संयुक्त अरब अमिराती संघाने १९७६ मध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स संघाविरुद्ध सामना खेळला होता. मात्र त्या वेळी पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यांच्याकडे क्रिकेटला चालना मिळाली ती शारजा येथे १९८४मध्ये k09झालेल्या आशिया चषक स्पर्धेद्वारे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान व श्रीलंका या तीन संघांमध्येच लढती खेळल्या गेल्या. या स्पर्धेत जरी संयुक्त अरब अमिराती संघाचा समावेश नव्हता, तरीही या सामन्यामुळे या श्रीमंत देशात क्रिकेटची लोकप्रियता निर्माण केली गेली. k07त्रयस्थ ठिकाण म्हणून शारजा हे ठिकाण आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगात खूपच लोकप्रिय झाले. त्यातही पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे या ठिकाणी पाकिस्तानचे अनेक सामने खेळले गेले. आजपर्यंत तेथे एक दिवसाचे २०० सामने तर चार कसोटी सामने झाले आहेत.
अमिराती क्रिकेट मंडळाची १९८९मध्ये स्थापना झाली व लगेचच त्यांना आयसीसीचे सदस्यत्व मिळाले. १९९०मध्ये त्यांच्या राष्ट्रीय संघाची स्थापनाही करण्यात आली. केनियात १९९४मध्ये झालेल्या आयसीसी स्पर्धेत चांगली कामगिरी व्हावी यासाठी त्यांनी भारत, पाकिस्तान व श्रीलंकेतील अनेक खेळाडूंना भरपूर आर्थिक मोबदला व गलेलठ्ठ पगाराची नोकरीची हमी देत आपल्या देशात खेळण्यास निमंत्रित केले. १९९६ मध्ये त्यांनी आयसीसी चषक जिंकला व विश्वचषक स्पर्धेची पात्रता पूर्ण केली. त्या वेळी त्यांच्या संघाचा कर्णधार सुलतान झारावनी याचा अपवाद वगळता अन्य सर्व खेळाडू आयात केलेले खेळाडू होते. आखाती देशातील संघांचे आव्हान असणाऱ्या या संघाने १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेची मुख्य फेरी गाठली होती. त्या वेळी त्यांनी नेदरलँड्स संघावर एकतर्फी विजय मिळविला होता. या स्पर्धेतील त्यांचा हा एकमेव विजय आहे. या विजयाच्या आधारे त्यांनी बारा संघांमध्ये अकरावे स्थान मिळविले होते. त्यानंतर त्यांना २०११पर्यंत या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविता आलेले नाही. यंदाच्या स्पर्धेसाठी गतवर्षी झालेल्या पात्रता स्पर्धेत त्यांनी उपविजेतेपद मिळवीत मुख्य फेरीचे स्वप्न पुन्हा साकार केले.

अपेक्षित कामगिरी
स्पर्धेत एखाद्याच सामन्यात त्यांना विजय मिळविता येईल. झिम्बाब्वे व आर्यलड या दोन संघांविरुद्धच काही सनसनाटी कामगिरी केल्यास त्यांना आश्चर्यजनक विजय नोंदवता येईल. अमजद अली, कृष्णन चंद्रन, आंद्री बेरेंगर यांच्याकडून फलंदाजीत अव्वल कामगिरीची अपेक्षा आहे. महम्मद नवीद व कामरान शहजाद हे गोलंदाजीत प्रभाव दाखवतील असा अंदाज आहे.

बलस्थाने व कच्चे दुवे
अनुभवी व युवा खेळाडूंचा समावेश असल्यामुळे संघ समतोल आहे. बऱ्याच वर्षांनी मुख्य फेरीत स्थान मिळविले असल्यामुळे त्यांच्या खेळाडूंवर कोणतेही दडपण नसेल. केवळ खेळाचा आनंद घेण्यासाठीच त्यांचे खेळाडू खेळत असल्याचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र या सांघिक खेळात त्यांच्या संघाकडून अपेक्षित अशी सांघिक कामगिरी होण्याबाबत साशंकता आहे. बरेचसे खेळाडू वैयक्तिकरीत्या चांगले कामगिरी करीत असतील, तरी सांघिक कौशल्याबाबत असलेला कमकुवतपणा त्यांना त्रासदायक ठरणार आहे. स्पर्धात्मक अनुभवाचा अभाव ही सर्वात मोठी उणीव त्यांना जाणवणार आहे.

संकलन : मिलिंद ढमढेरे