सहयोगी देशांकडून विरोध होत असला तरीही २०१९मध्ये होणाऱ्या पुढील विश्वचषक स्पध्रेत दहा संघांनाच मुख्य फेरीत स्थान देण्याच्या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी समर्थन केले आहे.
पुढील विश्वचषक स्पर्धेत फक्त दहाच संघांना स्थान दिले जाणार आहे, तर उर्वरित संघांना पात्रता फेरीतच परिश्रम घेण्याची संधी मिळेल. या निर्णयास सचिन तेंडुलकर याच्यासहित अनेक माजी खेळाडू आणि संघटकांनी विरोध दर्शविला होता. मात्र आयसीसीच्या निर्णयाचे समर्थन करीत श्रीनिवासन म्हणाले, ‘‘या स्पर्धेचे संयोजक इंग्लंडसह जागतिक क्रमवारीतील पहिल्या सात संघांना थेट प्रवेश मिळेल. उर्वरित दोन संघांच्या स्थानासाठी सहा सहयोगी देशांना पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे. खरे तर या सहयोगी संघांना चांगली स्पर्धा खेळण्याची संधी आहे. सहयोगी संघांना आयसीसीच्या विकास योजनेमुळेच यश मिळाले आहे.’’