिंकण्यासाठी तंत्रकौशल्य लागते. घोटीव कौशल्यांसह खेळल्यानेच हा विजय साकारला आहे. ह्य़ूजचे निधन आमच्यासाठी धक्का होता. त्यातून सावरत प्रत्येक खेळाडूने आपापल्या खेळावर कसून मेहनत घेतली. त्यांच्या शिस्तबद्ध प्रयत्नांचे हे फळ आहे,’’ असे क्लार्कने सांगितले.
दुखापतीतून पुनरागमनाविषयी विचारले असता क्लार्क म्हणाला, ‘‘संघात परतण्यासाठी फिजिओंच्या साह्य़ाने अपार मेहनत घेतली. हे पुनरागमन कठीण होते’’ असे क्लार्कने सांगितले.