प्रत्येक विश्वचषकात सहभागी होऊनही न्यूझीलंडला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. यंदा झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या आणि अंतिम लढतीपर्यंत अपराजित असणाऱ्या न्यूझीलंडला जेतेपदाची सर्वोत्तम संधी आहे. न्यूझीलंडला यशोशिखरासमीप आणण्यात ब्रेंडन मॅक्क्युलमच्या आक्रमक नेतृत्वशैलीचा सिंहाचा वाटा आहे. बलाढय़ ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच कर्मभूमीत चीतपट करण्यासाठी मॅक्क्युलमने अनोखा मार्ग स्वीकारला आहे. मॅक्क्युलमने पाठिंब्यासाठी थेट भारतीय चाहत्यांनाच साकडे घातले आहे.
भारतीय संघाचा विजयरथ ऑस्ट्रेलियाने रोखल्यामुळे भारतीय चाहते कांगारूंऐवजी किवीजना अर्थात न्यूझीलंडला पाठिंबा देतील, हे अचूकपणे मॅक्क्युलमने हेरले आहे.  
मॅक्क्युलमने भारतीय चाहत्यांना उद्देशून लिहिलेले पत्र-
भारतातील क्रिकेट चाहत्यांनो, विश्वचषक पटकावण्याची तुमची ओढ मी समजू शकतो. प्रत्येक सामन्यात तुम्ही आम्हाला दिलेला जल्लोषी पाठिंबा अनुभवला आहे. त्याकरिता मन:पूर्वक आभार. तुम्ही सगळे आम्हाला अंतिम लढतीसाठी हवे आहात. प्रत्येक चेंडूसाठी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, अशी मी तुम्हाला विनंती करतो. हा आमच्या कारकीर्दीतील सगळ्यात मोठा सामना आहे. अब्जावधी चाहते आमच्या नावाचा जयघोष करत असतील. तो क्षण बळ देणारा असेल.

व्हेटोरीने संघासाठी आयुष्य वेचले आहे
‘‘डॅनियल व्हेटोरी न्यूझीलंड क्रिकेटचा सच्चा पाईक आहे. खेळभावनेचा आदर करत तो नेहमी खेळला आहे. संघासाठी त्याने आयुष्य वेचले आहे. गंभीर दुखापतींनी वेढलेले असतानाही व्हेटोरीने चिवटपणे झुंज देत संघाच्या विजयात योगदान दिले आहे. सदैव संघाचा विचार करणाऱ्या अशा या जिवलग मित्राच्या कारकीर्दीचा शेवट जेतेपदासह व्हावा ही इच्छा आहे,’’ असे मॅक्क्युलम म्हणाला.
मार्टिन क्रो यांना आयुआरोग्य लाभावे
मार्टिन क्रो यांचे अतुलनीय योगदान लाभले आहे.सध्या कर्करोगाने क्रो आजारी आहेत. त्यांना आयुआरोग्य लाभावे, त्यांचे उर्वरित आयुष्य वेदनारहित जावे यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, असे मॅक्क्युलमने सांगितले.